गुटखा विरोधी अभियानाला यश; दोन दिवसात १० गुन्ह्यांची नोंद

– ग्रामीण पोलिसांची विशेष मोहिम
नाशिक – (विशेष प्रतिनिधी)
ग्रामीण जिल्हा पोलिसांनी हाती घेतलेल्या गुटखा विरोधी मोहिमेत दोन दिवसांमध्ये १० गुन्हे नोंदवले असून सात जणांना अटक करण्यात आली आहे. इगतपूरी व घोटी येथे आंतरराज्यीय टोळीविरोधात कारवाई करताना तब्बल दोन कोटींचा गुटखा जप्त करण्यात आला होता. आता विशेष मोहिमेत जिल्ह्यात होणारी विक्री व साठा यांची साखळी मोडून काढली जात आहे.
पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली गुटखा विरोधी मोहिम राबवली जात आहे. दिनांक ०६ जून रोजी दिवसभरात ग्रामीण पोलिसांनी कलम ३२८ भादवि प्रमाणे ०५ गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून ६०, १६८/- रक्कमेचा गुटखा व पानमसाला जप्त करून ०५ आरोपींना अटक केली होती. तर बुधवारी (दि. ०७) नाशिक ग्रामीण पोलिसांनी पान टपरीवर गुटख्याची विक्री करणा-या आणखी ०५ ठिकाणी कारवाई करून संबंधितांविरूध्द कलम ३२८ भादवी खाली गुन्हे नोंद केले आहेत. ही कारवाई आयेशानगर, आझादनगर, पिंपळगाव बसवंत, सिन्नर व सटाणा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये करण्यात आली आहे. या गुन्हयांत ०२ आरोपीतांना अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपी फरार झाले आहेत. स्थानिक पोलीस स्टेशनची पथके अशा आरोपीतांचा शोध घेण्यासाठी रवाना करण्यात आली आहेत.
गुटखा विरोधी मोहीम आणखी तीव्र करण्यासाठी सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या असून, याकामी पोलिसांकडून व्यापक शोध मोहीम राबवण्यात येत आहे. गुटखा, पानमसाला व अन्य प्रतिबंधक तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक, विक्री व साठवणूकी संदर्भात नागरिकांना काही माहिती असल्यास त्यांनी पोलिसांच्या हेल्पलाइन क्रमांक ६२६२२ ५६३६३ यावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *