खग्रास चंद्रग्रहणामुळे मंदिरे ठराविक काळासाठी बंद

नाशिक : प्रतिनिधी
खग्रास चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख मंदिरांतील दर्शन व्यवस्थेत मंगळवार, दि. 3 मार्च रोजी तात्पुरता बदल करण्यात आला आहे. ग्रहणकाळात मंदिरांमध्ये दर्शन व्यवस्था पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.
त्र्यंबकेश्वर मंदिरासह शहरातील प्रमुख देवस्थानांमध्ये दुपारी 3.20 ते सायंकाळी 6.48 वाजेपर्यंत गाभार्‍यात प्रवेश, तसेच पूजा-अर्चा व दर्शन पूर्णतः बंद राहणार आहे. ग्रहण सुटल्यानंतर मंदिरात शुद्धीकरण विधी करण्यात येतील. त्यानंतरच भाविकांसाठी मंदिर पुन्हा दर्शनासाठी खुले करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
शहरातील कपालेश्वर मंदिर, काळाराम मंदिर, नवश्या गणपती मंदिर, सोमेश्वर मंदिर, चांदीचा गणपती मंदिर तसेच बालाजी मंदिर यांसह सर्व प्रमुख मंदिरांमध्येही याच वेळेत दर्शन बंद राहणार आहे.
दरम्यान, 3 मार्च रोजी धूलिवंदनची सुट्टी असल्याने दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. मात्र, ग्रहणकाळात कोणत्याही परिस्थितीत दर्शनाची परवानगी दिली जाणार नाही. त्यामुळे लांबून येणार्‍या भाविकांनी आणि पर्यटकांनी वेळेची विशेष नोंद घेऊन आपले नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
ग्रहणकाळात मंदिरांच्या नियमावलीनुसार पूजा-अर्चा, अभिषेक आणि दर्शन पूर्णपणे बंद ठेवले जाते. ग्रहणमोक्षानंतर पारंपरिक विधीनुसार शुद्धीकरण प्रक्रिया पार पाडल्यानंतरच नियमित धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात केली जाईल.

वर्षातील पहिले चंद्रग्रहण

या वर्षातील पहिले चंद्रग्रहण मंगळवार, दि. 3 मार्च रोजी होणार आहे. हे खग्रास चंद्रग्रहण असणार आहे. हे चंद्रग्रहण सिंह राशीत आणि पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात होईल. भारतात हे चंद्रग्रहण दिसणार आहे. ग्र्रहणाच्या नऊ तास आधी देशात सुतक काळ सुरू होईल. चंद्रग्रहण दुपारी 3.20 मिनिटांनी सुरू होईल आणि संध्याकाळी 6.46 मिनिटांनी संपेल. यावर्षीचे पहिले चंद्रग्रहण 3 तास 27 मिनिटे असणार आहे. 3 मार्च रोजी सकाळी 6.20 वाजता सुतक काळ सुरू होईल. यावेळेत शुभकार्य करण्यास मनाई असते.

Temples closed for a certain period due to lunar eclipse

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *