गंगापूर रोडपासून तर श्रमिकनगरपर्यंत पसरलेल्या प्रभाग 9 मध्ये गेल्या काही वर्षांत नागरी वसाहती वाढल्या आहेत. मात्र, समस्यांतही भर पडत आहे. गंगापूर रोडच्या बारदान फाटा ते त्र्यंबक रोडपर्यंतचा रस्ता अतिशय अरुंद झाला असून, या रस्त्यावर अनेक व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. महापालिकेकडून या रस्त्यावरील अतिक्रमणांकडे कानाडोळा केला जात आहे. याशिवाय शिवाजीनगर बसथांब्यावर रिक्षाचालकांबरोबरच शेजारीच असलेल्या पेट्रोल पंपावरील सीएनजी वाहनधारकांची गर्दी आणि औद्योगिक वसाहतीतून येणार्या वाहनांमुळे या परिसराचा जीव गुदमरून गेला आहे. बारदान फाटा ते त्र्यंबक रोडपर्यंतच्या लिंकरोडचे अतिक्रमण काढून हा रस्ता रुंद करण्याची गरज आहे. त्यातच रस्त्याच्या कडेला उभ्या राहणार्या कंटेनरमुळे रस्त्याची रुंदी आणखी कमी होऊन अपघातांची शक्यता वाढली आहे.
त्र्यंबकेश्वर रोड ते बारदान फाटा या रस्त्याच्या दुतर्फा घरे, व्यासायिकांची दुकाने, भाजी मार्केट, कारखाने, खाजगी शाळा, मनपा शाळा, मोतीवाला कॉलेज, हॉटेल्स हातगाडीवाले आहेत. त्यामुळे या रस्त्यावर कायम वर्दळ असते. विशेषतः कारखान्यांमध्ये येणार्या अवजड वाहनांमुळेच वाहतुकीची कोंडी होत आहे. या रस्त्यावर दुभाजक टाकण्यात आले आहेत. परंतु ते टाकण्यापूर्वी रस्ता रुंदीकरण होणे गरजेचे होते. मागील चार-पाच वषार्ंत या रस्त्यावर झालेल्या अपघातात किमान 20 ते 25 लोकांचा बळी गेेलेला आहे. अनेक जण जायबंदी झाले आहेत. रस्त्यावरील एकूणच वाहतूक पाहता हा रस्ता चारपदरी होणे गरजेचे आहे. रस्त्याच्या कडेला अनेक झाडे आहेत. नाला आहे. त्यामुळे रुंदीकरणाचे अडथळे दूर करणे गरजेचे आहे. महापालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला निवेदने दिलेली आहेत. तरीही याकडे कोणीही गांभीर्याने पाहत नाही, ही शोकांतिकाच म्हणावी लागेल.
त्र्यंबकेश्वर रोड ते बारदान फाटा या रिंगरोडवर एका बाजूने औद्योगिक वसाहत आहे. दुसर्या बाजूला नागरी वसाहत आहे. येथील कारखान्यांमध्ये कायम अवजड (कंटेनर) ये-जा करत असतात. लांबीला जास्त असणार्या कंटेनरमुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होतो. कंटेनर जोपर्यंत बाजूला होत नाही तोपर्यंत वाहतूक खोळंबलेली असते. त्यामुळे सातत्याने अपघातही होत असतात. शिवाय कंटेनरचालक आणि वाहचालकांत वादविवाददेखील होत असतात.
महानगरपालिकेच्या सिटीलिंक बसेसचा शेवटचा थांबादेखील याच रिंगरोडवरील बारदान फाट्यावर आहे. सातपूर, अशोकनगर, शिवाजीनगरमार्गे जाणार्या आणि येणार्या सर्व बसेस बारदान फाट्यावरच थांबतात. तसेच गंगापूर रोडने येणार्या सर्व बसेसदेखील याच ठिकाणी थांबतात. म्हणजेच सिटीलिंक बसेसचा थांबा अधोरेखित झाला आहे.
अंतर्गत कॉलनी भागातील रस्त्यांची दैना
सातपूर श्रमिकनगर, शिवाजीनगर, ध्रुवनगर हा परिसर गेल्या काही वर्षांत कमालीचा विकसित होत आहे. कधीकाळी या भागात जंगल होते. आता सिमेंटचे जंगल उभे राहिले आहे. प्लॉटचे भावदेखील वाढले आहेत. कामगारांबरोबरच मुंबई-पुण्याच्या अनेक गुंतवणूकदारांनी या भागात घरे घेतली आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या कॉलन्या अस्तित्वात येत असताना त्या तुलनेत रस्ते, वीज, पाणी या समस्या कायम आहेत. कॉलनीतील नऊ मीटर, बारा मीटर रस्त्यांवरील डांबर निघून गेले आहे. मागील सिंहस्थात रस्ते झाले. त्यानंतर पुन्हा कुणी ढुंकूनही पाहिलेले नाही. त्यात गेल्या चार वर्षांपासून निवडणुकाच झालेल्या नाहीत. त्यामुळे प्रशासकीय राजवटीत तर या भागाला कुणी वालीच उरला नाही. घराचे बांधकाम करताना वीज, पाणी कनेक्शनसाठी रस्ते खोदले जातात. ते थातूरमातूर बुजवले जातात. याकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. किमान कॉलन्यांतील रस्ते तरी धड करावेत, अशी अपेक्षा नागरिक बाळगून आहेत.
प्रभागातील समस्या
♦ अनियमित घंटागाडी
♦ मोकाट कुत्र्यांचा जाच
♦ रस्त्यावरील अतिक्रमण
♦ कॉलनीतील रस्ते अंधारात
♦ कॉलनीतील रस्त्यांची दैना
♦ मूलभूत सुविधांचा अभाव
♦ राष्ट्रीयकृत बँका, एटीएमचा अभाव
♦ वाढती गुन्हेगारी
♦ टवाळखोरांचा उपद्रव, वाढलेली गुन्हेगारी
♦ अभ्यासिका, वाचनालय नाही
♦ उद्यानांची दुर्दशा
♦ अरुंद रस्ते
♦ बारदान फाटा ते त्र्यंबक लिंकरोडवरील अतिक्रमण
♦ कॉलनीतील रस्त्यांवरील अतिक्रमण
प्रभागाची व्याप्ती
वसंत कानेटकर उद्यान,मोतीवाला कॉलेज परिसर, महिरावणी, छत्रपती शिवाजी नगर,ध्रुवनगर,धर्माजी कॉलनी, विठ्ठल रुक्मिणीनगर, कार्बननाका परिसर, श्रमिकनगर,
2011 नुसार लोकसंख्या
लोकसंख्या : 47835
अनुसूचित जाती-7079
अनुसूचित जमाती 3511
विद्यमान नगरसेवक

