काटेकोर नियोजनातून द्राक्षशेतीत यशस्वी वाटचाल

सोनेवाडी बुद्रुक येथील निचित परिवाराची प्रेरणादायी यशोगाथा

निफाड : अण्णासाहेब बोरगुडे
परंपरागत शेतीला आधुनिकतेची जोड देत द्राक्षशेतीत उल्लेखनीय यश मिळवणार्‍या निफाड तालुक्यातील सोनेवाडी बुद्रुक गावातील सागर निचित या प्रगतिशील शेतकर्‍याची ही प्रेरणादायी कहाणी आहे. बी.एस्सी. शिक्षण पूर्ण केलेल्या तरुण शेतकर्‍याने वडिलांच्या मार्गदर्शनाखाली शेतीची सूत्रे हाती घेतली आणि आज द्राक्षशेतीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
सागर निचित यांच्याकडे एकूण बारा एकर जमीन असून, त्यांपैकी सहा एकर क्षेत्रावर द्राक्षाची लागवड केली आहे. थॉम्सन सीडलेस, अनुष्का, 1530 व्होलकनी, अशा उच्च दर्जाच्या जातींची लागवड करून त्यांनी गुणवत्तापूर्ण उत्पादनावर भर दिला आहे. वडिलांनी 1999 मध्ये सुरू केलेली द्राक्षशेती त्यांनी पुढे आधुनिक पद्धतीने विकसित केली असून, गेल्या दहा वर्षांपासून ते स्वतः सक्रियपणे शेती करत आहेत. पीपीएफ फार्मच्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनामुळे आणि त्यांच्या यशस्वी शेतीकडे पाहून त्यांना द्राक्षशेती करण्याची प्रेरणा मिळाली. त्यांच्या शेतीतील यश पाहून आणि योग्य मार्गदर्शन मिळाल्यामुळे सुरुवातीच्या काळात फारशा अडचणी आल्या नाहीत. योग्य रूटस्टॉक, संतुलित स्पेसिंग, सराइंगल पद्धतीचे ट्रेनिंग व छाटणी, तसेच ठिबक सिंचनाचा प्रभावी वापर हे त्यांच्या यशाचे प्रमुख गमक ठरले आहे. शेतीत ऑरगॅनिक व इनऑरगॅनिक खतांचा संतुलित वापर, दरवर्षी माती परीक्षण आणि आवश्यकतेनुसार पीजीआरचा वापर केला जातो. कृषी तज्ज्ञ, प्रशिक्षण शिबिरे व केव्हीकेमार्फत सतत मार्गदर्शन घेतल्यामुळे उत्पादनात सातत्य राखणे शक्य झाले आहे.
सध्या एकरी सरासरी 9 ते 11 टन प्रीमियम दर्जाचे द्राक्ष उत्पादन मिळते, तर 23 टन उत्पादन स्थानिक बाजारासाठी जाते. चांगल्या हंगामात उत्पादन 1,112 टनांपर्यंत पोहोचते. हेक्टरी आठ लाख रुपये खर्च असून, अनुकूल परिस्थितीत हेक्टरी 12 ते 13 लाख रुपये उत्पन्न मिळते. बहुतांश द्राक्षे निर्यातक्षम असून, ब्रिटनसारख्या देशांत निर्यात केली जाते. द्राक्षशेतीमुळे निचित कुटुंबाची आर्थिक स्थिती लक्षणीय सुधारली आहे. उत्पन्न दुप्पट झाले असून, घर, जमीन आणि आधुनिक शेती यंत्रसामग्री अशी स्थावर मालमत्ता निर्माण झाली आहे. नवीन द्राक्ष उत्पादकांना मार्गदर्शन करताना ते सांगतात की, द्राक्षशेतीत यश मिळवायचे असेल, तर शंभर टक्के लक्ष देणे, काटेकोर पाणी नियोजन करणे आणि योग्य व्यवस्थापन ठेवणे आवश्यक आहे. या बाबी पाळल्या तर द्राक्षशेती फायदेशीर ठरू शकते. ही यशोगाथा प्रेरणादायी ठरत आहे. आधुनिक तंत्रज्ञान, नियोजन व मेहनतीच्या जोरावर शेतीत समृद्धी साधता येते.

Successful progress in grape farming through careful planning

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *