मनसे तालुकाध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांचा समीर भुजबळांना पाठिंबा
नांदगाव मतदारसंघात आता निवडणूक रंगतदार अवस्थेत
नाशिक :प्रतिनिधी
नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांच्या ‘भयमुक्त नांदगाव, प्रगत नांदगाव’ या नाऱ्याने प्रेरित होऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नांदगाव तालुका अध्यक्ष सुनील कोल्हे व त्यांच्या सहकाऱ्यांनी भुजबळ यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे मतदारसंघातील भुजबळ यांचे पारडे जड झाले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नांदगाव तालुकाध्यक्ष सुनील केल्हे यावेळी म्हणाले की, निवडणुकीत आम्ही समीर भुजबळ यांना पाठिंबा देत आहोत. नांदगावचा सर्वांगिण विकास आणि दुष्काळ मुक्ती यासाठी आम्हाला समीर भुजबळ हेच योग्य उमेदवार वाटतात. माननीय छगन भुजबळ, पंकज भुजबळ आणि समीर भुजबळ हे सर्वजण विकासासाठी ओळखले जातात. विकासाचा भुजबळ पॅटर्न आता राज्यभरात ओळखला जातो. ही बाब ओळखूनच आम्ही भुजबळ यांच्या विकास कार्यामध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. नांदगावच्या मतदारांनी प्रचंड मतांनी शिट्टी या निशाणीवर मत देऊन भुजबळ यांना विजयी करावे, असे आवाहनही केल्हे यांनी केले आहे. नांदगाव तालुक्यात मनसेचा उमेदवार असतानाही विकास कामावर प्रभावित होऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने समीर भुजबळ यांना पाठिंबा देणे यातच समीर भुजबळ यांचे हात बळकट झाले आहेत. याप्रसंगी तालुका अध्यक्ष सुनील कोल्हे यांच्यासह विधानसभा संघटक सतीश अहिरे, नांदगाव तालुका उपाध्यक्ष बाळूभाऊ सुरांजे, विद्यार्थी सेनेचे तालुका उपाध्यक्ष कुणाल घुगे, वाहतूक सेनेचे तालुका उपाध्यक्ष साईनाथ शिंदे, विकास मोरे, अनिल गांगुर्डे आदींनी भुजबळ यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.