नाशिक : प्रतिनिधी
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात दोन हजार कोटींची कामे होणार आहेत. गेल्या आठवड्यात नऊ कामांसाठी 298 कोटींच्या खर्चाला प्रशासकीय मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर महापालिकेच्या बांधकाम विभागाने या कामांची निविदा बुधवारी (दि.26) प्रसिद्ध केली.
शहरात मार्च 2027 पर्यंत एकूण एक हजार 268 कोटींची रस्त्यांची कामे केली जाणार आहेत. यापूर्वी पहिल्या टप्प्यातील 930 कोटींच्या रस्तेकामांना मुहूर्त लागल्यानंतर सिंहस्थ प्राधिकरणाने 298 कोटींच्या रस्तेकामांना प्रशासकीय मंजुरी दिली. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात कोट्यवधींची कामे होणार आहेत. रस्तेकामास विलंब होऊ नये याकरिता महापालिकेच्या बांधकाम विभागाने आधीच आराखडा तयार करून ठेवला आहे. त्यानुसार टप्प्याटप्प्याने सिंहस्थ प्राधिकरण या कामांना प्रशासकीय मंजुरी देत आहे. रस्त्याबरोबरच पूल, पाणीपुरवठा योजना, मलवाहिकांचा विस्तार, आरोग्य, स्वच्छता आदी कामे महापालिका प्रशासन आपल्या माध्यमातून
करणार आहे.
महापालिकेची आचारसंहिता लागण्यापूर्वी जास्तीत जास्त कामांना प्रशासकीय मंजुरी देऊन त्यांची वाट मोकळी करून देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. पहिल्या टप्प्यात शहरातील 18 ठिकाणच्या रस्तेकामांची निविदाप्रक्रिया राबवली जात आहे. या कामांसाठी ठेकेदार संस्था नियुक्ती केली जाणार आहे. लवकरच रस्तेकामांना सुरुवात होईल. रस्त्यांची एकूण 2,168 कोटींची कामे होणार आहेत. जास्त कालावधी लागणार्या कामांना प्राधान्य दिले जात आहे. यात रस्तेकामांना पंधरा महिन्यांपेक्षा जास्त अवधी लागणार असल्याने रस्त्यांची कामे मार्गी लावण्याचे नियोजन आहे.
या कामांसाठी निविदा प्रसिद्ध – कामाचे नाव- खर्च- काम करण्याची मुदत
1) नाशिकरोड मालधक्का व रेल्वे स्टेशन – 10 कोटी 5 लाख- मार्च 2027 2) नाशिकरोड छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, सत्कार पॉइंट रस्ता- 11 कोटी 65 लाख- मार्च 2027 3) अमृत मिरवणूक मार्ग – अमृत मिरवणूक मार्ग विकसित करणे- 25 कोटी- मार्च 2025 4) मुंबई नाका ते गडकरी सिग्नल, त्र्यंबक नाक्यापर्यर्ंत रस्ता विकसित करणे (व्हाइट टॅपिंग) – 14 कोटी 43 लाख 5) चांंदशी पूल ते जेहान सर्कल ते एबीबी सर्कल ते सिटी सेंटर मॉल पूल विकसित करणे – 59 कोटी 59 लाख- मार्च 2027 6) सिटी सेंटर मॉल पूल ते इंदिरानगर बोगद्यापर्यंतचा रस्ता- 13 कोटी 19 लाख 7) अ) टाकळी मलनिस्सारण केंद्र पूल ते निलिगिरी बाग ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 ब) रासबिहारी शाळा, राष्ट्रीय महामार्ग 4 ते राज स्वीट चौक, दिंडोरी रोड ते आरटीओ कार्यालय, पेठरोड ते मखमलाबाद रस्ता- एकूण खर्च 129 कोटी 23 लाख 8) पिंपळगाव खांब फाटा ते वडनेर गेटपर्यर्ंतचा रस्ता विकसित करणे – 18 कोटी- मार्च 2027 9) पाथर्डी फाटा ते पिंपळगाव खांब रस्ता – 17 कोटी 41 लाख