संशयास्पद आयव्हीएफ सेंटर रडारवर

चार पथकांकडून तपासणी

नाशिक : प्रतिनिधी
बदलापूर येथील स्त्री बीज तस्करीचे धागेदोरे नाशिकमध्ये आढळून आल्यानंतर खळबळ उडाली होती. मनपाच्या वैद्यकीय विभागाने बुधवारी (दि.4) मुंबई नाका परिसरातील मालती आयव्हीएफ सेंटरची मान्यता रद्द करत ते सील केले. दरम्यान, या प्रकरणानंतर वैद्यकीय विभाग सतर्क झाला असून, शहरात चोवीस आयव्हीएफ सेंटर असून, त्यांच्या तपासणीचे काम हाती घेतले आहे. यासाठी चार पथकांची नियुक्ती केली असून, तपासणीदरम्यान संशयास्पद आढळून आल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे मनपाच्या वैद्यकीय विभागाने म्हटले आहे.
शहरात एकूण 25 आयव्हीएफ केंद्रे असून त्यापैकी मालती आयव्हीएफ सेंटरवर कारवाई करण्यात झाल्यानंतर उर्वरित 24 केंद्रांची सखोल तपासणी सुरू केली आहे. सोमवार (दि.2)पासून शहरात तपासणी मोहीम हाती घेतली आहे. तीन दिवसांत 13 केंद्रांची तपासणी पूर्ण झाली आहे. नाशिक महानगरपालिका हद्दीत असलेल्या मालती आयव्हीएफ सेंटरच्या व्यवस्थापनाविरोधात बदलापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी आरोग्य विभागाला कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आयुक्त मनीषा खत्री व अतिरिक्त आयुक्त करिष्मा नायर यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या वैद्यकीय पथकाने गोविंदनगर येथील बेला व्हिस्टा इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील केंद्रावर धाड टाकून कागदपत्रे जप्त केली होती. आरोग्य सेवा विभागाच्या सूचनेनुसार बुधवारी केंद्राची नोंदणी रद्द करून सील करण्यात आले. तपासणी केलेल्या केंद्रात प्राथमिक तपासणीत कोणतेही गंभीर आक्षेप आढळले नसले, तरी कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत उर्वरित केंद्रांची तपासणी पूर्ण करून त्याचा सविस्तर अहवाल आरोग्य अधिकार्‍यांकडे सादर केला जाणार आहे. त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार आहे. दरम्यान, मालती आयव्हीएफ सेंटरमधून जप्त केलेल्या कागदपत्रांच्या सखोल तपासणीसाठी स्वतंत्र चौकशी समितीही नियुक्त करण्यात आली आहे. या अहवालानंतर केंद्रात नियमांचे उल्लंघन झाले आहे का, हे स्पष्ट होणार आहे.

बदलापूरच्या स्त्री बीज प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील चोवीस आयव्हीएफ सेंटरची तपासणी सुरू आहे. या चार पथकांकडे जबाबदारी देण्यात आली आहे. कागदपत्रे, परवानग्या व कार्यपद्धतीची पडताळणी केली जात आहे. कुठेही काही संशयास्पद आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल.
– डॉ. विजय देवकर, वैद्यकीय अधिकारी, मनपा, नाशिक

असे आहे पथक

पथकात सहा अधिकारी, कर्मचारी, विभागीय वैद्यकीय अधिकारी, स्त्रीरोगतज्ज्ञ तसेच आरोग्य विभागातील अन्य अधिकारी-कर्मचार्‍यांचा समावेश आहे.

Suspicious IVF center on radar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *