अशोका मार्ग परिसरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव

सिडको : विशेष प्रतिनिधी
अशोका मार्ग व परिसरातील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे नागरिक त्रस्त झाले असून, लहान मुलांवर सलग झालेल्या तीन हल्ल्यांमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची चित्रफीत सीसीटीव्हीत कैद झाली असून, तात्काळ कारवाईची मागणी नागरिकांनी केली आहे. रविवारी सॅक्रेड हार्ट शाळेजवळील जय हिंद कॉलनीतील अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये खेळणार्‍या एका लहान मुलावर कुत्र्याने अचानक हल्ला केला. त्याच दिवशी दुसर्‍या ठिकाणीही लहान मुलावर हल्ला झाला. सोमवारीदेखील याच परिसरात आणखी एक हल्ला झाला. यामुळे पालकांत प्रचंड अस्वस्थता असून, मुलांना घराबाहेर सोडण्यास भीती वाटत आहे. ममता कॉलनी, जेएमसीटी परिसर, जय हिंद कॉलनी, जयदीपनगर, वडाळा रोड आणि वडाळागाव परिसरातील नागरिक भटक्या कुत्र्यांच्या त्रासाने हैराण झाले आहेत. केवळ लहान मुलेच नव्हे तर पायी चालणार्‍या महिला, वृद्ध, नागरिकांवरही कुत्र्यांचे हल्ले होत असून, दुचाकीस्वारांच्या मागे धावून हल्ला केल्याने अपघाताच्या घटनादेखील घडल्या आहेत. मनपा प्रशासनाने तात्काळ भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त न केल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संध्या कुलकर्णी, शाहीन मिर्झा, रूपाली निकुळे, श्याम हांडोरे, वैभव कुलकर्णी, जगन्नाथ शिरसाठ, वैशाली पिंगळे, रमिज पठाण, दादा नरवाडे, अरुण दोंदे, संकेत खोडे, सुनील खोडे, असिफ शेख, रवींद्र पाटील, अर्जुन पाटील यांच्यासह स्थानिक नागरिकांनी दिला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *