नाशिकरोड : प्रतिनिधी
नाशिक पुणे महामार्गावरील शिवाजी नगर येथील हॉटेल क्वालिटी इनमध्ये शनिवार (दि.२१ व २२) रविवारी इंडियन मेडिकल असोसिएशनचे (आयएमए) राज्यस्तरीय “महा युथकॉन” अधिवेशन होणार आहे. आयएमएच्या नाशिकरोड शाखेला हा बहुमान प्रथमच मिळाला असल्याची माहिती शाखाध्यक्ष डॉ. प्रशांत भुतडा, सचिव डॉ. रेश्मा घोडेराव आणि खजिनदार डॉ सारंग दराडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दोन दिवसीय अधिवेशनासाठी राज्यातून डॉक्टर्स येणार असून वैद्यकीय क्षेत्रातील युवा या विषयावर प्रामुख्याने चर्चा होणार आहे. आयएमएचे राज्याचे अध्यक्ष डॉ. रविंद्र कुटे यांच्याहस्ते शनिवारी अधिवेशनाचे उदघाटन होईल. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, उल्हास पाटील, मेडिकल कालेजच्या डॉ. केतकी पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहील. शनिवारी सकाळच्या सत्रात डॉक्टर व वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी खेल उत्सव होईल. दुपारी दोन पासून अधिवेशनाला प्रारंभ होईल. “आजच्या आरोग्य सद्यस्थिती-भावी पिढीसाठी मार्गदर्शक” या विषयावर आयएमए चे माजी सचिव डॉ. मंगेश पाटे हे मार्गदर्शन करणार आहेत.तसेच अनेक विषयांवर तज्ञ डॉक्टर्स मार्गदर्शन करतील. यामध्ये मानसशास्त्र कर्करोग आदी विविध विषयांवर अभ्यासपूर्ण माहिती डॉक्टरांना मिळणार आहे. डॉक्टरांवर होणारे हल्ल्याबाबत किंवा डॉक्टरांवर होणाऱ्या कारवाईंबाबत नवजीवन लॉ कॉलेजच्या प्राध्यापिका विधीतज्ञ शाहिस्ता इनामदार या उपयुक्त माहिती सादर करणार आहेत.संध्याकाळी युवा आयकॉन स्पर्धा होईल. तर
रविवारी सकाळी ९ ते सायंकाळी साडेपाच या वेळात दर्जेदार व्याख्याने होतील. दुपारी राज्यातील विविध वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठातांचे डीन कॉनक्लेव संमेलन होईल. या दोन दिवसीय अधिवेशनात राज्यभरातून इंडियन मेडिकल असोसिएशनचे 250 ते 300 या डॉक्टर सहभागी होणार आहेत. विविध कार्यक्रमांचा लाभ डॉक्टर व विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन डॉ. भुतडा यांनी केले आहे. खजिनदार डॉ. सारंग दराडे, डॉ. विजय क-हाडे, डॉ. प्रवीण जाधव, डॉ. ज्योत्स्ना डुंबरे, डॉ. शीतल जाधव, डॉ. मयूर सरोदे, डॉ. कैलास मोगल, डॉ. कांचन लोकवानी, डॉ. मानसी गुजराती, डॉ. सुषमा भुतडा, डॉ. प्रशांत मुठाळ आदी संयोजन करत आहेत. पत्रकार परिषदेस डॉ ज्योत्स्ना डुंबरे,डॉ स्वप्नांजली आव्हाड, डॉ सुनिता देवरे, डॉ श्वेता भिडे, भीमराव निकम उपस्थित होते.