पालकमंत्रिपदाचा वाद चिघळला

गिरीश महाजन यांच्या दाव्यानंतर भुजबळांचेही प्रत्युत्तर

नाशिक : प्रतिनिधी
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. धुळ्यात दहीहंडी कार्यक्रमात बोलताना मी नाशिकचा पालकमंत्री होईल, असे वक्तव्य गिरीश महाजन यांनी केल्यानंतर अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी आमचे सात आमदार आहेत. त्यामुळे आम्ही दावा सोडणार नाही. असे म्हणत पालकमंत्रिपदावरून गिरीश महाजन यांना टोला लगावला. जळगावात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पालकमंत्री पदाबाबतचा निर्णय मुख्यमंत्री घेतील, असे सांगत महाजनांचा दावा खोडून काढला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 18 जानेवारी रोजी पालकमंत्र्यांच्या नियुक्तीची घोषणा केली होती. यात नाशिक जिल्ह्यासाठी भाजप नेते गिरीश महाजन यांची पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, या निर्णयाला शिवसेना शिंदे गटातील नेत्यांकडून विरोध झाल्यामुळे अवघ्या एक दिवसातच नाशिकच्या पालकमंत्रिपदाची घोषणा स्थगित करण्यात आली.
यानंतर अद्याप महायुतीत नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा कायम आहे. आता मंत्री महाजन यांनी धुळ्यातील एका कार्यक्रमात मोठा दावा केला आहे. नाशिक जिल्ह्याचा पालकमंत्री मीच होणार, असे त्यांनी म्हटले आहे.
नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी शिवसेना शिंदे गटाचे दादा भुसे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे छगन भुजबळ आणि माणिकराव कोकाटे हे प्रबळ दावेदार आहेत. मात्र, गिरीश महाजन यांच्याकडून आता थेट दावा करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. तर पालकमंत्रीपदावरून सुरू असलेला महायुतीतील वाद खरंच मिटला आहे का? असा सवाल आता गिरीश महाजन यांच्या वक्तव्यानंतर उपस्थित होत आहे. गिरीश महाजन यांनी धुळ्यात दहीहंडीच्या उत्सवात हजेरी लावली होती. यावेळी ते म्हणाले की, मी दरवर्षी दहीहंडी उत्सवासाठी धुळ्याला येत असतो. नाशिकला देखील मी जात असतो, त्या ठिकाणी मी पालकमंत्री होत आहे, असा दावा त्यांनी केला आहे.

आमचे सात आमदार : भुजबळ
गिरीश महाजनांच्या दाव्यावर राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नाशिकचा पालकमंत्री कोणालाही होऊ द्या. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीला मी नसतो. रायगडमध्ये आमची एक सीट असताना आम्ही पालकमंत्रिपदाचा आग्रह धरला आहे. नाशिक जिल्ह्यात आमचे सात आमदार असताना पालकमंत्रिपदासाठी आमच्या लोकांना आग्रह धरायलाच लागेल. सात आमदार एकच पक्षाचे असतील तर त्या पक्षाला पालकमंत्रिपद मिळाले पाहिजे, असे म्हणत छगन भुजबळ यांनी नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी आग्रह कायम ठेवला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *