नाशिक : अश्विनी पांडे
नाशिक जिल्ह्यात स्टार्टअप्सची वाढ गेल्या वर्षभरात लक्षणीयरीत्या वेगाने झाली आहे. कृषी, आयटी, फूड प्रोसेसिंग, हेल्थकेअर अशा विविध क्षेत्रांत उद्योजक पुढे येत असल्याने नाशिक जिल्हा राज्यातील चौथा सर्वांत वेगाने वाढणारा स्टार्टअप हब बनला आहे. महाराष्ट्र सरकारच्या नवीन स्टार्टअप धोरणामुळे ही वाढ आणखी गतिमान झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
देशभरात स्टार्टअप इंडियाअंतर्गत नोंदणीकृत स्टार्टअप्सची संख्या एक लाख 88 हजार 405 वर पोहोचली आहे. त्यात महाराष्ट्राचे 32 हजार 552 स्टार्टअप्स आघाडीवर आहेत. नाशिकमध्ये नोंदणीकृत स्टार्टअप्सची संख्या गेल्या वर्षभरात 694 वरून 772 वर गेली आहे. 11.2 टक्के वाढ नोंदवली आहे. नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक वाढ कृषी, आयटी, आरोग्यसेवा आणि अन्नप्रक्रिया क्षेत्रांत झाल्याचे स्टार्टअप इंडिया पोर्टलवरील नोंदणीवरून स्पष्ट होते. कृषीवर आधारित नाशिकची पारंपरिक ओळख आता अॅग्रो-टेक, स्मार्ट फार्मिंग आणि मूल्यवर्धित अन्नप्रक्रिया अशा आधुनिक व्यवसायांसह बदलताना दिसत आहे. नवीन स्टार्टअप धोरणाचा फायदा झाला आहे. स्टार्टअप नोंदणी व सरकारी सेवांमध्ये सुलभता वाढली, सीड फंडिंग, अनुदान आणि वित्तीय मदत उपलब्ध झाली. महिला उद्योजकांसाठी विशेष योजना लागू झाल्या, तर महाविद्यालयांमध्ये स्टार्टअप जागरूकता मोहीम मोठ्या प्रमाणात राबवण्यात आली. यामुळे नाशिकमधील टियर-2, टियर-3 शहरांतही स्टार्टअप्सची लाट निर्माण झाली आहे.
नाशिकमधील उद्योजकांसाठी सुवर्णसंधी
नाशिकचे भौगोलिक महत्त्व, कृषी-औद्योगिक संयोग, महाविद्यालये आणि आयटीचा विस्तार या सर्व घटकांमुळे जिल्हा स्टार्टअप फ्रेंडली झोन म्हणून उदयास येत आहे.स्थानिक रोजगार, उद्योग विस्तार आणि नवीन व्यवसायांची निर्मिती यामुळे नाशिकचे आर्थिक चित्र बदलत असून, उद्योजकांसाठी हा सर्वोत्तम काळ असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
वर्षभरात अशी झाली वाढ
क्षेत्र 2024 2025
कृषी 97 109
आरोग्यसेवा 64 72
आयटी/टेक्नॉलॉजी 57 67
व्यावसायिक सेवा 35 41
अन्नप्रक्रिया 37 38
बांधकाम 33 39
एकूण 694 772
772 स्टार्टअप्स सद्यःस्थिती
कल्पना टप्पा- 189
प्रमाणीकरण- 297
अर्ली ट्रॅक्शन- 205
स्केलअप- 81
स्टार्टअप्स संख्या
भारत- 1,88,405
महाराष्ट्र- 32,552
नाशिक- 772
नाशिकमध्ये स्टार्टअप्ससाठी अत्यंत अनुकूल वातावरण तयार झाले आहे. केंद्र व राज्याच्या नवीन धोरणामुळे उद्योजकांना वित्तीय मदत, मार्गदर्शन आणि सरकारी सेवांची सुलभता मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाली आहे. त्यामुळे नाशिकची स्टार्टअप इकोसिस्टिम गतिमान होत आहे. पुढील काही वर्षांत शहर मोठे हब बनणार आहे. टियर-2 व 3 शहरांत महाविद्यालयांत वर्षभर आम्ही स्टार्टअप जागरूकता कार्यक्रम घेतले. विद्यार्थ्यांना आयडिया ओळख, फंडिंग, सरकारी योजना, मेन्टॉरशिप याबाबत प्रत्यक्ष मार्गदर्शन केले. त्यामुळे नव्या स्टार्टअप्सची संख्या झपाट्याने वाढली आहे. हॅण्ड होल्डिंग सपोर्टमुळे अनेक स्टार्टअप्सना सरकारी सीड फंडिंगची संधी मिळाली आहे. ही वाढ येत्या काळात नाशिकच्या आर्थिक प्रगतीला निर्णायक ठरणार आहे.
– श्रीकांत पाटील, अधिकृत स्टार्टअप इंडिया मार्गदर्शक