होमपीचवर सर्वच नेत्यांच्या अस्तित्वाची लढाई

भाजपाच्या आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागणार

उच्चभ्र्रू आणि मध्यमवर्गीयांची लक्षणीय संख्या असलेल्या प्रभाग क्र. 7 मध्ये गेल्या निवडणुकीत भाजपाच्या विद्यमान तिन्ही आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. या ठिकाणी भाजपाने तीन जागा मिळविल्या होत्या. तर एका जागेवर शिवसेनेचे अजय बोरस्ते निवडून आले होते. आ. सीमा हिरे, आ. देवयानी फरांदे, आ. राहुल आहेर यांच्यासाठी प्रभागातील चारही लढती महत्त्वपूर्ण होत्या. कारण डॉ. आहेर यांच्या चुलत भगिनी माजी उपमहापौर शोभना आहेर व माजी स्थायी समिती सभापती बाळासाहेब आहेर यांच्या कन्या हिमगौरी आहेर-आडके या प्रभाग 7 ब मधून होत्या. सीमा हिरे यांचे दीर योगेश हिरे प्रभाग 7 ड मधून होते. तर प्रभाग 7 क मधून स्वाती भामरे या फरांदे समर्थक होत्या. खानदेशातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी भामरे यांना उमेदवारी देण्यात आली होती.
हिरे यांच्या समर्थनाला स्वामी समर्थ भक्त परिवार तसेच कळवण, सटाणा आणि मालेगाव या कसमा पट्ट्यातील मतदार मदतीला आले. या पट्ट्यातील मतदारांना आकर्षित करत डॉ. आहेर यांनी आपल्या बहिणीला विजय मिळवून दिला. भाजपाला तीन ठिकाणी विजय मिळाला, तर एका ठिकाणी प्रभाग 7 अ मध्ये शिवसेनेचे अजय बोरस्ते निवडून आले. बोरस्ते हे उपमहापौर राहिलेले आहेत. सुशिक्षित मतदारांमध्ये त्यांची चांगली ओळख असल्याचा फायदा बोरस्ते यांना झाला. त्यांच्या रूपाने एकमेव यश शिवसेनेला मिळाले होते. मात्र, आता शिवसेनेत फूट पडली आहे. अजय बोरस्ते यांनी काळाची पाऊले ओळखत शिंदेंच्या शिवसेनेत जाणे पसंत केले.
सध्या शिंदे गटामध्ये त्यांचाच बोलबाला आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाला या प्रभागात नवीन उमेदवार शोधावा लागणार आहे. प्रभाग 7 मध्ये सद्यस्थितीत भाजपाचे वर्चस्व आहे. यावेळी भाजपामध्ये इच्छुकांची संख्या चांगलीच वाढली आहे. त्यामुळे नाराजीचा फटका बसण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. शिवसेना शिंदे गटाचेही बर्‍यापैकी प्रभागात वर्चस्व आहे. मात्र, विरोधकांना या प्रभागात अस्तित्व सिद्ध करण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. नेतेमंडळींच्या घरातील व्यक्तीच या प्रभागात रिंगणात उतरणार असल्याने प्रत्येकालाच आपले अस्तित्व दाखवावे लागणार आहे. त्यामुळेच या प्रभागातील लढत लक्ष्यवेधी ठरणार आहे.
राजकीय परिस्थिती
प्रभाग सातमधील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता विरोधी पक्षापेक्षा महायुतीमध्येच वर्चस्वाची लढाई पाहायला मिळणार आहे. भाजपा आणि शिंदे गट शिवसेना यांच्यात दोस्तीतच कुस्ती पहावयास मिळत आहे. अजय बोरस्ते, सीमा हिरे, देवयानी फरांदे, चांदवड-देवळ्याचे आमदार राहुल आहेर अशा सर्व मंडळींचा राबता असलेला हा प्रभाग असल्याने येथे प्रत्येकालाच आपले अस्तित्व दाखवायचे आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना उबाठा या विरोधी पक्षांची ताकद या प्रभागात अगदीच तोळामासा झाली आहे. त्या तुलनेत भाजपा आणि शिंदे गटाचे मोठेच वर्चस्व दिसून येत आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांकडूनच येथे सर्वाधिक इच्छुक दिसून येतात. परिणामी, तिकिटासाठी येथे मोठी स्पर्धा आहे. त्यातही मागील पंचवार्षिकला योगेश हिरे हे या प्रभागातून निवडून आले होते. आता याच प्रभागातून आ. सीमा हिरे यांची कन्याही इच्छुक आहे. त्यात आ. हिरेंची कन्या सिडको भागातून लढणार की प्रभाग सातमधून, याबाबत अजून चित्र स्पष्ट नाही. भाजपाबरोबरच शिंदे गटाकडूनही इच्छुकांची संख्या वाढली आहे. त्याचा परिणाम तिकीट वाटपावरही होऊ शकतो. एकाच पक्षाकडून अनेक जण इच्छुक असताना ऐनवेळी जर तिकीट मिळाले नाही तर नाराजीला एकप्रकारे खतपाणी मिळून बंडखोरी झाली तर या बंडखोरीचा फटका बसणार नाही, याची काळजीही या नेतेमंडळींना घ्यावी लागणार आहे.

विद्यमान नगरसेवक

योगेश हिरे,

स्वाती भामरे,

अजय बोरस्ते,

हिमगौरी आडके,

इच्छुक उमेदवार

योगेश हिरे, स्वाती भामरे, अजय बोरस्ते, हिमगौरी आडके, प्रा. वर्षा भालेराव, आशा चव्हाण, प्रशांत आव्हाड, अजिंक्य फरांदे, किशोर शिरसाठ, बापूसाहेब शिंदे, देवदत्त जोशी, पवन भगूरकर, योगिता पाटील.

प्रभागात झालेली कामे

• प्रभागात स्वीमिंग टँकचे काम पूर्ण करण्यात आले.
• बाळासाहेब ठाकरे यांचे विविध पैलू उलगडणारे स्मृतिउद्यान नव्या पिढीसाठी प्रेरणा देणारे ठरले.
• सीबीएस ते कॅनडा कॉर्नर रस्त्याचे काँक्रिटीकरण केले.
• गंगापूर रोड येथे जलकुंभाचे काम करून पाण्याची समस्या सोडविली. • प्रभागात स्वीमिंग टँकचे काम पूर्ण करण्यात आले.
• बाळासाहेब ठाकरे यांचे विविध पैलू उलगडणारे स्मृतिउद्यान नव्या पिढीसाठी प्रेरणा देणारे ठरले.
• सीबीएस ते कॅनडा कॉर्नर रस्त्याचे काँक्रिटीकरण केले.
• गंगापूर रोड येथे जलकुंभाचे काम करून पाण्याची समस्या सोडविली.

रखडलेली कामे

• महापालिकेच्या वतीने महिला व्यावसायिकांसाठी मार्केट होणार होते, मात्र झाले नाही.
• जेहान सर्कल ते मखमलाबादकडे जाणार्‍या गोदावरीवरील वर्दळीच्या
पुलाचे काम अनेक वर्षांपासून पूर्ण झालेले नाही.

लोकसंख्या

• लोकसंख्या : 4438
• अनुसूचित जाती : 2811
• अनुसूचित जमाती : 2469

प्रभागातील समस्या

• गंगापूररोडकडून मखमलाबादला जाणार्‍या फॉरेस्ट पुलावर पूर आला की पुलावर पाणी साचते.
• होरायझन स्कूलजवळ नेहमी किरकोळ अपघातांत वाढ
• सर्वच प्रभागात कमी दाबाने पाणीपुरवठा, प्रमुख रस्त्यांचे काँक्रिटीकरण नाही
• गंगापूररोड, केबीटी सर्कल परिसरात नेहमीच वाहतुकीची कोंडी होते.
• घारपुरे घाट परिसरातील नदीकिनारी गाळाचे साम्राज्य
• गंगावाडी परिसरातील कचर्‍यामुळे डासांचे वाढते प्रमाण
• प्रभाग परिसरातील वीजतारा भूमिगत नसल्यामुळे किरकोळ अपघातांत वाढ झाली आहे.

प्रभाग परिसर

प्रसाद मंगल कार्यालय, थत्तेनगर, गोळे कॉलनी, डिसूझा कॉलनी, पोलीस हेडक्वॉर्टर, पंडित कॉलनी, पाटील लेन परिसर, रुंग्ठा हायस्कूल परिसर, घारपुरे घाट, जेहान सर्कल, कुसुमाग्रज गार्डन, सप्तशृंगी कॉलनी, डोंगरे वसतिगृह परिसर, हेमलता थिएटर, अशोक स्तंभ.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *