जानोरी ग्रामसभेत ठराव; तसा शिक्षक दिल्यास हजर न करून घेण्याचा पवित्रा
दिंडोरी : प्रतिनिधी
जिल्हा परिषद शाळांच्या शिक्षक बदल्यांमधील धोरणामुळे शहरापासून जवळ असलेल्या शाळांतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होत असल्याने जानोरी येथील जिल्हा परिषद शाळेत संवर्ग 1 चे शिक्षक 100 टक्के नेमणूक न करण्याबाबत ठराव जानोरी ग्रामसभेत केला आहे. शासनाने 100 टक्के संवर्ग एकमधून शिक्षक दिल्यास त्यांना हजर न करून घेण्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.
दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथे ऑगस्टची ग्रामसभा ग्रामपंचायत सभागृहात झाली. सरपंच सुभाष नेहरे अध्यक्षस्थानी होते. यावेळी ग्रामविकास अधिकारी नानाभाऊ खांडेकर यांनी इतिवृत्त वाचन केले. यावेळी गावातील विविध विषयांवर चर्चा केली. ग्रामस्थ संदीप गुंजाळ यांनी शिक्षक बदलीविषयी प्रश्न उपस्थित केला. शैक्षणिक वर्ष 2025-26 या वर्षाच्या जिल्हा परिषद शाळांच्या शिक्षकांच्या बदल्या ऑनलाइन पद्धतीने पार पडत आहेत. या बदल्या होत असताना शारीरिकदृष्ट्या व्याधी, आजार किंवा शारीरिकदृष्ट्या अक्षम असणार्या उमेदवारांना बदल्यांसाठी संवर्ग-1 प्रमाणे प्राधान्य दिले जाते. परंतु, सोयीच्या दृष्टीने प्रथम प्राधान्याने शहरापासून जवळच्या शाळांमध्ये बदली करून घेतात व त्यांना तशा बदल्या दिल्या जातात. त्यांच्या आरोग्यविषयक प्रश्नामुळे ही सुविधा देणे योग्यही आहे; परंतु हे सर्व करत असताना नाशिक शहराजवळील जिल्हा परिषद शाळेत एकूण शिक्षकांपैकी बहुतांश किंवा शिक्षक संवर्ग-1 मधील आहेत. शहरालगत जिल्हा परिषद शाळांमध्ये सर्व शिक्षक 53 पेक्षा अधिक वयोगटाचे व दुर्धर आजाराने व्याधिग्रस्त असतील तर विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण कसे मिळणार? हादेखील प्रश्न आहे. त्यातून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानदेखील आहे. शिक्षकांच्या बदल्या होत असताना संवर्ग 1 ला प्राधान्य दिले जाते, एकाच शाळेमध्ये 100 टक्के संवर्ग 1 चे शिक्षक न भरता यामध्ये ठराविक टक्केवारी बंधनकारक करून इतर शिक्षकांनादेखील अशा शाळांवर प्राधान्य देता येईल.
शहरालगत गावांनाच खासगी शाळांकडून आव्हान मिळत असल्याने पटसंख्येवर त्याचा परिणाम होणार आहे. शासनाच्या या धोरणामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊन खासगी शाळांमध्ये मुलांचे प्रमाण वाढत आहे.
जानोरी येथे संवर्ग 1 चे शिक्षक 100 टक्के नेमणूक करून दिल्यास आम्ही त्यांना हजर करून घेणार नाही, अशा तीव्र शब्दांत ग्रामस्थांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. याबाबत कार्यवाहीसाठी ग्रामसभेत ठराव करून वरिष्ठ कार्यालयास कळविण्यात यावे, असा ठराव सर्वानुमते मंजूर केला. यावेळी उपसरपंच हर्षल काठे यांनी त्यास अनुमोदन दिले. ग्रामसभेस ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडीसेविका, जिल्हा परिषद शाळा जानोरी व इंदिरानगर मुख्याध्यापक, महात्मा फुले विद्यालयाचे मुख्याध्यापक, वीज वितरण कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, आशा तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.