नाशिक : वार्ताहर
सात महिन्यांच्या बालिकेला जन्मदात्यांनी एका भिकारी महिलेजवळ सोडत पलायन केल्याचा प्रकार सीबीएस परिसरात घडला. सीबीएस बसस्थानक परिसरात बालिकेला एका गरीब महिलेकडे सोडून जन्मदाते पळून गेले. पोलीस बालिकेच्या पालकांचा शोध घेत आहेत.
मंगळवारी (दि. 14) पहाटेच्या सुमारास सीबीएस बसस्थानक परिसरात भिकारी महिलेजवळ सात महिन्यांची मुलगी असल्याची माहिती चाइल्डलाइनला मिळाली. त्यानंतर चाइल्डलाइननेे पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ सीबीएस बसस्थानकात दाखल होत बालिकेला ताब्यात घेतले. चाइल्डलाइनच्या मदतीने सिव्हिल रुग्णालयात दाखल केले. बालिकेवर उपचार करण्यात येत आहेत. तिची प्रकृती व्यवस्थित असून, पोलीस मुलीच्या पालकांचा शोध घेत आहेत.