साठवण

साठवण

वर्षभरासाठी काल घरात गहू भरले. शर्वरीला म्हटलं ,” उद्या सुट्टी आहे , दिवसभर उन्हांत वाळवून, एरंडेल तेल लावून भरून ठेवूया .’तर मला म्हणते कशी,’कशाला गं एवढा कुटाणा करत असतेस ?लागेल तसं दुकानातून आणता येतं ना .’हात दुखतात,पाय दुखतात,त्रास होतो म्हणतेस, तरी तुला सगळं घरातचं करायचं असतं. वाळवणही करत बसतेस. मिरची ,मसाले ते सुद्धा तुला घरीच करायला हवे.काही गरज आहे का? हल्ली सगळं विकत मिळतं. कशाला साठवून ठेवायचं. तुला ना! फार बाई हौस.’ “करा कष्ट व्हा नष्ट.” म्हणतात ते काय खोटे नाही.
‘खरं आहे तुझं बाई.तुमची आजची पिढी घडाळ्याच्या काट्यावर चालणारी. ‘युज अँड थ्रो’ चा तुमचा जमाना .तुम्हांला काय कळणार गं की, संसार असाच निगुतीने करायचा असतो. अगं पशुपक्षीसुद्धा पावसाळ्यापूर्वी घरट्यामध्ये दाणे साठवून ठेवतात.मुंग्या बघितल्यास ना ! मुंग्या नाही का, कण कण वारुळात नेऊन साठवतात .मधमाशा किती कष्ट करून फुलाफुलांतील मध गोळा करून ठेवतात. रोजच्या जीवनासाठी जे आवश्यक आहे ते साठवावचं लागत. कोणती वेळ कधी कशी येईल सांगू शकत नाही. दिवसेंदिवस वस्तूंचे भाव वाढतच जातात. वस्तूंचा तुटवडा जाणवतो .कधी कोणती आपत्ती येईल सांगू शकतो का? भविष्यात आवश्यक वस्तूंचा, अन्नधान्याचा तुटवडा भासू नये म्हणून ही साठवण करायची असते गं बाई.’
असा संवाद आपल्याला घराघरांत ऐकायला मिळतो.नाशवंत अशा जीवनावश्यक वस्तू उन्हांत वाळवून किंवा त्यावर वेगळी प्रक्रिया करून त्या दीर्घकाळ टिकू शकतील, गरज पडेल तेंव्हा वापरता येऊ शकतील अशा प्रकारे त्यांची साठवण केली जाते. मग त्यामध्ये अन्नधान्याची साठवण असेल किंवा उन्हाळ्यामध्ये पाण्याचा तुटवडा असतो म्हणून पाण्याची साठवण असेल.
दैनंदिन वापरातील अगदी सुतळीच्या तोड्यापासून ते मोठ्या वस्तूंपर्यंत साठवण केली जाते. पूर्वी अडगळीच्या खोलीमध्ये अशाच कधीतरी लागणाऱ्या कितीतरी वस्तू साठवल्या जात असत.
शेतकरी वर्ग बी-बियाणे, सेंद्रिय तसेच रासायनिक खते,कीटकनाशके आदींची साठवणूक करतात.व्यापारी मालाची साठवणूक करून ठेवतात.कारखानदार कच्चामाल साठवून ठेवतात. खनिजतेलाचे साठे मर्यादित असल्यामुळे तेल विक्री करणाऱ्या कंपन्या विशिष्ट भागात कच्च्या तेलाची साठवण करून ठेवतात.समुद्र किनारपट्टीवर राहणारे लोक विविध प्रकारचे मासे वाळवून,खारवून त्यांची साठवणूक करून ठेवतात. तर समुद्राचे पाणी मिठागरांमध्ये साठवून त्यावर प्रक्रिया करूनच जीवनावश्यक असे मीठ मिळविले जाते .रुग्णाला जर तातडीने रक्ताची आवश्यकता भासली तर अशावेळी रक्तपेढीमध्ये विविध रक्तगटाच्या रक्ताची साठवण केलेली असते. धनाची,पैशाची साठवणूक सर्वच करतात. त्याला धनसंचय किंवा पैशाचा संचय असे म्हटले जाते. तर काहीजण आपल्या सत्कृत्याने पुण्याची साठवण करत असतात.त्याला पुण्यसंचय असे म्हटले जाते. तर काही आपल्या कुकर्माने पापाचा साठा करत जातात. त्याला पापसंचय असे म्हटले जाते.
माणसाला साठवणुकीची इतकी सवय लागलेली असते की, तो मनांतही असंच खूप काही साठवत जातो. मान, अपमान ,सुखदुःखाचे क्षण ,अनेक घटना, प्रसंग मनामध्ये साठवून ठेवतो. कोळी जसा स्वतःभोवती जाळे विणून त्यात अडकतो.तसंच माणूस देखील मनांत साठवून ठेवलेल्या अनेक गोष्टींमध्ये अडकत जातो. अशावेळी नाविन्याचा स्वीकार करण्यासाठी त्याचे मन लवकर धजावत नाही. चांगल्या गोष्टी, आनंददायी घटना मनांत साचून राहिल्या तर नक्कीच त्या प्रेरणादायी ,व्यक्तिमत्वाला पोषक ठरतात .परंतु तेही ठराविक मर्यादेपर्यंतच .नकारात्मक, दुःखदायक ,क्लेशदायक गोष्टी मनांत साचत गेल्या तर त्या स्वतःसाठी व इतरांसाठी देखील हानिकारक ठरतात.
अन्नधान्य कितीही वाळवून ठेवले ,प्रक्रिया करून ठेवले तरी वेळोवेळी लक्ष न दिल्यास त्याला कीड लागतेच किंवा ते अंशतः खराब होतेच .तसंच मनात साठवलेल्या या गोष्टींचा वेळोवेळी अंतर्मुख होऊन आढावा घेतला नाही,त्यांचा वेळीच निचरा केला नाही तर त्याचेही घातक परिणाम घडून येतातच. म्हणून साठवणूक जरूर केली पाहिजे पण कोणत्या गोष्टींची आणि किती मर्यादेपर्यंत हे कळणं महत्त्वाचं नाही का?
आरती डिंगोरे.✍

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *