सराईतासह विधिसंघर्षित बालक ताब्यात
सिडको : विशेष प्रतिनिधी
नाशिक शहरात मोटारसायकल चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी गुन्हे शाखा युनिट क्रमांक-2 ने मोठी कारवाई करत एका सराईत चोरासह विधिसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले आहे. चोरीच्या मोटारसायकली खरेदी करणार्या आणखी एका आरोपीला ताब्यात घेत पाच लाख 40 हजार रुपयांच्या आठ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
गुन्हे शाखा युनिट-2 चे अधिकारी मोटारसायकल चोरीच्या घटनांचे तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत असताना, दोन जण चोरीची बुलेट विक्रीसाठी पिंपळगाव खांब परिसरातील मनोहर लॉन्ससमोर येणार असल्याची माहिती मिळाली. प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर व डॉ. समाधान हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले.
ताब्यात घेतलेल्या आरोपींपैकी गौरव शिवानंद प्रसाद (19, रा. पंचवटी, नाशिक) याच्यासह एक विधिसंघर्षित बालक असल्याचे निष्पन्न झाले.
चौकशीत त्यांनी नाशिक शहर तसेच सिन्नर तालुक्यातील विविध ठिकाणांहून मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली. चोरी करताना वापरलेली दुचाकीही पोलिसांनी जप्त केली आहे.
आरोपींकडून चोरीच्या मोटारसायकली प्रथमेश विनोद जोशी (रा. सावरकरनगर, मनमाड, ता. नांदगाव) याला विक्रीसाठी दिल्याचे समोर आले. त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईत गंगापूर पोलीस ठाण्याचे पाच, सरकारवाडा पोलीस ठाण्याचा एक आणि सिन्नर पोलीस ठाण्याचा एक, असे एकूण सात गुन्हे उघडकीस आले आहेत.जप्त मुद्देमाल व आरोपींना पुढील कारवाईसाठी सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.