कंपनीने बुजविलेल्या नाल्यावरील अतिक्रमण काढावे

जानोरी ग्रामपंचायतीची दुसर्‍यांदा नोटीस; शेतीचे नुकसान, वाहतुकीस अडथळा

दिंडोरी : प्रतिनिधी
नाशिक विमानतळासमोरील गट नंबर 1097 मधील तत्त्व सप्लिमेंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने नैसर्गिक नाल्यात अतिक्रमण करून बांधकाम केल्यामुळे नाला बुजला आहे. त्यामुळे पावसाळ्यात पाणी जाण्यास अडथळा निर्माण होत आहे. शेजारील शेतात नाल्याचे पाणी जाऊन शेतीचे नुकसान होत आहे. नाशिक विमानतळ रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. याबाबत जानोरी ग्रामपंचायतीने या कंपनीला दुसर्‍यांदा नोटीस देऊन नाला मोकळा करण्याचा तगादा लावला आहे.
नाशिक विमानतळासमोरील गट नं. 1097 मधील तत्त्व सप्लिमेंट प्रा. लिमिडेट कंपनीने गोडावून बांधण्यासाठी औद्योगिक प्रयोजनार्थ विकास परवानगी व प्रारंभ प्रमाणपत्र घेतले आहे. परंतु, सदर गट नं. 1097 शेजारील नैसर्गिक नाल्यात अतिक्रमण करून बांधकाम केल्यामुळे पावसाळ्यात व अतिवृष्टीच्या काळात पावसाचे पाणी जाण्यास अडथळा निर्माण होत आहे. शेजारील मिळकती व शेतकर्‍यांच्या शेतात नाल्याचे पाणी जाऊन शेतीचे नुकसान होत
आहे.
नाशिक विमानतळ रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे सदर कंपनीने औद्योगिक प्रयोजनार्थ विकास परवानगी व प्रारंभ प्रमाणपत्रात अटींचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले आहे. यापूर्वी जानोरी ग्रामपंचायतीने कंपनीला 27 जुलै 2023 रोजी नोटीस दिली होती. त्यानंतरदेखील कंपनीने सदरचे काम तसेच ठेवल्याने नैसर्गिक आपत्ती निर्माण होईल अशी परिस्थिती उद्भवली होती. 22 जून 2025 रोजी झालेल्या पावसाने सदर कंपनीच्या कंपाउंडला पाणी आडल्याने शेतकर्‍यांच्या शेतात पूरस्थिती निर्माण झाली होती. संबंधित शेतकर्‍यांनी ग्रामपंचायतीला झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी अर्ज केला होता. तसेच ग्रामपंचायत पेसा कार्यक्षेत्रात येत असल्याने सदरचा नैसर्गिक नाला बुजवण्यासाठी ग्रामसभेची परवानगी घेणे बंधनकारक असतानादेखील ती कंपनी मालकांनी घेतली नाही. त्यामुळे सदर कंपनीला दुसर्‍यांदा नोटीस बजावली आहे. सदर नाला पूर्ववत करून द्यावा, अन्यथा ग्रामपंचायत कंपनीवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

उपविभागीय अधिकार्‍यांनाही निवेदन
ग्रामपंचायतीने सदर कंपनीच्या मालकाला अनेक वेळा समज देऊनही कंपनी मालक ग्रामपंचायतीला सहकार्य करत नसल्याने सदर कंपनीने नाल्यात अतिक्रमण केल्याने कंपनीवर कारवाई होण्यासाठी जानोरी ग्रामपंचायतीने उपविभागीय अधिकारी आप्पासाहेब शिंदे यांना निवेदन दिले आहे. उपविभागीय अधिकारी कंपनीवर कोणती कारवाई करणार, याकडे जानोरी ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *