मॉकड्रील असल्याने प्रेस कामगारांनी सोडला सुटकेचा निःश्वास
नाशिकरोड : वार्ताहर
सायंकाळी प्रेस सुटण्याच्या दरम्यान अचानकपणे इंडिया सिक्युरिटी प्रेस गेटवर अतिरेक्यांनी बॉम्बस्फोट करत अंधाधुंद गोळीबार केला आणि सर्व भयभीत झाले. पाच अतिरेकी प्रेसमध्ये घुसल्याचे लक्षात आले. सीआयएसएफच्या सतर्क जवानांनी या अतिरेक्यांचा हल्ला व प्रेसवरील हल्ला परतवून लावण्यासाठी शर्थीने प्रयत्न केले.
आयएसपीच्या ग्रीन गेट भागात हे अतिरेकी घुसल्याचे लक्षात आल्यावर सीआयएसएफचे जवान व अधिकारी यांनी तातडीने प्रतिहल्ला केला. त्यात वर्कशॉपच्या बाजूला पळालेल्या अतिरेक्याला पकडण्यात या जवानांना यश आले. दुसरा दहशतवादी शेजारील ऑफिसमध्ये ठार केला, तर तिसरा अतिरेकी बाजूच्या प्रवेशद्वारात ठार केला. या अतिरेक्यांना पकडताच सीआयएसएफने त्वरित श्वान पथक पाचारण केले. पकडलेल्या अतिरेक्याची श्वान पथकाने तपासणी केली असता, मेटल डिटेक्टरनेही त्याची तपासणी केली असता, त्याच्या जवळ बॉम्ब मिळून आला. तो हस्तगत केला. त्याच्या बॅगचीही तपासणी केली. पण त्यात काहीही मिळून आले नाही. घायाळ झालेल्या अतिरेक्यांना डॉ. आदित्य कुलकर्णी व सिस्टर उपासना चव्हाण यांनी तपासणी केली असता ते मयत झाल्याचे दिसून आले. त्यांना प्रेसच्या रुग्णवाहिकेतून हॉस्पिटलला पाठविण्यात आले. दरम्यान, प्रेसचे अग्निशमन दल दाखल झाला. बॉम्बस्फोटामुळे लागलेली आग त्वरित विझविण्यात आली. चकमकीत चार अतिरेकी ठार करण्यात आले. एक जिवंत पकडण्यात आला. 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलने ही मॉकड्रील केली होती. जीव मुठीत धरलेले प्रेस कामगार ही मॉकड्रील असल्याचे समजताच त्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला. या मॉकड्रीलमध्ये सीआयएसएफचे कमांडंट ब्रिज भूषण, उपकमांडंट ऋग्वेद सावंत, असि.कमांडंट विजय सोनवणे, इन्स्पेक्टर एक्झिक्युटिव्ह कीर्तीकुमार, प्रदीप वसावे, सबइन्स्पेक्टर निर्मित कंभोज, जोगेश, रूपेश कुमार, अरविंद जाधव, देवेंदर खोकार, हवालदार संतोष गावंडे, सचिन शिंदे कॉस्टेबल विजय कुमार, अमोल खर्डे, एस. के. चव्हाणांसह 14 जण, पीआय कीर्ती पाटील यांच्यासह आठ जण, अँटी टेरर ब्रँचच्या प्रगती जाधव आणि सीआयएसएफचे 75 जवानांंचा सहभाग होता. नाशिकरोड पोलीस ठाण्याचे जितेंद्र सपकाळे, जितेंद्र माळी, प्रवीण सूर्यवंशी हे अधिकारी तसेच आयएसपी प्रबंधक लोकेश मीना यांचा यात सहभाग होता. चंद्रकांत कुमावत यांनी लकी डॉगला येथे
आणले होते.