दोन लाख नागरिकांंना फटका; जलवाहिन्यांनी एअर पकडल्याचा दावा
नाशिक : प्रतिनिधी
पंचवटीसह नाशिक पूर्व विभागातील नागरिकांना अजूनही पाणीबाणीचा सामना करावा लागत आहे. पाचव्या दिवशीदेखील बुधवारी (दि.25) पाणीपुरवठा सुरळीत न झाल्याने नागरिकांना पाण्यासाठी टाहो फोडावा लागत आहे. हतबल झालेल्या महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून पंचवटी विभागातील जुना आडगाव नाका, नांदूर, मानूर, कोणार्कनगरसह पूर्व विभागातील काठे गल्लीत टँकरने पाणी पुरवण्याची वेळ आली. टॅँकरच्या पाण्याने दोन लाख लोकसंख्येची तहान अवघ्या 12 टँकरद्वारे भागविण्याचा केविलवाणा प्रयत्न पाणीपुरवठा विभागाकडून सुरू असल्याचे चित्र आहेे.
शहरातील विविध जलशुद्धीकरण केंद्रांचे काम शनिवारी हाती घेण्यात आले होते; परंतु हे काम झाल्यानंतर पंचवटी व नाशिक पूर्व विभागातील पाणीपुरवठा कमालीचा प्रभावित झाला आहे. यापूर्वी या परिसरातील पाणीपुरवठा सुरू असताना स्मार्ट सिटीने शनिवारी व रविवारी केलेल्या कामानंतर पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. नागरिकांकडून याप्रकरणी तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
महापालिकेने कुठलेही नियोजन न करता नागरिकांना पाण्यासाठी वंचित ठेवण्याची कृती असल्याचा संताप नागरिक व्यक्त करत आहेत. जलशुद्धीकरण केंद्रावर प्रतितास पूर्णक्षमतेने पाणी येत नसल्याने त्याचा फटका बसत आहे. शनिवारी जलशुद्धीकरण केंद्र भरणार्या जलवाहिन्या पूर्णपणे रिकाम्या झाल्या होत्या. त्यानंतर या जलवाहिन्यांनी एअर पकडल्याचा दावा पाणीपुरवठा विभागाने केला. दरम्यान, रविवारी सायंकाळी सुरळीत होणारा पाणीपुरवठा अद्याप न झाल्याने नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सलग दोन्ही दिवस पाणीच न आल्याने जेलरोड, नाशिकरोड, इंदिरानगर, कमोदनगर, काठे गल्ली, जाखडीनगर, वडाळागावासह परिसरातील नागरिकांना स्वखर्चाने टँकर आणून पाण्याची गरज भागवण्याची वेळ आली आहे. पाणीपुरवठा विभागाच्या गलथान कारभारामुळे कृत्रिम पाणीटंचाई निर्माण होते.
निकृष्ट फ्लोमीटरमुळे पाणीबाणी
शहरात वाहणार्या गोदावरीतून चार ते पाच दिवसांपासून हजारो क्यूसेकने पाणी जायकवाडीकडे जात असताना दुसरीकडे मात्र नाशिककरांचे पाण्यावाचून वांधे झाले आहेत. स्मार्ट सिटीने बसविलेले फ्लोमीटर निकृष्ट असल्यानेच जलवाहिन्यांत एअर पकडल्याचे बोलले जाते. याप्रकरणी मात्र महापालिका अधिकार्यांचे तोंडावर बोट आहे.
पंचवटीसह पूूर्व विभागात पाणीपुरवठा होऊ शकला नाही. टँकरद्वारे पाणी पुरवण्यात आले. निलगिरी बाग जलशुद्धीकरण केंद्रात प्रतितास वीस लाख लिटर पाणी जलवाहिन्यांतून येणे अपेक्षित आहे. सध्या पंधरा लाख लिटर एवढेच पाणी येत आहे. नागरिकांनी संयमाने घेऊन सहकार्य करावे.
– रवींद्र धारणकर, अधीक्षक अभियंता, पाणीपुरवठा विभाग, मनपा