सिडकोत दहा वाहनांची तोडफाड

सिडको ः विशेष प्रतिनिधी
अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिडको परिसरात वाहन तोडफोडीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणेश चौक परिसरात दोन दिवसांपूर्वी 16 ते 17 आलिशान चारचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. या घटनेचा तपास सुरू असतानाच मंगळवारी रात्री सुमारे नऊच्या सुमारास पुन्हा एकदा टवाळखोरांनी धुडगूस घातल्याची घटना समोर आली आहे.
या ताज्या प्रकारात कामटवाडे परिसरासह सिडकोतील वेगवेगळ्या तीन ठिकाणी उभ्या असलेल्या आठ ते दहा चारचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आली. वाहनांच्या काचा फोडणे, आरसे तोडणे आणि बॉडीवर दगडफेक केल्याचे चित्र पाहायला मिळाले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे वाहनधारकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
सलग चार दिवसांत वाहन तोडफोडीच्या दोन घटना घडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. रात्रीच्या वेळी घराबाहेर पडण्यास नागरिक धजावत नसल्याचे चित्र असून, महिलांमध्ये आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये विशेष भीती दिसून येत आहे. या घटनांमुळे परिसरातील सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
वारंवार घडणार्‍या अशा प्रकारांवर अद्याप ठोस कारवाई होत नसल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. आरोपींचा तातडीने शोध घेऊन कडक कारवाई करावी, तसेच परिसरात रात्रीची गस्त वाढवावी, सीसीटीव्ही तपासणी अधिक प्रभावी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. पोलीस प्रशासन या प्रकरणात काय पावले उचलते, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *