पैसे कोणाचेही घ्या, मतदान मात्र मलाच करा..!

झेरॉक्स नगरसेविकेच्या पतीची अनोखी मागणी

नाशिक ः प्रतिनिधी
प्रचार थांबला असला, तरी आता छुप्या प्रचारात वैयक्तिक मते मागण्यासाठी साकडे घातले जात आहे.त्यामुळे सिडकोमधील काही झेरॉक्स नगरसेवक पतीने सरळ जनतेला खुलेआम पैसे जो देत असेल त्याचे घ्या; परंतु मत आम्हालाच द्या, अशी गळ घालत आहे. या झेरॉक्स नगरसेविकेच्या पतीने भरचौकात, घरोघरी भेटीवेळी अशी गळ घातल्याने यानिमित्ताने पैशांचे वाटप नक्कीच होत असल्याची एकप्रकारे पुष्टी मिळाली आहे. यामुळे निवडणुकीच्या पूर्वसंध्येला हा चर्चेचा विषय ठरला होता.
नाशिक शहरात महापालिका निवडणूक आज (दि. 15) होत आहे. मतांचा जोगवा मागण्यासाठी उमेदवारांनी मतदारांपर्यंत पोहोचण्याचा हरतर्‍हेने प्रयत्न केला. प्रचाररॅली, सभा, जाहिरात, सायकल रिक्षांचा वापर, लाउडस्पीकर, सोशल मीडिया, वर्तमानपत्रे आदी सर्व प्रकारांनी मतदारांपर्यंत आपली प्रतिमा पोचविण्याचा प्रयत्न केला. निवडणुका म्हटल्या की, साम-दाम- दंड- भेद या सर्व प्रकारची प्रलोभने लोकांना दिली जातात. त्यांपैकी ’लक्ष्मी’दर्शनाच्या चर्चाही रंगताना दिसतात. त्यामुळे काहीही झाले, तरी मतदान आपल्याच पक्षाला देण्यासाठी अनेक प्रलोभने दिली जातात. पैसे, बक्षीस, मोफत सहल, महागड्या वस्तू आदींचे वाटप केले जाते. खरी उलाढाल मतदानाच्या दोन दिवस अगोदर दिसते.
पॅनल राजकारणाला तडे जात असल्याचे चित्र दिसत आहे. निवडून येण्याची धडपड इतकी तीव्र झाली आहे की, पैसे कोणाकडूनही घ्या, पण मत मलाच द्या, अशी थेट विनंती मतदारांकडे केली जात आहे. मतमोजणी दि. 16 तारखेला होणार आहे. या निवडणुकीसाठी एकूण एक हजार 395 उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केले होते. त्यांपैकी 666 उमेदवारांनी माघार घेतली असून, सध्या 735 उमेदवार रिंगणात आहेत.
गेल्या दोन आठवड्यांत प्रचार शिगेला पोहोचला होता. विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि स्टार प्रचारकांनी सभा, रॅलींच्या माध्यमातून नाशिकचे राजकीय वातावरण तापवले. चार उमेदवारांच्या पॅनलसह घराघरांत प्रचार, एकत्र फोटो, संयुक्त सभा अशा माध्यमांतून पॅनल निवडून आणण्याचे स्वप्न रंगवले जात होते. मात्र, 13 जानेवारी सायंकाळी पाच वाजता अधिकृत प्रचार संपल्यानंतर चित्र बदलले दिसले. काही उमेदवार स्वतंत्रपणे मतदारांच्या भेटी घेत वैयक्तिक विनवण्या करत आहेत. अटीतटीच्या लढतीत प्रत्येक मत महत्त्वाचे ठरत असल्याने प्रत्यक्ष भेट घेत विनवणी केली जात आहे. या वैयक्तिक डावपेचांकडे पक्षप्रमुखांचे लक्ष असून, शेवटच्या क्षणी कोणती समीकरणे बदलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Take anyone’s money, but vote for me..!

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *