देशात माओवादी/नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवाया कमी झाल्या असल्या, तरी अधूनमधून ते डोके वर काढतात. आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओडिशा, झारखंड, बिहार, मध्य प्रदेश, छत्तिसगड, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र ही नक्षलग्रस्त राज्ये आहेत. सन २००० वर्षाच्या पहिल्या दशकाच्या सुरूवातीस देशात नक्षलग्रस्त जिल्ह्यांची संख्या २०० इतकी होती. ती आता ९० वर आली असून, नक्षली हिंसाग्रस्त जिल्ह्यांची संख्या ४५ वर आली असल्याचा सरकारचा दावा आहे. सन २०२४ पर्यंत माओवाद्यांपासून देश मुक्त करण्याचा संकल्प केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे. नक्षलग्रस्त राज्यांपैकी छत्तिसगडमध्ये माओवाद्यांचा प्रभाव कायम असल्याचे बुधवारी दंतेवाडामध्ये झालेल्या स्फोटाने अधोरेखित केले आहे. नक्षलवाद्यांनी घडविलेल्या स्फोटात एक खासगी वाहन भस्मसात झाल्याने १० पोलिस जवान शहीद झाले, तर वाहनचालकाचाही मृत्यू झाला. नक्षलवादी/माओवादी चळवळ थंडावली, असे मानले जात असताना हा स्फोट घडवून आणला गेल्याने माओवाद्यांचे छत्तिसगडमधील तळ शाबूत असल्याचे दिसून येत आहे. एखादी चळवळ थंडावली म्हणजे ती संपली, असे म्हणता येत नाही. पंजाबात अमृतपाल सिंगने दहशतवाद्यांचा मारला गेलेला म्होरक्या जर्नेलसिंग भिंद्रनवाले याचा अवतार देऊन खलिस्तान चळवळ जिवंत असल्याचे निदर्शनास आणून दिले. नक्षलवादी/माओवादी चळवळ पूर्णपणे नेस्तनाबूत झालेली नसल्याचे दंतेवाडा घटनेतून दिसून आले आहे. छत्तिसगढमधील बस्तर भागात नक्षलविरोधी अभियान प्रभावीपणे राबवल्याचा केंद्र आणि राज्य सरकारचा दावा फोल ठरला आहे. विजापूर व सुकमा हे दोन जिल्हे सर्वाधिक नक्षलप्रभावित आहेत. दंतेवाडात हिंसक कारवाया कमी झाल्याचा दावा केला जात होता. पण, ताज्या हल्ल्याने तेथेही चळवळीची पाळेमुळे खोलवर रुजल्याचे स्पष्ट झाले आहे. बस्तर विभागातील दर्भा भागामध्ये काही नक्षलवादी लपले असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांच्या डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्ड (जिल्हा राखीव रक्षक) या नक्षलविरोधी पथकाचे जवान खासगी वाहनातून त्या भागात गेले होते. तेथून परतत असताना अरनपूर आणि सामेली या दोन गावांदरम्यान नक्षलवाद्यांनी वाहनामध्ये ‘आयईडी’ (इम्प्रोवाईज एक्सप्लोझिव्ह डिव्हाईस) स्फोट घडविला. स्फोटामध्ये वाहनही पूर्णत: भस्मसात झाले. यामध्ये १० जवान आणि वाहनाचा चालक यांचा जागीच मृत्यू झाला. हिंसक कारवाया कमी झाल्या म्हणजे चळवळ संपली, असा अर्थ काढणे धोकादायक असल्याचे घटनेतून दिसून येत आहे. चळवळीबाबत गाफील राहता कामा नये, हाच या हल्ल्याचा केंद्र आणि राज्य सरकारला एक संदेश आहे.
