स्त्रीच्या अंतर्मनातील भावनांचा संगम- माय आणि माती

नागपूर येथील कवयित्री कीर्ती लंगडे यांचा माय आणि माती हा कवितासंग्र्ह दि. 10 मार्चला प्रकाशित होत आहे. त्यानिमित्ताने हा कवितासंग्रह नुकताच वाचनात आला. कवितासंग्रहातील कविता आणि मुखपृष्ठाचे बारकाईने वाचन केले असता, असे लक्षात येते की, माय आणि माती या दोन्हीही स्त्रीजीवनाचे प्रतिनिधित्व करणारे पात्र रेखाटले आहे. या कवितासंग्रहाच्या मुखपृष्ठावर वारली चित्रकलेच्या नमुन्यात साध्या रेषांनी एका स्त्रीचा चेहरा रेखाटला असून त्यात विविध रंगसंगती दाखवून स्त्रीच्या अंतर्मनातील भावभावनांचा अनोखा संगम अधोरेखित केला आहे. यावरून संग्रहाच्या साहित्यिक मूल्याचा अभ्यास करता येईल.
प्रसिद्ध मुखपृष्ठचित्रकार अरविंद शेलार यांच्या कल्पकतेतून साकारलेले हे मुखपृष्ठ केवळ एक चित्र नसून यातून विविध अंगाने स्त्रीजीवनाच्या अंतर्मनातील भावविश्व डोळ्यापुढे उभे केले आहे. मुखपृष्ठावरील स्त्रीच्या कपाळावरील गोल ठसठशीत लाल कुंकू स्त्रीसंस्कृती, शालीनसंस्कार आणि स्त्रीत्वाची ओळख करून देते. चेहर्‍यावरील भाव स्त्रीच्या मनातील संवेदना, त्याग, मातृत्व आणि भावनिकता यांची साक्ष देतात. कीर्ती लंगडे यांच्या माय आणि माती या कवितासंग्रहातील कवितांमधून मांडलेले विचार केवळ मुखपृष्ठावर चित्ररूपात साकारणे ही एक अद्भुुत कला मुखपृष्ठचित्रकाराने लीलया साध्य केली आहे.
माय आणि माती या कलाकृतीच्या मुखपृष्ठावरील स्त्रीचा चेहरा समाजातील स्त्रीजीवनाचे प्रतिनिधित्व करणारा आहे. थोडेसे झुकलेले डोळे,संयम आणि जीवनातील संघर्षातून झालेल्या जाणिवांचा परिचय करून देतात. स्त्रीच्या अंगी असलेल्या सोशिकतेचा परिचय डोळ्यातून दिसून येतो. विविध रंगांतून स्त्रीच्या आयुष्यातील सुख-दुःखाचे अनेक पदर उलगडून दाखवले आहेत. माय आणि माती दोन्ही जन्मदात्री आहेत. एक बाळाला जन्म देते, तर दुसरी बीजाला रुजवून नव्या सृष्टीला जन्म देते. आई होणं सोपं नाही. त्यासाठी अनेक संघर्षमय जीवन जगावे लागते. उदरात बीज वाढवावे लागते. असह्य वेदना उराशी जपाव्या लागतात आणि म्हणूनच कवयित्री माय आणि माती या शीर्षक कवितेत म्हणतात की,
माय आणि माती दोघी, जपे उदरी अंकुर.
अंश इवलासा तोही जन्म घेण्यास आतुर.
कळा आणि कळवळा, आहे दोघींचा समान
जीव अंतरी सुखात हेचि मायेचे प्रमाण.
अनादिकाळापासून स्त्री एका जोखडाखाली वावरत होती, निरक्षर राहून चूल आणि मूल याशिवाय तिचे विश्व नसे. रांधा, वाढा आणि उष्टी काढा हेच तिच्या जीवनात होते. मात्र, आता काळ बदलला आहे. शिक्षणाने तिच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. नवनव्या आशा-आकांक्षेच्या क्षितिजाच्या पलीकडे झेपावण्याची क्षमता तिच्या अंगी आली आहे. तिच्या आत्मसन्मानासाठी, समृद्धीसाठी तिने आता हिरवा रंग परिधान केला आहे आणि म्हणूनच मुखपृष्ठावरील स्त्रीच्या गळ्यात हिरव्या रंगाची ओढणी दाखवली असून, ती स्त्रीच्या आत्मसन्मानाचे प्रतीक आहे. या आत्मसन्मानामुळे स्त्री प्रत्येक क्षेत्रात नाव कमावत आहे. हाच आत्मसन्मान जपण्यासाठी कवयित्री बाई कवितेत समस्त स्त्रीवर्गाला आठवण करून देतात की,
चार भिंतीआड तीच, सोसत होती रे कळ.
आज मात्र आलं तिच्या पंखात स्वप्नाचं बळ.
चूल मूल आणि घर, याशिवाय नसे विश्व.
आज तिच्याही मनात, आशा आकांक्षाचे अश्व
साधारणतः गेल्या पंधरा-वीस वर्षार्ंत भ्रमणध्वनी आपल्यापासून घराघरांतला संवाद कमी झाल्याचा समाजातून आपल्याला सूर ऐकायला येत आहे. तासन् तास भ्रमणध्वनीवर विविध चलचित्र बघत बसून आबालवृद्ध आपला अनमोल वेळ वाया घालवत आहेत. मनामनांतील प्रेम, जिव्हाळा, माया, ममता आता फक्त पुस्तकात, कवितेत वाचायला मिळत आहे.
अजाणत्या वयातच संस्काराची बीजे मनात रोवून शब्दांशी मैत्री घडवीत वाचनाची अवीट गोडी अंतःकरणात रुजवणारे गुरू रामेश्वर नारायण टेकाडे यांना सन्मानार्थ व कृतज्ञतापूर्वक अर्पण केलेल्या माय आणि माती या कवितासंग्रहात कवयित्री कीर्ती लंगडे यांनी माय आणि माती, माय माझी, महिमा, बाई, आभाळ फाटलं, संस्कार, परंपरा, राखण, मागे वळून बघता, संवाद अशा एकूण 69 कवितांचा समावेश करून नागपूर येथील ज्ञानपथ पब्लिकेशन या संस्थेच्या माध्यमातून प्रकाशन करून ही कलाकृती वाचकांच्या हवाली केली आहे. मुक्तचिंतनातून माय आणि माती या कलाकृतीला सृजनाच्या तेवत्या वाती अशी प्रशंसा करून संग्रहाला एक वेगळी उंची दिली आहे, तर प्रसिद्ध साहित्यिक एकनाथ महाराज रावळ यांची अभ्यासू प्रस्तावना आणि प्रा. डॉ. कृष्ण साकुळकर (नागपूर) यांची पाठराखण हे कलाकृतीच्या पुढील वाटचालीस मोलाची भूमिका साकारणारी आहे.
माय आणि माती या कवितासंग्रहाचे वाचक स्वागत करतील या अपेक्षेसह कवयित्री कीर्ती लंगडे यांना पुढील दर्जेदार साहित्य कलाकृतीनिर्मितीसाठी खूप खूप शुभेच्छा!

The confluence of a woman’s inner feelings – mother and soil

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *