आळसावलेल्या दुपारी सूर्य जरा हातपाय पसरून सुस्तावतो, निव्वळ जाळ, उकाडा, शुष्क अन् उदास वाटा. अंगणातल्या कोपर्यातला लाल चाफा निष्पर्ण होऊनही फांदीवर फुलांची हौस भागवताना काही फुलं झाडाखाली दाटीवाटीनं गालिचा अंथरतात. झाडाची सावली नसतानाही फुलांचा झाडावर विश्वास बघून नवल वाटतं, असंच असतं. आपलं माणूस म्हटलं की, सारंच जमायला लागतं कदाचित.
चाफा म्हणजे दरवळ असूनही, माहिती नाही का? पण लाल चाफ्याला सुगंध अगदी नावापुरताच असतो. इतर झाडांची पानं हलायचं नावही घेत नाही, कॉलनीतली वर्दळ अगदी निर्मनुष्य असते. भुलून भटकून काही घार्या डोळ्यांचे पक्षी गॅलरीत क्षणभर विसावतात, त्यांच्यासाठी ठेवलेलं दाणापाणी खाऊन-पिऊन उडून जातात. फक्त त्या वेळेची गरज भागेल इतकंच चोचीत घेतात. दुसर्या वेळेचे तहानभूक वाटेत येणार्या गॅलरीत, अंगणात वगैरे निभावून टाकत असतील. म्हणजे भिक्षुकरी संन्यासासारखं थोडंफार न ठरवता वागतात ही पाखरं. मोहरल्या आम्रतरूवर कोकिळ येऊनी बसते शीळ घालुनी काय सांगते मनात सल ठसठसते, काळजापासून कोकिळ कुणाला साद देतोय, जर आपणही कुहू त्याच सुरात म्हटलं तर तो परत आपल्या कुहूला प्रतिसाद देतो.
खिडक्यांमध्ये लावलेले मोठमोठाले कूलर आपापल्या घराला गारवा देत असतात. घराच्या जिवंतपणाचा भरदुपारी येणारा आवाज आजकाल
एसी मूळ बंद झालाय. जितकी माणसे घरात असतील तितकी नावं सहज नेमप्लेटवर मावतात.
अशा रुक्ष दुपारी ती सारं आवरून-सावरून जरा वेळ बेडवर पहुडते. जर चुकून डोळा लागला तर? उठल्यावर फार उदास वाटतं मग असं दुपारी झोप लागली तर दोन तास वाया घालवल्याचा फील येतो. फार बोअर, उदास वाटतं कारण काहीच नसतं तरीही…करायला तसं खूप काही असतं, पण काहीच करावसं वाटत नाही तिला. तसं कपाट आवरायचं आहे पण नको त्यापेक्षा जुन्या सुटकेस एकदा बघूया. वापरात नसलेल्या कपडे भरून ठेवलेल्या मोठाल्या दोन सुटकेस सज्यावरून खाली काढून, उघडायच्या आधी एक गोड स्माईल ओठांवर आपसूकच रेंगाळते. सुटकेस उघडल्यावर एका एका कपड्यावर मायेनी हात फिरवून ओंजारून, गोंजारून स्वतःशीच पुटपुटत खूप पसारा झालाय, काही कपडे काढून बाजूला ठेवते, कुणाला देता येईल. इवली इवली झबली, स्वेटर, लंगोट, टोप्या, सॉक्स, दुपटी, लोड, छोट्या मऊ गाद्या, अन काय काय ! एका वेगळ्या पिशवीत नको असलेले कपडे वेगळे काढताना लाल रंगाच्या जॅकीटवर नजर पडते. बारशाचा ड्रेस, फक्त एकदाच घातला अजूनही कोरा अन् नवीनच आहे. नीटनेटकं लावून, सुटकेस बंद करून पिशवीत वेगळे काढलेले कपडे खाली टाकते.