छत्तिसगडमध्ये प्रभाव
सन २०१० साली माओवादी हिंसाचार चरमसीमेवर होता. यावर्षी १००५ सुरक्षा कर्मचारी आणि लोकांचा हिंसाचारात मृत्यू झाला होता. यानंतर हिंसाचार ७७ टक्के कमी झाला असून, २०२२ साली ७८ लोकांना (सुरक्षा कर्मचारी व नागरिक) आपले प्राण गमवावे लागले. हा सरकारचा दावा आहे. सरकारी आकडेवारी हिंसाचार कमी झाल्याचे दर्शवत असली, तरी माओवादी/नक्षलवादी यांच्या कारवाया थांबलेल्या नाहीत. एप्रिल २०२१ मध्ये छत्तिसगडमधील विजापूर आणि सुकमा जिल्ह्यांच्या सीमेवरील टेराम जंगलातील गोळीबारात २२ जवान शहीद झाले होते. यानंतर छत्तीसगडमध्ये झालेला हा सर्वात मोठा नक्षलवादी हल्ला आहे. सन २०१० नंतरही छत्तिसगडमध्ये हल्ले झालेले आहेत. मार्च २०१८ मध्ये सुकमा जिल्ह्यात आयईडी स्फोटात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे नऊ जवान शहीद झाले होते. एप्रिल २०१७ मध्ये सुकमा जिल्ह्यातच माओवाद्यांशी उडालेल्या चकमकीत केंद्रीय राखीव पोलिस दलाचे २४ जवान शहीद झाले होते. याआधी मार्च २०१७ मध्ये सुकमामध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलाचे १२ जवान शहीद झाले होते. या चकमकीनंतर माओवाद्यांनी शस्त्रेही पळवून नेली होती. मार्च २०१४- सुकमा जिल्ह्यात १५ सुरक्षा कर्मचारी शहीद, फेब्रुवारी २०१४- दंतेवाडा जिल्ह्यात सहा पोलिस अधिकारी शहीद, मे २०१३- छत्तिसगडमधील दर्भा खोर्यात २५ काँग्रेस नेते माओवाद्यांच्या हल्ल्यात ठार इत्यादी हिंसक घटना घडल्या. याशिवाय बिहार झारखंडमध्येही हिंसक घटना २०१० नंतर घडल्या. पण, सर्वाधिक घटना छत्तिसगडमधील असून, या राज्यात माओवाद्यांचे तळ कार्यरत असल्याचे दिसून येत आहे. ताज्या हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी छत्तिसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली. राज्य सरकारला सर्वोतोपरी मदतीचे आश्वासन त्यांनी दिले. बघेल यांनीही नक्षलवाद संपविण्यासाठी एकत्रित काम करणार असल्याची ग्वाही दिली. छत्तिसगडमधील नक्षलवादाचा अंत समीप आल्याचेही त्यांनी नमूद केले.सन २०२४ पर्यंत माओवाद्यांच्या हिंसाचारापासून देश मुक्त करण्याची घोषणा अमित शहा यांनी केली असली, तरी ही चळवळ येत्या काही महिन्यांत नेस्तनाबूत करण्याचे एक आव्हान आहे.
हल्ल्यांचा काळ
माओवाद्यांकडील अत्याधुनिक रायफल्स आणि काडतुसे संपत आली आहेत. त्यामुळे समोरासमोर लढा देणे टाळून आयईडी किंवा भूसुरुंगांचे स्फोट घडवून छुपे हल्ले वाढले आहेत. त्यांच्याकडील स्फोटके शोधून नष्ट करण्याची सुरक्षा पथकांकडील यंत्रणा अपुरी पडत असल्याने असे हल्ले रोखण्याचे मोठे आव्हान असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी मान्य केले आहे. हल्ले करण्यासाठी उन्हाळ्याची विशेष करुन निवड केली जाते. हिंसक कारवाया करण्यासाठी माओवाद्यांना उन्हाळा अनूकूल असतो. या काळात टॅक्टिकल काऊंटर ऑफेन्सिव्ह कॅम्पेन (रणनीतीक प्रतिहल्ला मोहीम) चालवतात. या मोहिमेत सुरक्षा दलांवर हल्ले करण्याची योजना आखली जाते. यामागचे कारण जुलैपासून मान्सून सक्रिय होत असल्याने जंगलांतील नाले तुडुंब भरुन वाहतात, सर्वत्र गर्द झाडी आणि गवत वाढलेले असते, अंधुकता निर्माण होत असते इत्यादी कारणांनी माओवाद्यांच्या कारवायांना मर्यादा येतात आणि ते आपल्या छावण्यांमध्ये जाऊन बसतात. सुरक्षा कर्मचारीही आपल्या शिबिरात परत येतात. पावसाळ्याआधी हल्ले करण्याची योजना आखली जाते. असाच एक हल्ला करण्यासाठी दर्भा भागामध्ये काही माओवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांना हुडकून काढण्यासाठी जिल्हा रिझर्व्ह रक्षक गेले होते. ते परतत असताना त्यांना लक्ष्य करण्यात आले. रस्त्यात स्फोटके पेरुन ठेवली जातात. त्यांचा अंदाज या जवानांना आला नसेलही. हल्ले करताना माओवाद्यांच्या गनिमी पद्धतीचा मुकाबला करण्यासाठीचे प्रशिक्षण जवानांना दिलेले असते. त्यानुसार मोहिमेत थोडी चूक झाली जवान सापळ्यात अडकतात. तसेच काहीसे घडल्याने १० जवान शहीद झाले. पण, यापुढे माओवादी/नक्षलवादी यांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवताना सुरक्षा यंत्रणांना गाफील राहून चालणार नाही.