अपक्ष उमेदवार सुभाष तिडके यांचा भाजपला पाठिंबा
पंचवटी : प्रतिनिधी
प्रभाग सहामध्ये सर्व समाज गुण्यागोविंदाने नांदत आहेत. या गावात कधीही जातीपातीचे राजकारण झाले नाही अन् होणार नाही. त्यामुळे जातीपातीचे राजकारण करणार्यांना या निवडणुकीत धडा शिकवून शहराच्या विकासासाठी भाजपचे चारही उमेदवार निवडून द्या, असे आवाहन आमदार अॅड. राहुल ढिकले यांनी केले.
नाशिक महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर प्रभाग क्रमांक 6 मधील राजकीय समीकरणे वेगाने बदलू लागली आहेत. रविवारी (दि. 11) मखमलाबाद येथे झालेल्या एका महत्त्वपूर्ण सभेत भारतीय जनता पक्षाचे गेल्या 40 वर्षांपासूनचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक सुभाष तिडके यांनी आपली अपक्ष उमेदवारी मागे घेत पक्षाला जाहीर पाठिंबा घोषित केला. ’पक्ष प्रथम आणि हिंदुत्व प्रथम’ हा विचार प्रमाण मानून त्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे प्रभाग 6 मध्ये भाजपची ताकद प्रचंड वाढली असून, विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
मखमलाबाद येथील माळी समाज मंगल कार्यालयात पार पडलेल्या या सभेत समस्त माळी समाजाने एकमताने भारतीय जनता पक्षाच्या पाठिंबा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. यावेळी नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले यांची प्रमुख उपस्थिती होती. सुभाष तिडके यांनी माळी समाजाच्या साक्षीने भाजप उमेदवारांच्या विजयाचा संकल्प करत सर्वांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन केले. गेल्या काही दिवसांपासून उमेदवारीवरून कार्यकर्त्यांमध्ये असलेली नाराजी दूर करून, पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना निवडून आणण्यासाठी आता सर्व गट-तट विसरून कामाला लागण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
आमदार अॅड. राहुल ढिकले यांनी जातीपातीच्या राजकारणावर कडाडून टीका केली. त्यांनी प्रभाग 6 मधील भाजपच्या चारही उमेदवारांच्या जमेच्या बाजू मांडल्या. चित्राताई तांदळे यांच्या दांडग्या जनसंपर्काचे त्यांनी कौतुक केले, तर पहिलवान वाळू (विश्वनाथ) काकड यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले की, वाळू काकड हे माझ्या सुख-दुःखातील 40 वर्षांचे सोबती आहेत. त्यांच्यातील लोकसेवेची वृत्ती आणि जातपातविरहित काम करण्याची पद्धत प्रभागाच्या विकासासाठी मोलाची ठरेल.
मनीष बागूल यांनी ज्येष्ठ नेते सुनील बागूल यांचा लोकसेवेचा वारसा समर्थपणे चालवावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. विरोधकांवर निशाणा साधताना हिरामण खोसकर यांच्या कार्यपद्धतीवर अप्रत्यक्षपणे टीका केली. लोकशाहीत मते विकत घेण्याची प्रवृत्ती जनता सहन करणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. तसेच प्रगतिशील शेतकरी आणि खासगी परफेक्ट मार्केटचे संचालक बापूशेठ पिंगळे यांच्या कार्याचा गौरव करत, रोहिणीताई पिंगळे यांच्या माध्यमातून शेतकरी वर्गाचे प्रश्न मांडले जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या सभेला क्षत्रिय काशी फुलमाळी समाजाचे अध्यक्ष बाळासाहेब तिडके, प्रल्हाद तिडके, समता परिषदेचे रावसाहेब शिंदे, दिलीप तांबे यांच्यासह ज्येष्ठ समाजसेवक सुनील बागूल, संजय बागूल, नारायणराव काकड, बाळासाहेब पिंगळे, देवराम पवार, रमेश माळी, राकाशेठ माळी, बापूशेठ पिंगळे आणि सचिन शिंदे उपस्थित होते. भाजपचे अधिकृत उमेदवार चित्राताई तांदळे, पहिलवान वाळू काकड, रोहिणीताई पिंगळे आणि मनीष बागूल यांनी या पाठिंब्याबद्दल समस्त माळी समाजाचे आभार मानले.