शिवतीर्थावर ठाकरे बंधूंची गर्जना

मुंबई विकायला काढली, एवढी हिंमत आली कुठून? : राज ठाकरेे

मुंबई :
राज्यात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाने युती केली आहे. तब्बल 20 वर्षांनी ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. येथे रविवारी (दि. 11) राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेमध्ये बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘वेड्यावाकड्या पद्धतीने निवडणुका जिंकल्या जातात. तंत्र माहीत होते तेव्हा हा माज येतो. मुंबई विकायला काढली. देश विकायला काढला, आली कुठून ही हिंमत? कुणाला विचारायचे नाही, जनता काही नाही. आम्हाला वाटले म्हणून केले, असे सुरू आहे, असा हल्लाबोल यावेळी राज ठाकरे यांनी केला.
आम्ही एकत्र येण्याचे कारण म्हणजे मुंबईवर आलेले संकट. अनेक वर्षे मी यावर बोलत आलो, कशा प्रकारचा डाव रचला जातो? राज्य सरकारने मध्यंतरी हिंदी सक्तीचा प्रस्ताव आणला. मी कडाडलो आणि उद्धव ठाकरेही कडाडले. त्यावेळी मुलाखत झाली, त्यात मी म्हणालो, कोणत्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. तिथून या गोष्टीची सुरुवात झाली. तो हिंदी सक्तीचा विषय तुम्हाला चाचपडून पाहण्याचा होता. मनाला वाटेल ते करायला लागले. हे कोण आहेत लोकं? असा सवाल यावेळी राज ठाकरे यांनी या सभेत उपस्थित केला. दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, पैसे फेकले की विकत घेऊ, आला कुठून एवढा आत्मविश्वास? काँग्रेस सत्तेवर होती, अनेक लोक सत्तेत होती. पण ते लोकांना घाबरून असायचे. जनतेला घाबरून असायचे. आता गृहित धरून टाकलंय तुम्हाला. कुठून येतात मते यांच्याकडे कशी येतात? हे सर्व ठिकाणी सुरूच आहे. बोगस व्होटर आणि ईव्हीएम मशीनच्या लढाया सुरू आहेत.
अकोटमध्ये भाजपने एमआयएमशी युती केली. बदलापूरमध्ये काँग्रेसबरोबर भाजपने युती केली. 66 जणं बिनविरोध निवडून आले, लोकांना मतदानच करू दिले नाही. आज 66 आहेत, उद्या आकडे वाढत जाणार. त्यांना कळलंय लोकांना कसंही विकत घेऊ शकतो. विकले जातात याचं वाईट वाटतं. तुळजापूरमध्ये विनोद गंगणे ड्रग्स रॅकेटमधील माणसाला भाजपने तिकीट दिलं. तुमच्या नाकावर टिच्चून, बदलापूरमध्ये तुषार आपटे बलात्काराचा आरोपी त्याला नगरसेवक केलं. आली कुठून एवढी हिंमत, असा हल्लाबोल राज ठाकरे यांनी केला आहे. सन 2024 नंतर मला हे सारं समजू लागलं. साधारणत: विधानसभा निवडणुकीच्या आसपास आमच्या रिसर्च टीमकडून या सगळ्या गोष्टी मला कळायला लागल्या. ते पाहून मला धक्का बसायला लागला. आपण डोळे झाकून बसतो आणि आपल्या खालून काय खणलं जातं हे आपल्याला कळतच नाही. अनेक हिंदी इंग्रजी वृत्तवाहिन्यांना ब्लॉक करून टाकलेले आहे. कुणी काही तुम्हाला दाखवणार पण नाही. काही दाखवलं की वरनं फोन येतो, जाहिराती बंद केल्या जातील म्हणून दट्ट्या बसतो, असा आरोप राज ठाकरे यांनी केला.

मेवाभाऊंचा मुंबईचं परत बॉम्बे  करायचा डाव : उद्धव ठाकरे

मुंबई :
अहो मेवाभाऊ, तुम्ही आम्हाला काय शिकवताय? हे सगळं अडानीकरण चाललंय. आमच्या मुंबादेवीवरून मुंबईचं नाव ठेवलं. आता त्या मुंबईचं नाव बॉम्बे करण्याचा डाव चालला आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. रविवारी मुंबईत राज व उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना आव्हान दिले की, देवेंद्र फडणवीस मी तुम्हाला आव्हान देतो की, मोदींपासून ते तुमचं आणि तुमच्या खालच्या चेल्याचंपाट्यांचं अगदी वर्गातल्या मॉनिटरची निवडणूक असली तरी हिंदू-मुस्लिम असे नं करता केलेले भाषण दाखवा, आम्ही सर्व मिळून तुम्हाला एक लाख रुपये देतो. अशी बोचारी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केली.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, आता भाषणात राज ठाकरे जमलेल्या तमाम मराठी बांधवांनो आणि भागिनींनो म्हणाला आणि उद्धव ठाकरे जमलेल्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भागिनींनो म्हणालेे, यावरूनच उद्याच्या चर्चा होतील. आम्ही अस्सल मराठी बोलणारे देशभक्त हिंदू आहोत. राज यांनी आज उत्तम मांडणी केली.

Thackeray brothers roar at Shivtirtha

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *