मालेगाव : नीलेश शिंपी
आधीच शहरातील नागरिक अतिक्रमणामुळे त्रस्त आहेत. त्यातच रस्त्यांवर फिरणार्या मोकाट जनावरांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. यामुळे अपघाताची शक्यता वाढली असून, वाहनचालकांसह पादचार्यांचे जीव धोक्यात आले आहेत. महापालिकेने मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
शहरातील सोयगाव मराठी शाळा ते इंदिरानगर, मोसमपूल ते अॅरोमा चित्रपटगृह, एकात्मता चौक, मार्केट परिसर, रावळगाव नाका, सोमवार बाजार, सरदार चौक, संगमेश्वर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूल अशा वेगवेगळ्या भागांमधील रस्त्यांवर तर जणू काही जनावरांचे साम्राज्यच असल्यासारखी परिस्थिती असते. त्यामुळे वाहनचालकांसह पायी चालणार्या नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो.
शहरात आधीच अतिक्रमणाचा विळखा आहे. तर दुसरीकडे बेशिस्तपणे उभी केलेली वाहने. यामुळे नागरिक त्रस्त असताना रस्त्यावर मोठ्या प्रमाणात असलेल्या मोकाट जनावरांचाही सामना करावा लागत आहे. सावधान! पुढे मोकाट जनावरांचा ठिय्या आहे. वाहने हळू चालवा, अन्यथा अपघाताची शक्यता… अशी वस्तुस्थिती शहरात निर्माण झाली आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवरच मोकाट जनावरांचा सुळसुळाट झाला आहे. बसस्थानकासमोरील रस्त्यावरही नेहमीच मोकाट जनावरे बसलेली असतात. मोकाट जनावरांची संख्या वाढली आहे. यामुळे अपघाताचा धोका वाढला असून, वाहनचालकांच्या अंगावर मोकाट जनावरे कधी धावून येतील, याचा नेम नाही. त्यामुळे शहरातील बाजारपेठेसह मुख्य रस्त्यावर फिरणार्या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
कचर्यामुळेही समस्या वाढली
शहरात कचरा टाकण्यासाठी महापालिकेने ठिकठिकाणी कचराकुंड्या ठेवल्या नाहीत. त्यामुळे रस्त्यावर किंवा मोकळ्या भूखंडांवर कचरा टाकण्याचे प्रकार सुरू आहेत. रस्त्यावर टाकलेल्या या कचर्यात अन्नाच्या शोधासाठी मोकाट जनावरे येतात. त्यामुळे त्या परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.