रविकिरण कॉलनीत सरपटणार्‍या प्राण्यांचा वावर

उद्यानात अस्वच्छता, नागरिकांचा महापालिकेला इशारा

सिडको विशेष प्रतिनिधी:
मनपा प्रभाग क्रमांक 31 मधील मारुती मंदिराजवळील रविकिरण कॉलनीमधील बगीच्यात सध्या मोठ्या प्रमाणात गाजरगवत वाढले आहे. यामुळे सरपटणार्‍या प्राण्यांचा वावर वाढला आहे. परिणामी परिसरातील नागरिकांबरोबरच बालगोपाळांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
या बगीच्याभोवती महापालिकेने कुंपण केले असले तरी आतमध्ये अनेक महिन्यांपासून गवत वाढलेले आहे. कचरादेखील मोठ्या प्रमाणात साठलेला आहे. यामुळे मैदानाचा उपयोग करणे नागरिकांसाठी धोकादायक झाले आहे.यासंदर्भात इच्छापूर्ती बहुउद्देशीय मित्रमंडळाने मैदान स्वच्छ करून नागरिकांना खुले करून देण्याची मागणी केली आहे. ठेकेदाराने बगीच्याचे प्रवेशद्वार 24 तास खुले ठेवले आहे; परंतु मैदानात वाढलेले गवत व अस्वच्छता यामुळे नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत.
संबंधित महापालिका अधिकार्‍यांना अनेक वेळा यासंदर्भात सांगण्यात आले असले तरी आजतागायत कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे सोसायटीतील रहिवासी व परिसरातील मंडळ पदाधिकारी आता स्वतः मैदान स्वच्छ करून निषेध नोंदवण्याचा निर्धार करत आहेत. यासंदर्भात इच्छापूर्ती बहुउद्देशीय मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष अभिजित खरोटे, विकास शर्मा, रोशन विचारे आणि बंडू दळवी यांनी पुढील दोन दिवसांत मैदान स्वच्छ न झाल्यास मंडळ स्वतःच स्वच्छता मोहीम राबवेल, असा इशारा दिला आहे.

स्वतः स्वच्छता करून महापालिकेचा निषेध करणार आहोत.
परिसरातील हे मोकळे मैदान स्वच्छ होऊन लहानग्यांसह ज्येष्ठांसाठी खुले झाल्यास सुविधा मिळेल. याबाबत महापालिका अधिकार्‍यांचे दुर्लक्षच होत आहे. म्हणून नागरिकच आता स्वच्छता करून निषेध नोंदवणार आहेत.
– अभिजित खरोटे, संस्थापक अध्यक्ष, इच्छापूर्ती बहुउद्देशीय मंडळ

महापालिका प्रशासन राजवट असल्याने वारंवार स्वच्छतेबाबत कळविण्यात आले आहे. प्रभागातील बगीचा स्वच्छतेबाबत पाठपुरावा केलेला आहे. नागरिकांबरोबर मीपण आहे.
– पुष्पा आव्हाड, माजी नगरसेविका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *