हल्ल्याच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाचा मूक मोर्चा
चांदवड ः वार्ताहर
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आज चांदवडमध्ये सकल मराठा समाजाने उत्स्फूर्तपणे मूक मोर्चा काढला. या मोर्चामुळे चांदवड शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला होता.
सकाळच्या सुमारास शहरातील अहिल्यादेवी होळकर रंगमहालाजवळ मराठा समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र जमले. त्यानंतर सकाळी 9 वाजता मूक मोर्चाला सुरुवात झाली. हा मोर्चा शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत नगरपालिका, श्रीराम रोड, शिवाजी चौक, सोमवार पेठ, आठवडे बाजार तळमार्गे चांदवड पोलीस ठाण्यापर्यंत गेला आणि तिथे त्याची सांगता झाली.
शिवाजी चौकात मोर्चादरम्यान संतप्त कार्यकर्त्यांनी पाकिस्तानचा ध्वज जाळून तीव्र निषेध व्यक्त केला. यावेळी कार्यकर्त्यांनी ‘निमक पत्ता कडवा है, पाकिस्तान भडवा है’, ‘वंदे मातरम’, ‘भारत माता की जय’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
मोर्चाच्या सांगतेवेळी चांदवड पोलीस ठाण्यात पहलगाम हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. ह.भ.प. महाराज कैलास ढगे (देणेवाडी) आणि सोपान बाळासाहेब बोरसे यांनी या घटनेची अधिक माहिती दिली.
चांदवड पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय आखेगावकर आणि चांदवड पोलीस कर्मचार्यांनी तसेच आर.सी.एफ.च्या जवानांनी चोख बंदोबस्त ठेवल्यामुळे मोर्चा शांततेत पार पडला.