नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महानगरपालिकेत सन 2001 पासून ते आजपावेतो मयत कर्मचार्यांच्या वारसांना व वैद्यकीय कारणास्तव सेवानिवृत्त झालेल्या कर्मचार्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर एकत्रित वेतन (फिक्स पे) तीन वर्षांसाठी देण्यात येत होते., परंतु सदर धोरण हे अनुकंप कर्मचार्यांवर अन्याय करणारे होते. सदर विषयाला नाशिक महानगरपालिकेतील सी.आय.टी.यू (सीटू) या संघटनेने वाच्या फोडली. आणि अखेर वीस वर्षाच्या लढ्याला यश आले आहे.
त्या अनुषंगाने तत्कालीन आयुक्त यांनी सदर प्रस्ताव नगरविकास विभाग, महाराष्ट्र शासन यांचेकडे मंजूरीसाठी पाठविला होता. सदर प्रस्तावास शासनाने दिनांक 7 जून 2022 रोजी मंजुरी दिलेली असून त्या मंजूरी अन्वये आयुक्त रमेश पवार यांनी गुरुवार दिनांक 7 जुलै 2022 रोजी आदेश पारित करून नाशिक महानगरपालिकेतील अनुकंपा तत्वावर नियुक्त झालेल्या सर्व कर्मचार्यांना त्यांचे नियुक्ती दिनांकापासून नियमित वेतनश्रेणी देणे व त्या वेतनश्रेणीचा फरक अदा करणे, असे आदेशित केले आहे. या कामाबाबत नाशिक महानगरपालिकेतील अनुकंपा तत्वावर नियुक्त झालेले कर्मचारी किरण अशोक विधाते व प्रमोद अशोक निंबाळकर व सर्व अनुकंपा वरील कर्मचार्यांनी वेळोवेळी पाठपुरावा घेवून मोठ्या प्रमाणात मेहनत घेतली आहे. त्यांच्या या मेहनतीला आज खर्या अर्थाने यश आले असे म्हणता येईल.