दिनकर पाटील,

वर्षा भालेराव,

रवींद्र धिवरे,

हेमलता कांडेकर
इच्छुक उमेदवार
दिनकर पाटील, अमोल पाटील, रवींद्र धिवरे, सविता गायकर, हेमलता कांडेकर, सागर जारे,वर्षा भालेराव, अर्चना तुपलोंढे, अर्चना परशराम साठे, कल्पेश कांडेकर,शरद शिंदे, गुलाब माळी, प्रेम पाटील, सागर वैष्णव
प्रभागात झालेली कामे
मनपा शाळेची भव्य इमारत
जलवाहिनी
सामाजिक सभागृह, पाण्याचा प्रश्न
प्रभागातील रस्ते.
राजकीय गणिते अशी:
प्रभाग नऊमध्ये मागील वेळेस चारही नगरसेवक हे भाजपाचे निवडून आले होते. दिनकर पाटील, रवींद्र धिवरे, हेमलता कांडेकर, वर्षा भालेराव यांचा संपूर्ण एकत्रित पॅनलच निवडून आला. मात्र, गेल्या पाच वर्षांत गोदेखालून बरेच पाणी वाहून गेले. विधानसभा निवडणुकीत आमदारकीच्या तिकिटावरून दिनकर पाटील यांनी भाजपा सोडत मनसेच्या इंजिनमध्ये बसणे पसंत केले. त्यांच्यासोबत असलेले रवींद्र धिवरे हे देखील मनसेत गेले. वर्षा भालेराव आणि हेमलता कांडेकर हे मात्र, सद्या भाजपातच आहेत. त्यामुळे भाजपाकडून आता या प्रभागात माजी महापौर दशरथ पाटील यांचे चिरंजीव प्रेम, छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या पत्नी सविता, हेमलता कांडेकर, अर्चना तुपलोंढे हे भाजपाकडून निवडणुकीची जोरदार तयारी करीत आहेत. दिनकर पाटील यांनी या भागावर गेले अनेक वर्षे वर्चस्व अबाधित ठेवलेले आहे. आता होणार्या या निवडणुकीत त्यांच्यापुढे भाजपा उमेदवारांचे आव्हान आहे. त्यात करण गायकर यांनी गेल्या काही वर्षांत मोठा जोर लावला असून, त्यांनी विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून घरोघरी आपली भूमिका पोहोचविली आहे. दिनकर पाटील हे देखील या भागातील मोठे प्रस्थ असून, त्यांचे चिरंजीव अमोल पाटील हे त्यांच्या फाऊंडेशनच्या माध्यमातून सक्रिय आहेत. याा भागात अनेक मंदिरे उभारण्याबरोबरच सामाजिक उपक्रम राबविण्यातही दिनकर पाटील यांची ख्याती आहे. तर करण गायकर यांनीही गेल्या पाच वर्षांत या भागात आपले जाळे घट्ट विणतानांच अनेक लोकाभिमुख उपक्रम त्यांनी व त्यांच्या पत्नी सविता गायकर यांनी राबविले आहेत. भाजपाने सद्या शंभर प्लसचा नारा दिलेला आहे. अशा परिस्थितीत दिनकर पाटील यांच्यासाठी ही निवडणूक अस्तित्वाची लढाई आहे. त्यामुळेच भाजपा हा बालेकिल्ला शाबूत ठेवतो की दिनकर पाटील आपले वर्चस्व सिद्ध करतात. याचे उत्तर निवडणुकीनंतर मिळणार आहे.

विकासकामांचा अभाव
प्रभाग 9 मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून पाहिजे तसा विकास झालेला नाही. अंतर्गत रस्ते असो वा पाण्याचा प्रश्न, हे वर्षानुवर्षे कायम आहेत. महापालिकेचा एकही मोठा प्रकल्प या भागात झालेला नाही. त्यामुळे प्रभागातील नागरिकांना साध्या साध्या
मूलभूत समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळेच प्रभागातील समस्या सोडविण्याबरोबरच विकास होण्यासाठी यावेळची निवडणूक लढविणार आहे.
– सविता गायकर, समाजसेविका

प्रभागात अनेक समस्या
प्रभागात अनेक ठिकाणी गुंडगिरी, दादागिरी, भाईगिरी मोठ्या प्रमाणात असल्याने या निवडणुकीत जनता हुकूमशाही असलेल्या लोकांच्या हातात प्रभाग क्रमांक 9 ची सत्ता देणार नाही. जनता हुकूमशाहीबद्दल उघड बोलत नसली, तरी मतपेटीतून योग्य उमेदवाराला निवडून देतील. प्रभागात मोठ्या प्रमाणात रस्ते, वीज, आरोग्याच्या अनेक समस्या सोडविण्यास माझे प्राधान्य राहील.
– अर्चना परशराम साठे

प्रभागात सुविधांचा अभाव
प्रभागात आत्तापर्यंत एकही राष्ट्रीयीकृत बँक नाही. ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र नाही. तरुणांना अद्ययावत असे जिम उभारलेले नाही. यूपीएससी, एमपीएससी परीक्षांसाठी अद्ययावत वाचनालय या प्रभागात झालेले नसल्याने आतापर्यंत अत्यंत दुर्लक्षित प्रभाग म्हणून या प्रभागाची नोंद झालेली आहे. सर्वसामान्य लोकांसाठी कुठल्याही विकासाचे व्हिजन या प्रभागात आत्तापर्यंत राबविण्यात आले नाही. नवीन जे कोणी निवडून येतील त्यांच्याकडून वरील सर्व कामांची अपेक्षा सर्वसामान्य नागरिक म्हणून आम्ही व्यक्त करत आहोत.
– नवनाथ शिंदे, नागरिक

पंधरा वर्षांंपूर्वीचे रस्ते
प्रभागात पंधरा वर्षांपासून रस्त्यांची कामे झालेली नाहीत. नवीन वसाहती अनेक वाढल्या. त्यात सुविधा नाहीत. मोकळे भूखंड डम्पिंग ग्राउंड झाले आहेत. पथदीपांचा अभाव आहे.
– प्रेम पाटील, इच्छुक उमेदवार