छगन भुजबळ मंत्रिमंडळात
उद्या मुंबईत शपथविधी
नाशिक : प्रतिनिधी
मंत्रिपद न मिळाल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून नाराज असलेले राष्ट्रवादीचे हेविवेट नेते छगन भुजबळ यांना अखेर पुन्हा मंत्रिपद मिळणार असून, सकाळी दहा वाजता ते मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. राजभवनात मंगळवारी सकाळी 10 वाजता शपथविधीचा कार्यक्रम होणार आहे. महायुतीच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा होती. आता त्यांना मंत्रिपद देऊन नाराजी दूर करण्यात येत आहे. राजभवनात 50 लोकांच्या उपस्थितीत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. त्यासाठी काल रात्रीपासूनच तयारी सुरू करण्यात आली आहे. मंगळवारी सकाळी 9 वाजता राजभवनामध्ये हजर राहण्याच्या सूचना अनेकांना देण्यात आल्या आहेत.
धनंजय मुंडेंचे खाते भुजबळांकडे?
बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी होती. आता तेच खाते राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळाना देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.
नाराजी दूर होणार?
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते असूनही महायुतीच्या मंत्रिमंडळात छगन भुजबळांना स्थान मिळाले नव्हते. त्यामुळे भुजबळ नाराज असल्याची चर्चा होती. मंत्रिपद न मिळाल्याची खंत त्यांनी अनेकदा व्यक्त केली होती. तसेच त्यांनी अजित पवारांवरही टीका केल्याचे दिसून आलं. भुजबळांची हीच नाराजी आता दूर करण्यात येणार आहे.
नाशिक जिल्ह्याला चार मंत्री
छगन भुजबळ यांच्या मंत्रिपदाच्या रूपाने नाशिक जिल्ह्याला आता चौथे मंत्रिपद मिळणार आहे. यापूर्वी शिवसेनेचे दादा भुसे, राष्ट्रवादीचे माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवाळ हे तीन मंत्री आहेत. आता भुजबळ यांच्या रुपाने चौथे मंत्रिपद जिल्ह्याला मिळणार आहे. एकाच जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तीन मंत्री आता होतील.