स्वामी विवेकानंद : युगानुयुगे युवकांना दिशा देणारे महापुरुष

1 2 जानेवारी हा दिवस भारतात राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस केवळ एका थोर संन्याशाचा जन्मदिवस नसून, तो भारतीय युवकशक्तीला आत्मबळ, आत्मविश्वास आणि राष्ट्रनिर्मितीची दिशा देणार्‍या विचारांचा उत्सव आहे. स्वामी विवेकानंद यांनी केवळ भारताच्या सांस्कृतिक श्रेष्ठतेला संपूर्ण विश्वात प्रतिष्ठा मिळवून दिली असे नाही, तर देशातील धार्मिक चेतनेच्या पुनर्जागरणातही मोलाची भूमिका बजावली. सव्वाशे वर्षांहून अधिक काळ लोटून गेल्यानंतरही त्यांचे विचार आजही तितकेच सुसंगत, प्रेरणादायी आणि मार्गदर्शक आहेत.
युवकांचे आदर्श मार्गदर्शक
स्वामी विवेकानंद आजही देशातील युवकांचे आदर्श मार्गदर्शक मानले जातात. ब्रिटिश राजवटीच्या काळात पाश्चात्य देश भारताकडे मागास, अंधश्रद्धाळू आणि असंस्कृत राष्ट्र म्हणून पाहत होते. भारताची अद्वितीय सनातन संस्कृती, तत्त्वज्ञान आणि गौरवशाली सभ्यता यांची त्यांना पुरेशी ओळख नव्हती. अशा परिस्थितीत 12 जानेवारी 1863 रोजी जन्मलेल्या नरेंद्रनाथ दत्तांनी म्हणजेच पुढे स्वामी विवेकानंद म्हणून ओळखल्या गेलेल्या त्या तेजस्वी व्यक्तिमत्त्वाने तरुण वयातच जगासमोर भारताची खरी ओळख उभी केली.
सनातन संस्कृतीचा
जागतिक उद्घोेष
स्वामी विवेकानंद भारतातील पहिले तरुण संत होते, ज्यांनी सनातन धर्माचा संदेश संपूर्ण विश्वात पोहोचवला. त्यांनी धर्म म्हणजे केवळ कर्मकांड नसून, तो मानवतेचा, सहिष्णुतेचा आणि विश्वबंधुत्वाचा मार्ग आहे, हे ठामपणे सांगितले. सनातन मूल्ये, धर्म आणि भारतीय संस्कृतीची श्रेष्ठता त्यांनी जागतिक पातळीवर अधोरेखित करून भारताचा मान उंचावला.
शिकागोचा ऐतिहासिक क्षण
11 सप्टेंबर 1893 रोजी अमेरिकेतील शिकागो येथे आयोजित जागतिक धर्म संसदेत केलेले स्वामी विवेकानंद यांचे भाषण इतिहासात अजरामर झाले. आपल्या भाषणाची सुरुवात त्यांनी जेव्हा माझ्या प्रिय अमेरिकन भगिनींनो आणि बांधवांनो या शब्दांनी केली, तेव्हा संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेले. त्या काही शब्दांतूनच त्यांनी भारतीय संस्कृतीतील प्रेम, आपुलकी आणि समानतेची भावना जगासमोर ठेवली. या अभूतपूर्व स्वागताबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना ते म्हणाले,
ज्या उबदार आणि सौहार्दपूर्ण वातावरणात माझे स्वागत करण्यात आले, त्यामुळे माझे हृदय आनंदाने भरून आले आहे. भारतभूमीवरील सर्व समाजघटक, वर्ग तसेच कोट्यवधी भारतीयांच्या वतीने मी आपले मनःपूर्वक आभार मानतो.
सहिष्णुता आणि
सार्वत्रिकतेचा संदेश
स्वामी विवेकानंद पुढे म्हणाले, की ज्या धर्म व राष्ट्राने जगाला सहिष्णुता आणि सार्वत्रिकतेचा धडा दिला आहे, त्या धर्माशी आणि राष्ट्राशी माझा संबंध असल्याचा मला अभिमान आहे. आम्ही केवळ सार्वत्रिक सहिष्णुतेवर विश्वास ठेवतो असे नाही, तर सर्व धर्मांना सत्याच्या स्वरूपात स्वीकारतो. या शब्दांतून भारताची सहिष्णु, सर्वसमावेशक आणि मानवतावादी संस्कृती जगासमोर स्पष्ट झाली.
धर्मनिरपेक्षतेचे ठाम पुरस्कर्ते
भारतीय संस्कृतीतील मूलभूत तत्त्व असलेल्या धर्मनिरपेक्षतेला स्वामी विवेकानंद अत्यंत महत्त्व देत असत. सार्वजनिक जीवनात धार्मिक सहिष्णुता टिकली पाहिजे, यावर त्यांचा ठाम विश्वास होता. जात किंवा धर्माच्या आधारे कोणताही भेदभाव न करता मानवसेवा करणे हाच श्रेष्ठ मानवधर्म आहे, असे ते मानत. त्यांच्या धर्मनिरपेक्ष विचारसरणीत तुष्टीकरणाला कोणतेही स्थान नव्हते. शिकागोच्या ऐतिहासिक भाषणानंतर त्यांनी युरोपचा दौरा केला आणि भारताच्या महान आध्यात्मिक वारशाची ओळख संपूर्ण पाश्चात्त्य जगाला करून दिली.
मातृभूमीप्रति अपार श्रद्धा
अमेरिका आणि ब्रिटनचा प्रदीर्घ प्रवास करून चार वर्षांनंतर जेव्हा स्वामी विवेकानंद भारतात परतले, तेव्हा त्यांनी मातृभूमीला साष्टांग दंडवत घालून नमन केले. त्यांच्या अंतःकरणात मातृभूमीप्रति अपार श्रद्धा आणि प्रेम होते. मातृभूमीचा कण-कण पवित्र आणि प्रेरणादायी आहे म्हणूनच मी या मातीत रमलेलो आहे, असे ते भावनिक शब्दांत सांगत.
परम विद्वान, विनम्र व्यक्तिमत्त्व
स्वामी विवेकानंद यांच्या महानतेविषयी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी लिहिले आहे. स्वामीजी महान यासाठी आहेत की, त्यांनी पूर्व आणि पश्चिम, धर्म आणि विज्ञान, भूतकाळ आणि वर्तमान यांमध्ये सुंदर समन्वय साधला. त्यांच्या शिकवणीतून देशवासीयांनी अभूतपूर्व आत्मसन्मान, आत्मनिर्भरता आणि आत्मविश्वास आत्मसात केला आहे. याच ऐतिहासिक संबोधनाने प्रभावित होऊन प्रख्यात ब्रिटिश इतिहासकार ए. एल. बाशम यांनी म्हटले होते की, स्वामी विवेकानंद यांना भविष्यात आधुनिक जगाच्या प्रमुख निर्मात्यांपैकी एक म्हणून सदैव स्मरणात ठेवले जाईल.
युवकशक्तीवर अढळ विश्वास
स्वामी विवेकानंद यांचा युवकांवर अढळ विश्वास होता. उठा, जागे व्हा आणि ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका, हा मंत्र त्यांनी युवकांना दिला. त्यांच्या मते परिवर्तनाची खरी अग्रदूत ही युवक पिढीच असू शकते. युवकांनी विशाल हृदय बाळगून मातृभूमी आणि जनतेच्या सेवेसाठी झटले पाहिजे, अशी त्यांची अपेक्षा होती. देशात जिथे कुठे संकट आहे, तिथे जा आणि दुःख दूर करा; देशाचे भविष्य तुमच्यावर अवलंबून आहे, असे ते युवकांना आवाहन करीत.
आजच्या काळातील
स्वामी विवेकानंद
स्वामी विवेकानंद हे आधुनिक भारतातील महानतम आध्यात्मिक गुरू आणि विचारवंतांपैकी एक होते. त्यांनी भारतीय संस्कृतीचा गौरव जागतिक स्तरावर पोहोचवला आणि युवकांना ऊर्जा, आत्मविश्वास व चारित्र्यनिर्मितीचा नवा मार्ग दाखवला. आजच्या बदलत्या काळातही त्यांचे तत्त्वज्ञान भारतीय युवकांसाठी दीपस्तंभासारखे आहे. स्वामी विवेकानंद यांनी दाखविलेल्या मार्गावर चालूनच श्रेष्ठ भारत, आत्मनिर्भर भारत आणि भारताला विश्वगुरू बनवण्याचे स्वप्न साकार होऊ शकते.

Swami Vivekananda: A great man who guided youth through the ages

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *