शेतकर्याचा जिल्ह्यातील पहिला धाडसी प्रयोग
वावी : सुधीर ओझा
तालुक्यातील पांगरी बुद्रुक गावचे शेतकरी उत्तम वाळुंज यांनी आपल्या शेतात पहिल्यांदाच रेड कॉर्न अर्थात, लाल मक्याची लागवड केली आहे. दोन एकर क्षेत्रावर केलेल्या या लागवडीला चांगले यश आले असून, स्थानिक पातळीवर या जिल्ह्यातील पहिल्या प्रयोगाची मोठी चर्चा सुरू आहे. या पिकातून साधारण साठ क्विंटल उत्पादन मिळेल, असा अंदाज वाळुंज यांनी वर्तवला आहे.
वाळुंज यांनी या मक्याची जूनमध्ये लागवड केली आहे. सुमारे 110 ते 120 दिवसांच्या कालावधीत रेड कॉर्नचे पीक बहरून आले आहे. योग्य हवामान व व्यवस्थित पीक व्यवस्थापन केल्याने प्रतिएकर 25 ते 30 क्विंटलपर्यंत उत्पादन येईल, असा अंदाज आहे. साध्या मक्याला प्रतिक्विंटल 2,200 ते 2,500 रुपये दर मिळत असताना रेड कॉर्नसाठी मागणीमुळे 3,500 ते 4,000 रुपयांचा दर मिळण्याची शक्यता व्यापार्यांनी व्यक्त केली आहे.
भारतात मात्र हे पीक अजून नवीन असल्याने बाजारपेठेत प्रयोगात्मक टप्प्यावर आहे. निर्यातीसाठी प्रक्रिया उद्योगाने थेट खरेदीची तयारीही दाखवली आहे. त्याशिवाय आरोग्याबद्दल जागरूक ग्राहकांकडून याला चांगली मागणी मिळू शकते, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. रेड कॉर्नमुळे शेती क्षेत्रात नावीन्य आणि ग्राहकांसाठी आरोग्यदायी पर्याय अशी दुहेरी संधी निर्माण होत आहे. शेतकरी नव्या पद्धतींना सामोरे जाण्यास तयार असल्याचा सकारात्मक संदेश या प्रयोगातून दिसून आला आहे.
रेड कॉर्नच्या दाण्यांना आकर्षक लालसर रंग असतो. या रंगामागे अँथोसायनिन नावाचे नैसर्गिक अँटिऑक्सिडंट असते. वैज्ञानिकांच्या मते, अँथोसायनिन शरीरातील हानिकारक फ्री-रॅडिकल्सचा सामना करून हृदयाच्या आजारांपासून संरक्षण करते. शिवाय हे घटक कर्करोग प्रतिबंधक गुणधर्म दाखवतात. लाल मक्यातील फायबरमुळे पचनसंस्था मजबूत राहते, कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्यास मदत होते आणि रक्तातील साखरेची पातळी संतुलित राहते.
यात असलेले जीवनसत्त्व अ व कॅरोटिनॉइड्स डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त मानले जातात. त्यामुळे हा मका रोजच्या आहारात घेतल्यास आरोग्यासाठी अधिक लाभदायी ठरू शकतो. यामुळे हे आरोग्यपूरक धान्य म्हणून ओळखले जाते. अमेरिकेसह आशियातील काही देशांत या पिकाला मोठी मागणी असून, आता महाराष्ट्रातही शेतकरी प्रयोगशील वृत्ती दाखवू लागले आहेत. याशिवाय त्याचा वापर पॉपकॉर्न, पीठ, भाकरी, पेज अशा पारंपरिक स्वरूपात तर औषधनिर्मिती, आरोग्यपूरक पदार्थ आणि नैसर्गिक खाद्यरंग म्हणून होऊ शकतो. विदेशात या मक्याचा वापर पीठ, पॉपकॉर्न, टॉर्टिला, नाश्ता पदार्थ, तसेच हेल्दी स्नॅक्स तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात होतो. रेड कॉर्नपासून जनावरांना ऊर्जा मिळते, विशेषतः दूध उत्पादन वाढविण्यास मदत होते. जनावरांची रोगप्रतिकारकशक्ती वाढवते आणि जळजळ कमी करते. जनावरांची पचनक्रिया सुधारते आणि अपचन टाळण्यास मदत होते. स्निग्धता आणि दुधातील फॅट वाढविण्यास मदत करते.
अँथोसायनिन आणि व्हिटॅमिनमुळे जनावरांना संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण मिळते. फायबरयुक्त असल्यामुळे लघवी-संबंधित आणि अपचनासारख्या समस्या कमी होतात व पचनसंस्था मजबूत होते. त्वचा आणि केसांची चमक वाढते. मक्यातील पोषकतत्त्वांमुळे जनावरांंचे आरोग्य सुधारते. मेंढ्या, शेळ्या आणि कोंबड्यांसाठी लाल मका हा उत्तम खाद्य पर्याय आहे. गर्भवती जनावरांना मजबूत पोषण मिळते, ज्यामुळे वासराचे आरोग्य सुधारते. स्तनदा जनावरांना जास्त दूध उत्पादनासाठी आवश्यक पोषण मिळते.
पारंपरिक पिकांबरोबरच वेगळा व आरोग्यदायी प्रयोग करण्याची गरज मला जाणवली. मी पहिल्यांदाच रेड कॉर्नची लागवड केली. सुरुवातीला थोडी भीती होती, पण पीक चांगले जमले आहे. उत्पादन आणि भाव या दोन्ही बाबतींत हे पीक
आशादायक आहे. बाजारात आरोग्यदायी धान्यांची मागणी पाहता रेड कॉर्न शेतकर्यांसाठी फायदेशीर पर्याय ठरू शकतो.
– उत्तम वाळुंज, प्रयोगशील शेतकरी