टाकळी(विंचूर)येथील डॉक्टरचे अपहरण करून लूट करणारी टोळी ग्रामीण पोलिसांच्या  जाळयात

लासलगाव समीर पठाण

टाकळी(विंचूर)येथील डॉक्टरचे अपहरण करून लूट करणारी टोळी ग्रामीण पोलिसांच्या जाळयात सापडली असून या मोस्ट वॉन्टेड आरोपींनी अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर व नाशिक जिल्हयात विविध गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.

दिनांक १३ ऑक्टोबर रोजी रात्रीचे सुमारास टाकळी विंचुर,ता.निफाड येथील डॉ. विनोद चंद्रभान ढोबळे हे त्यांचे नांदूरमध्यमेश्वर येथील क्लिनिक बंद करून त्यांचे अल्टो कारमधून घरी जात असतांना विंचूर एम. आय. डी. सी.पार्क परिसरात दुचाकीवर आलेल्या अज्ञात तीन आरोपींनी त्यांची कार अडवून डोक्यास पिस्तूल लावून, त्यांना जबरदस्तीने कारमध्ये बसवून त्यांना येवल्याकडे घेवून जाऊन मारहाण व दमदाटी केली व त्यांचे खिशातील पैसे,एटीएम कार्ड,मोबाईल फोन जबरीने काढून घेवून,एटीएम कार्डद्वारे त्यांचे बँक खात्यातील रक्कम काढून घेतली तसेच त्यांचेच शर्टाने त्यांचे हात पाय बांधून तोंडात कोंबून निर्जनस्थळी सोडून देवून त्यांची अल्टो कार संमतीशिवाय लबाडीचे इराद्याने चोरी करून सुमारे २ लाख ६५ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जरबरीने चोरून नेल्याबाबत लासलगाव पोलीस ठाणेस गुर.नं २४८ / २०२३ भा.द.वि कलम ३९४, ३६५, ३४१, ३४ सह आर्म अॅक्ट ३ / २५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती माधुरी केदार-कांगणे यांनी सदर घटनेचा आढावा घेवून स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास वरील गुन्हा उघडकीस आणणेसाठी मार्गदर्शन करून सुचना दिल्या होत्या.त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी सदर गुन्हयाचे कार्यक्षेत्र व आरोपींची गुन्हा करण्याची पध्दत, तसेच यातील फिर्यादी यांनी आरोपींचे सांगितलेले वर्णन यावरून गोपनीय माहिती काढून सदर गुन्हा हा नैताळे येथील कुख्यात गुन्हेगार श्रावण पिंपळे व त्याचे साथीदारांनी केला असल्याचे खात्रीशीररित्या समजले. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी गुप्त बातमीदारामार्फत माहिती घेवून, बीड जिल्हयातील आष्टी व नगर जिल्हयातील जामखेड परिसरात दोन दिवस सापळा रचून स्थानिक पोलीसांचे मदतीने कुख्यात गुन्हेगार १) श्रावण उर्फ श्रावण्या सुरेश पिंपळे, वय २६, रा. नैताळे, ता. निफाड, जि. नाशिक यास शिताफीने ताब्यात घेतले. त्यास वरील गुन्हयाचे तपासात चौकशी केली असता, त्याने त्याचे साथीदार २) नितिश मधुकर हिवाळे, वय ३२, रा. राजुर रोड, पीर पिंपळगाव, जि. जालना, ३) सचिन शिवाजी दाभाडे, वय २५, रा. गोरक्षनाथनगर, हरसुल, जि. छत्रपती संभाजीनगर यांचेसह सदर गुन्हा केला असल्याची कबुली दिली आहे. यातील आरोपी नितिश हिवाळे व सचिन दाभाडे यांना जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्हयातून ताब्यात घेण्यात आले आहे. सदर आरोपींना वरील गुन्हयात अटक करण्यात आली असून मा.न्यायालयाने त्यांची पाच दिवस पोलीस कोठडी रिमांड मंजूर केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास लासलगाव लासळगावचे स.पो.नि.राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनखाली सुरु आहे.

यातील आरोपींकडे वरील गुन्हयाचे तपासात चौकशी केली असता,गेल्या आठवडयात त्यांनी विंचुर एमआयडीसी परिसरात नाशिक ते येवला बाजूकडे जाणारे रोडवर पाळत ठेवून एक अल्टो कारमध्ये आलेल्या इसमास पिस्तूलचा धाक दाखवून सदर कारचा ताबा घेतला व त्याचे हातपाय बांधून कारचे मागील बाजूस टाकून, त्याचे खिशातील रोख रूपये, एटीएम कार्ड व मोबाईल जबरीने काढून घेतले. तसेच सदर इसमास येवल्याचे दिशेने घेवून जावून त्यास दमदाटी करून एटीएमचे पिन कोड विचारून सुमारे २ लाख १० हजार रूपये काढून घेतले असून सदर इसमास त्याचेच शर्टाने हात-पाय बांधून निर्जनस्थळी सोडून देवून अल्टो कार जबरीने चोरून नेली असल्याचे तपासात समोर आले आहे. सदर आरोपींनी वरील गुन्हयात चोरी केलेली अल्टो कार व पिस्तूल त्यांचे साथीदारांकडे लपवून ठेवली असून फिर्यादीचे एटीएम व्दारे काढलेली रोख रक्कम आप-आपसात वाटून घेतली आहे.यातील आरोपी क्र. १) श्रावण पिंपळे हा सराईत गुन्हेगार असून त्याचेविरूध्द नाशिक व अहमदनगर जिल्हयात दरोडा, दरोडा तयारी, जबरी चोरी, घरफोडी, चोरी, खुनाचा प्रयत्न, आर्म अॅक्ट, आरोपी पलायन असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. सदर आरोपीने अलीकडील काळात वाळुंज एमआयडीसी जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे एका इसमावर पिस्तुलाने गोळी झाडून गुन्हा केलेला असून त्यात तो फरार आहे तसेच कोपरगाव व लोणी, जिल्हा अहमदनगर परिसरात देखील जबरी लुटमार केल्याचे गुन्हे दाखल आहेत.तसेच आरोपी क्र. २) नितिश हिवाळे याचेवर जालना व अहमदनगर जिल्हयात जबरी चोरी, मोटर सायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. वरील गुन्हयाचे तपासात यातील आरोपींकडून मालाविरूध्दचे अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती माधुरी केदार कांगणे यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सपोनि सागर कोते, सपोनि गणेश शिंदे, पोउनि नाना शिरोळे, पोहवा नवनाथ सानप, पोना विश्वनाथ काकड, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम, चापोकॉ नारायण पवार यांचे पथकाने वरील गुन्हेगारांना ताब्यात घेवून गुन्हा उघडकीस आणलेला आहे.सदर गुन्हयातील तपास पथकाने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी १५,०००/- रूपयांचे बक्षीस जाहीर करून त्यांचे अभिनंदन केले आहे.

नाशिक जिल्हयातील महामार्ग व ग्रामीण भागात रात्रीचे वेळी रस्त्याने प्रवास करणारे नागरीकांनी निर्जनस्थळी आपली गाडी थांबवू नये तसेच आपण गाडीत असतांना नेहमी ती आतून लॉक करून ठेवावी, अज्ञात इसमांनी गाडी थांबविण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना प्रवासी म्हणून बसवून घेवू नये, असे आवाहन नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *