वाहतूक शाखेकडून नवरदेवास हेल्मेट भेट

पंचवटी : सुनील बुनगे
वाहन चालवताना वाहतुकीच्या नियमांचे पालन व्हावे, यासाठी वाहतूक शाखेकडून जनजागृती येत असते. तर विवाहांमध्ये वधू -वरास मित्रमंडळी आणि नातेवाइकांकडून वेगवेगळ्या प्रकारे भेटवस्तू दिल्या जातात; परंतु शहर वाहतूक शाखेत कार्यरत असलेले वाहतूक शाखेचे पोलिस हवालदार सचिन जाधव यांच्या संकल्पनेतून विवाहात पोलिस उपआयुक्त मुख्यालय वाहतूक चंद्रकांत खांडवी यांच्या हस्ते नवरदेवास हेल्मेट भेट देत या ठिकाणीदेखील वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृतीचा संदेश दिला.
शहर पोलिस आयुक्तालयातील वाहतूक शाखा युनिट दोनचे पोलिस हवालदार सचिन जाधव यांच्याकडून वर्षभर शहरभर वाहतूक नियमांची जनजागृती करण्यात येत असते. तसेच शहर पोलिस आयुक्तालयाच्या वतीने स्टुडंट पोलिस कॅडेट अंतर्गत उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये वाहतुकीच्या नियमांबाबत मार्गदर्शन करून विद्यार्थी घडविण्याचे काम देखील करतात. आतापर्यंत जाधव यांनी मनपा तसेच इतर खासगी संस्थांच्या शाळांमधील शेकडो विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांची माहिती देऊन त्यांच्यामार्फत शहरात वाहतूक नियमांची जनजागृती करण्याचं कामदेखील
केलं आहे.

दरवर्षी पोलिस विभागाच्या वाहतूक विभागाकडून राबविण्यात येणार्‍या रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत शाळा, महाविद्यालय, विविध कंपन्या आदी ठिकाणी जाऊन हेल्मेट, सीटबेल्ट आदींबाबत माहिती देऊन जनजागृती करतात. त्याच अनुषंगाने रस्ता सुरक्षा अभियान 2025 अंतर्गत दि. 14 रोजी रुक्मिणी लॉन्स, दिंडे फॉर्म, औरंगाबाद रोड येथील एका विवाह सोहळ्यात वाहतुकीच्या नियमांबाबत संदेश देण्यासाठी नववधू-वरास चि. कुणाल व चि. सौ. कां. राजश्री यांना विवाहानिमित्त पोलिस उपआयुक्त मुख्यालय वाहतूक चंद्रकांत खांडवी यांच्या हस्ते हेल्मेट भेट देण्यात आले. या उपक्रमास वाहतूक शाखा युनिट दोनचे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिवाणसिंग वसावे, वाहतूक शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तुषार आढाव यांचे सहकार्य लाभले. विशेष म्हणजे, वर्षभरात विविध उपक्रमांतर्गत सचिन जाधव हे 50 ते 100 हेल्मेटचे वाटप स्वखर्चाने करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *