*हिप हॉप रॅपवर थिरकत फुल टु एन्जॉय करत इलेक्ट्रिफाईंग वातावरणात दोन दिवसीय सुला फेस्टचा समारोप*
नाशिक : प्रतिनिधी
संगीताच्या तालावर थिरकणारी तरूणाई, आकर्षक विद्युत रोषणाई आणि सोबतीला वाईन ग्लास, असा इलेक्ट्रिफाईन वातावरणात वाइनची झिंग अन् डीजे रॉक्स संगीताच्या साथीने सुलाफेस्ट महोत्सवाला चारचाँद लागले.
आशियातील अग्रगण्य महोत्सव असलेल्या दोन दिवशीय सुला फेस्टचे सुला विनीयार्ड येथे आयोजन करण्यात आले होते. पहिल्या दिवशी सुमारे पाच हजार नागरिकांनी या महोत्सवाला गर्दी केली होती. काल रविवार असल्यामुळे गर्दीने नवा उच्चांक प्रस्थापित केला. पाच हजारांपेक्षा अधिक युवक- युवती, तरुणांची गर्दी पाहावयास मिळाली. पहिल्या दिवशी कालीकर्मा (डाऊन टेम्पो इलेक्ट्रॉनिका), पिंक मॉस (आर बी/निओ सोल), परवाज (प्रोग्रेसिव्ह रॉक), व्हेन चाय मेट टोस्ट (इंडी फोक), ड्युअलिस्ट इन्क्वायरी (लाइव्ह इलेक्ट्रॉनिका) आणि डिवाइन (हिप-हॉप/रॅप) यासारख्या प्रसिद्ध कलाकारांनी आपल्या उत्कृष्ट सादरीकरणांनी वाइनप्रेमी नागरिकांना अक्षरश: खिळवून ठेवले. तर काल समारोपाच्या दुसर्या दिवशी वाइल्ड वाइल्ड वुमन हिप हॉप रॅप साँगवर उपस्थितांनी एन्जॉय केला. इजी वाँडरलिंग्समध्ये राजस्थानी संगीताची मेजवानी मिळाली. अंकुर तिवारी आणि घळत टीमने सादर केलेल्या इंडी पॉप परफॉर्मन्सवरही उपस्थितांना डोलायला लावले. रित्वीज बीटुबी आणि करण कांचन यांच्या इलेक्ट्रॉनिका बँण्डच्या तालावर रसिकांनी जल्लोष केला.
सुला विनियार्डच्या हिरवळीवर आकर्षक विद्युत रोषणाईच्या साथीने वाइनचा पेग घेत अनेकांनी सायंकाळ रम्य बनविली. संगीतासोबत सादर झालेल्या वेगवेगळ्या अॅक्टिव्हिटीजमुळे उपस्थितांनी फुल टु एन्जॉय केला.
वाइनबरोबरच चविष्ट खाद्यपदार्थ
सुला फेस्टमध्ये वाइनबरोबरच वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचेही स्टॉल मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेले आहेत. संगीत आणि वाईनबरोबरच जिभेचे चोचले पुरविणार्या वेगवेगळ्या अन्न पदार्थांची चव अनेकांनी चाखली. कबाब, पिझ्झा बर्गर, मेक्सिकन, चायनीज, इटालियन, ग्रीक फुडच्या लज्जतदार डिशवर खवय्यांनी ताव मारला. खाद्यपदार्थ अन् वाइनचे पेग रिचवत अनेकांसाठी संडे फन डे ठरला. येथे असलेल्या सुला फेस्ट बझारमध्ये अनेकांनी खरेदीचाही आनंद लुटला.
सेल्फी अन् फोटोसेशन
सुला फेस्टमध्ये येणार्या प्रत्येकाने याठिकाणी ठेवण्यात आलेल्या वाइनच्या बाटल्यांच्या प्रतिकृतीसह फोटो, सेल्फी काढण्याचा आनंद लुटला. येथे असलेल्या हिरवळीवर अनेकांनी सुला फेस्टमधील क्षण कॅमेर्यात कैद केले.
नेटवर्कचा कोणताच अडथळा येऊ नये यासाठी मोफत वायफायची सेवा उपलब्ध करुन देण्यात आली होती.
पुढील वर्षीही आयोजन :
सुला फेस्टच्या संगीत महोत्सवाच्या समारोपाप्रसंगी बोलताना सुला विनयार्डसचे संस्थापक आणि सीईओ राजीव सामंत म्हणाले की, नाशिककर नागरिकांकडून सुला फेस्टला इतका अविस्मरणीय उत्साह, आनंद आणि इतका उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला की आता 2027 मध्ये अशाच जल्लोषपूर्ण वातावरणात अधिक भव्यपूर्ण वातावरणात सुलाफेस्टचे आयोजन केले जाईल, असे त्यांनी सांगितले. यंदाच्या सुला फेस्टला नाशिककरांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल सामंत यांनी सर्व रसिकांचे तसेच सर्व नाशिकच्या नागरिकांचे आभार मानले.