मनपाच्या शिक्षण विभागाचे नियोजन
नाशिक : प्रतिनिधी
महापालिकेच्या शिक्षण विभागाने यंदा शाळेच्या पहिल्याच दिवशी 16 जून रोजी विद्यार्थ्यांना शालेय गणवेश देण्याचे ठरवत त्यांचा पहिलाच दिवस गोड करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी काही दिवसांपासून शिक्षण विभागाने तयारी सुरू केली होती. मनपाच्या एकूण 96 शाळा असून, त्यात 28,750 विद्यार्थी शिक्षण घेतात. पहिल्या दिवशी जे विद्यार्थी शाळेत उपस्थित राहतील, त्यांना त्याच दिवशी हे साहित्य मिळेल. उर्वरित विद्यार्थ्यांनाही ते ज्या दिवशी शाळेत उपस्थित होतील, त्या दिवशी हे शैक्षणिक साहित्य देण्यात येईल, अशी माहिती शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आली.
गणवेशासाठी पालिकेला शासनाकडून 86 लाख 25 हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला असून, त्या त्या शाळेला गणवेश देण्याचे अधिकार देण्यात आले आहे. त्यानंतर शाळेचे जे बिल होईल, ते मनपा शिक्षण मंडळाकडून सुपूर्द केले जाणार आहे. मनपाच्या सर्व शाळांतील विद्यार्थ्यांना शासनाकडून मोफत पाठ्यपुस्तकेही दिली जाणार असून, त्याबाबतचे नियोजनही सुरू आहे. गणवेशासह विद्यार्थ्यांच्या पाठ्यपुस्तकांसाठी लवकरच केंद्रप्रमुख व मुख्याध्यापकांची बैठकही घेतली जाणार आहे. शाळानिहाय वाटपाचे नियोजनही पूर्ण झाले आहे. या साहित्यामुळे पालकांवरील आर्थिक भार कमी होत असतो. तसेच विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमातील क्रमिक पुस्तके राज्य शासनाकडून देण्यात येणार आहेत. दरम्यान, शासन परिपत्रकानुसार विद्यार्थ्यांना दोन गणेवशाचे सेट देण्यात येणार आहे. त्यात पहिल्या टप्प्यातील गणवेश वाटप झाल्यानंतर दोन महिन्यांनी दुसर्या टप्प्यातील गणवेशही देण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाने सांगितले आहे.