सिडको : विशेष प्रतिनिधी
सातपूर गोळीबार आणि अंबड येथील बंगला खंडणी प्रकरणातील संशयित आरोपी निखिलकुमार निकुंभ याला अंबड गुन्हेशोध पथकाने ठाणे जिल्ह्यातील मीरा-भाईंदर परिसरातून सापळा रचत ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निखिल निकुंभवर नाशिक शहरातील अंबड, सातपूर, सरकारवाडा, नाशिकरोड, घोटी व त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यांमध्ये विविध गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्याच्यावर सातपूर गोळीबारप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे.
अंबड पोलीस ठाण्यात बळजबरीने बंगला बळकावून खंडणी मागितल्याचा गुन्हादेखील दाखल केला होता.
अंबड गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार भूषण सोनवणे आणि भगवान जाधव यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार संशयित आरोपी मीरा-भाईंदर परिसरात लपल्याची माहिती मिळाली. पथकाने ठाण्यातील त्या भागात सापळा रचला आणि आरोपीला शिताफीने अटक केली.
त्यानंतर त्याला पुढील तपासासाठी सातपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
या कारवाईत वरिष्ठ पोलिस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत, पोलिस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, दिलीप सगळे, सुहास क्षिरसागर, प्रकाश बोडके, योगेश चव्हाण, भूषण सोनवणे, भगवान जाधव, चारुदत्त निकम आणि सविता कदम यांनी सहभाग नोंदवला.
गुन्हे शाखेच्या या धडाकेबाज कारवाईमुळे शहरातील सराईत गुन्हेगारांमध्ये एक प्रकारची धास्ती निर्माण झाली आहे. पोलिस दलाच्या कार्यक्षमतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे. नागरिकांकडून स्वागत केले जात आहे.