शिवसेनेचा ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील कुरघोडीच्या राजकारणाचे पडसाद महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात उमटत आहेत. अधिवेशन वादळी ठरण्याची परंपरा कायम राहिली असून, चौथ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना अधिवेशन कालावधीपर्यंत निलंबित करण्यात आले. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविषयी पाटील यांनी असंसदीय शब्द वापरल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यासाठी निमित्त ठरले ते ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील कुरघोडीचे राजकारण. दोन्ही गट एकमेकांना पाण्यात पाहत आहेत. उध्दव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांना अडचणीत आणण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न असल्याचे लपून राहिलेले नाही. बॉलीवूडचा अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि त्याची मॅनेजर दिशा सालियन यांच्या मृत्यूशी आदित्य ठाकरे यांचा संबंध असल्याचा आरोप शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत आणि नंतर पत्रकार परिषदेत केल्यानंतर महाराष्ट्रातील वातावरण तापले. त्यांनी केलेले आरोप लोकसभेच्या कामकाजातून काढून टाकण्यात आले असले, तरी त्याचे पडसाद विधिमंडळात उमटले. सुशांत सिंह याच्या मृत्यूच्या आधीच सालियनने आत्महत्या केली. सुशांत सिंह राजपूत याच्याशी अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिचे मैत्रीचे संबंध होते. तिनेच सुशांतकडून पैसे उकळले, त्याचा मानसिक छळ केला, अमली पदार्थांचे सेवन करण्याचे व्यसन लावले, असे आरोपही तिच्यावर झाले. तिची चौकशी करण्यात आली आणि वर्षभर तिला तुरुंगातही राहवे लागले. याच रियाला ‘एयू’ नावाने ४४ फोन करण्यात आले. हे फोन आदित्य ठाकरे यांनी केले, असे बिहार पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाल्याचा दावा शेवाळे यांनी करुन, चौकशीची मागणी केली. सुशांत आणि सालियन यांच्या मृत्यूशी आदित्य ठाकरे यांचा संबंध जोडण्याचा हा एक प्रयत्न शेवाळे यांनी केला. यावरुन सालियनच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने एक विशेष तपास पथक (स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम-एसआयटी) नियुक्त करण्याचे ठरविले. त्यावर विधानसभेत चर्चा करण्यात आली. चर्चेत सत्ताधारी पक्षाच्या बाजूने १४ सदस्य बोलल्यानंतर सभागृहात गोंधळ झाला. ठाकरे गटाचे केवळ भास्कर जाधव यांना बोलू देण्याची विनंती विरोधी पक्षाकडून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. ही मागणी नार्वेकर यांनी मान्य केली नाही. त्यानंतर जयंत पाटील यांना बोलू देण्याची विनंती करण्यात आली. जाधव यांनीही पाटील यांना बोलू देण्याची विनंती केली. याचवेळी पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांना उद्देशून “तुम्ही असा निर्लज्जपणा करू नका”, असे म्हटले. त्यावेळी सत्ताधारी बाकांवरून आमदारांनी
“जयंत पाटील यांना निलंबित करा”, अशी मागणी केली. विधानसभा अध्यक्षांनीही “जयंत पाटील, हे आपल्याकडून अपेक्षित नाही”, असे म्हणत नाराजी व्यक्त केली आणि कामकाज तहकूब केले. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांच्या दालनात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या आमदारांची बैठक झाली. या बैठकीमध्ये विधानसभा अध्यक्षांविषयी असंवैधानिक शब्दप्रयोग केल्याचा आरोप जयंत पाटलांवर ठेवण्यात आला. यावर अध्यक्षांनी जयंत पाटलांना अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्याची कारवाई केली. दरम्यान, अजित पवार यांनी दिलगिरी व्यक्तही केली होती. पण, अध्यक्षांनी त्याकडे दुर्लक्ष केले.
शेवाळेंनाही एसआयटी
ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील कुरघोडीच्या राजकारणात आणि सुशांत, रिया आणि सालियन प्रकरणावरुन जयंत पाटील यांना निलंबित करण्यात आले. सालियन मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याची मागणी सताधारी पक्षाकडून करण्यात आली. यावरील चर्चेत सत्ताधारी बाकावरील १४ सदस्य बोलले असताना विरोधी बाकावरील सदस्यांना बोलू देण्यात आले नाही. विरोधी पक्षाचे तुम्ही ऐकत नाही आणि तुम्हाला सभागृह चालवायचे की नाही? असा सवाल अजित पवार यांनी केला. अध्यक्षांनी विरोधी पक्षाच्या एकाही आमदाराला संधी देण्यास अध्यक्ष तयार नाही, हे पाहूनच जयंत पाटील यांचा पारा चढला असेल आणि त्यांनी असंसदीय शब्दाचा वापर केला असल्याचे दिसून येते. पाटील यांना निलंबित करण्यात आल्यानंतर विरोधकांनी कामकाजावर बहिष्कार टाकला. निलंबनानंतरही पाटील यांचा पारा आणखीच चढल्याचे दिसून आले. त्यांनी ‘हे सरकार निर्लज्ज आहे’ अशा स्वरुपाचे ट्विट केले. पाटील यांनी असंसदीय शब्दाचा वापर करणे चुकीचेच आहे. पण, यामुळे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होणार आहे. सरकारला घेरण्याची नवी रणनीती राष्ट्रवादी काँग्रेसकडून आखली जाण्याचे संकेत आहेत. सालियन मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय विधानसभेत होत असताना आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करणारे खा. राहुल शेवाळे यांच्यावर एका महिलेने केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याचा आदेश सभापती नीलम गोऱ्हे यांनी दिला. शेवाळे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचे आरोप केले असून या प्रकरणाची एसआयटी चौकशी व्हावी, अशी ठाकरे गटाच्या नेत्या मनीषा कायंदे यांनी केली. या महिलेवर बलात्कार झाला, तिला मारहाण झाली. तिने मुंबई पोलिसांकडे तक्रारदेखील दाखल केली आहे. तिने पंतप्रधान कार्यालय आणि राष्ट्रीय महिला आयोगाकडेही तक्रार केली. आहे. तिच्या जिवाला धोका असल्याचेही तिने म्हटले आहे. पोलिस आयुक्त तिच्या तक्रारीला दाद देत नाहीत. त्यामुळे याप्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी श्रीमती कायंदे यांनी केली. नार्वेकर यांनी अध्यक्षपदाचा वापर विधानसभेत केला. तसाच वापर श्रीमती गोऱ्हे यांनी विधान परिषदेत करुन शिंदे गटावर कुरघोडी केली.
पूजा चव्हाणही चर्चेत
सालियन मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी नेमली जात असताना पूजा चव्हाण या महिलेच्या मृत्यूच्या चौकशीसाठी एसआयटी नेमावी, अशी मागणी अजित पवार यांनी केली. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण समोर आल्यानंतर त्यावेळच्या महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला होता. तेच संजय राठोड आता शिंदे गटात असून मंत्रीही आहेत. राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी त्यावेळी विरोधी पक्ष आलेल्या भाजपाने केली होती. आता राठोड यांच्या पाठीशी भाजपा आहे. सत्तांतर झाल्यानंतर भूमिका बदलते. हा एक नमुना. दिशा सालियन हिने आत्महत्या केली तेव्हा नारायण राणे ठाकरे कुटुंबीयांवर आरोप केले होते. आपल्या मुलीने आत्महत्या केल्याचे तिच्या आईने म्हणत राजकारण्याचा आम्हाला त्रास होत असल्याचेही म्हटले होते. दिशा सालियनने आत्महत्या केली, त्या रात्री कोणतीही पार्टी सुरू नव्हती. तसेच मृत्यूच्या वेळी ती गरोदर नव्हती. तिच्यावर बलात्कार झाल्याचाही कुठला पुरावा आढळला नाही, असे पोलिसांनी चौकशीअंती सांगितलेले आहे. राणेंच्या आरोपात तथ्य नव्हते, असेही स्पष्ट झाले. मात्र, खा. शेवाळे यांनी केलेल्या आरोपानंतर एसआयटी स्थापन करुन शिंदे गटाने ठाकरे गटावर कुरघोडी केली आहे. सालियन मृत्यू प्रकरणावरील चर्चेत विरोधी पक्षांच्या वतीने भास्कर जाधव यांना बोलण्याची संधी नार्वेकर यांनी दिली असती, तर जयंत पाटलांवर कुरघोडीच्या राजकारणात निलंबित होण्याची वेळ आली नसती.