आई गं… हा तोच टी-शर्ट आहे, छान छान… तयारी करू या म्हटलं की, पिल्लू का कुणास ठाऊक एकच बरोबर शोधून आणायचा. त्याचा फेव्हरिट होता. घडी करून तो टी-शर्ट परत सुटकेसमध्ये ठेवतो…
दुपारच्या रखरखत्या उन्हात एक आवाज दुरून कुठूनतरी कानात शिरतो, ए…. जुन्या कपड्यावर भांडे घ्या…भांडे…. ती लगेच खिडकीजवळ जाते अन् पडदा बाजूला करून बाहेर बघू लागते. एक सायकलवाला, कॅरिअरवर खूप सारी भांडी एकात एक फसवलेली, कॅन, कढई, कढईत छोटे गंज, समोर कांदे-बटाटे ठेवायच्या टोपल्या, साईडला भलंमोठं गाठोडं, भांडी म्हणत नाही, तोच ती त्याला ओ आवाज देते आणि गेटजवळ थांबवते. भय्या पोर्चमध्ये आओ… तो आत येतो अन् फतकल मांडून खाली बसतो. लाओ दीदी कपडे, साहब के पुराने शर्ट, पॅन्ट, क्या क्या है सब लेकर आओ. और हा एक गिलास थंडा पानी भी लाना. ती गडवा ग्लास भरून आणते, घटाघटा पाणी प्याल्यावर तो परत विचारतो दीदी पुरानी साडी या, ड्रेस जो भी है लेकर आओ.
ती बेडरूममध्ये जाते, बेडचा ड्रॉवर उघडून, एक गाठोडं काढून खाली ठेवते. गाठोडं अन् बाजूची पिशवी उचलून ती बाहेर येते. हातातलं गाठोडं तिने खाली ठेवताच तो गाठ सोडायला घेतो. त्याच्या हातातलं गाठोडं स्वतःकडे खेचून तिच गाठ उकलते आणि एक-एक शर्ट, पॅन्ट, साडी, ड्रेस दाखवते. ती दाखवत असते आणि तो सिलेक्ट करून बाजूला ठेवत असतो. हा दीदी ये तीन ड्रेस, पाच शर्ट और चार पॅन्ट, इतनेमे बडा डिब्बा, या फिर कांदे रखनेकी टोपली क्या चाहिये आपको बोलो ? ये दो शर्ट जरा फटे हैं आपके घर मे तो, ऐसेही पडे रहेंगे, ये भी ले लू क्या? ती मान हलवते. अरे उस थैली में क्या है जी? नहीं कुछ नही उसमे, म्हणत त्यानी बघायच्या आधीच, ती पिशवी पाठीमागे लपवते. अरे दिखाओ तो सही अच्छासा ढक्कन वाला बर्तन दे दूंगा उसमे अरे नहीं… गलतीसे लेकर आयी हूँ थैली, नये कपडे हैं इसमे ये कपडे उठाओ और ये कांदे बटाटे की टोपली दे दो और हां तुम्हारे पास तेल रखने केे लिए बुटलं या फिर छोटी कटोरी है क्या? टोपली आणि एक तेलाचं बूटलं तिला देतो. रस्ता सामसूम, जवळच्या हायवे वरून एकट दुकट हॉर्न अन गाड्यांचे आवाज तितके माणसांच्या वस्तीत असल्याचे पुरावे देतात. ती पोर्चमधली पिशवी उचलून आत येते. किचनच्या ओट्यावर टोपली अन् बुटलं ठेवून बेडरूममध्ये जाते. हातातल्या पिशवीतले सगळे कपडे खाली टाकते. सुटकेस उघडते आणि एका एका छोटुल्या कपड्याची घडी करून सगळे कपडे जसेच्या तसे सुटकेशीत लपून ठेवते.
ती भरदुपारी नेहमीच आईपणाच्या आठवणींचा पसारा पसरवून बसते आणि परत आवरून नीट, काळजीने एक एक वस्तू जपून ठेवते. खरं म्हणजे ज्यावेळी काहीच करायची इच्छा होत नाही त्यावेळी असंच काहीसं करणं सवयीचं झालंय तिच्या. पंख फुटल्यावर पिल्लंं उडून जातात. परत येईपर्यंत सुटकेस काढायची, सगळं अस्ताव्यस्त करून परत परत स्पर्श करून बघायचं, तो गंध श्वासात भरून घ्यायचा. सुटकेस परत सज्यावर ठेवायची राहिलीच एखादी आठवण खाली, तर कवटाळून घ्यायची. अशातच दुपार आपोआप ढळून कधी संध्याकाळ येते पत्ताच लागत नाही.
खरं म्हणजे तिच्याही आयुष्याची दुुपारच आहे, दुपार किती उदास, रुक्ष असते ना! दुपारी रस्ता कितीही सामसूम असला तरी आत कायम वर्दळ असते.
That and afternoon
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…