भारतात आणि जगभरात कोविड-१९ च्या रुग्णांची संख्या झपाट्याने कमी झाली आहे. भारतात कोरोना विषाणूची भीती दूर झाली असून, कोणतेही निर्बंध लोकांवर नाहीत. सामान्य जनजीवन सुरळीत झाले असून, सण-उत्सव, सांस्कृतिक, क्रीडा सामाजिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रमांसह विवाह सोहळे आणि वाढदिवसाचे कार्यक्रम मुक्त वातावरणात पार पडत आहेत. नुकत्याच झालेल्या ट्वेण्टी ट्वेण्टी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेवर कोरोनाचे सावट नव्हते. कतारमध्ये सुरू असलेल्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेनेही कोरोनाचा धसका घेतलेला नाही. मुक्त आणि मनसोक्त वातावरणात जगभर सर्वकाही सुरू असताना कोरोना विषाणूचे उगमस्थान असलेल्या चीनमध्ये परिस्थिती अगदी निराळी आहे. चीनने स्वतंत्र कोरोना धोरण असून, त्यातून देशात रुग्णांची संख्या शून्यावर आणण्याचे उद्दिष्ट आहे. एक जरी रुग्ण आढळला, तरी या देशात निर्बंध लादले जातात. विशेष चीनमध्ये एकपक्षीय कम्युनिस्ट सरकार असल्याने लोकांना आदेश दिले जातात आणि आदेशाचे सक्तीने पालन करावे लागते. परंतु, चीनची कोरोना परिस्थिती गंभीर होत असल्याने काही शहरांमध्ये लॉकडाऊनही करावा लागत आहे. यावरुन चीनमध्ये कोरोना नियंत्रणात नसल्याने लागू करण्यात येत असलेल्या निर्बंधांना लोकांचा तीव्र विरोध असल्याचे दिसून येत आहे. या देशात हुकूमशाहीला लोक कंटाळले असून, आदेशाच्या विरोधात लोक रस्त्यावर उतरू लागल्याने सरकारचीच नव्हे, तर अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्या विरोधातही लोक घोषणाबाजी करू लागले आहेत. अर्थात, लोकांची निदर्शने दडपून टाकणे सरकारला अवघड नाही. मात्र, कोरोना विषाणूच्या निमित्ताने लादण्यात येत असलेल्या निर्बंधांना लोकांचा उघड विरोध असल्याचे दिसत आहे. कोरोनाची लाट ओसरत असताना धार्मिक स्थळे खुली करण्यासाठी भारतात अनेक राज्यांत निदर्शने झाली होती. प्रत्येक राज्यात वेगळे धोरण राबविले जात होते. काही राज्यांत, तर कोरोना काळात महाधार्मिक उत्सव (उदा. हरिद्वार कुंभमेळा) प्रचंड गर्दीत आणि उत्साही वातावरणात पार पडले होते. प्रत्येक राज्यात वेगळे धोरण राबविले जात होते. भारतासारखी परिस्थिती चीनमध्ये नसल्याने लोकांवर केंद्रीय आदेश लादले जातात. पण, त्याविरोधात लोक रस्त्यावर येत आहेत. हीच विशेष बाब.
वाढती रुग्णसंख्या
भारतात सध्या कोरोना परिस्थिती नियंत्रणात असली, तरी शून्य कोरोना रुग्ण नाहीत. भारतात दररोज रुग्ण आणण्याचे प्रमाण चारशे रुग्णांच्या आसपास असून, मृत्यूचे दररोजचे प्रमाण शून्य ते तीनपर्यंत आहे. यामुळे लोकांमधील भीती दूर झाली असून, लसीकरण मोहीमही थंडावली असल्याने निर्बंधांची गरजही राहिलेली नाही. चीनमध्ये भारतापेक्षा वेगळी परिस्थिती आहे. एका दिवसाला चीनमध्ये ३०-३५ हजार रुग्ण आढळत आहेत. ही सरकारी आकडेवारी असून, महामारी नियंत्रणात आल्यानंतर चीनमध्ये होत असलेली ही सर्वांत मोठी रुग्णवाढ आहे. एक नोव्हेंबरनंतर या देशात सुमारे अडीच लाख लोकांना कोरोना झाल्याचे सांगण्यात आले आहे. कोरोनाचा प्रसार अत्यंत वेगाने होत असल्याचा पूर्वानुभव लक्षात घेता चीनमधील काही भागांत लॉकडाऊन, सामूहिक चाचण्या, तात्पुरती रुगणालषे प्रवास, यात्रा यांवर प्रतिबंध यासारख्या अनेक उपाययोजवा केल्या जात आहेत काही ठिकाणी लोकांना घरातच थांबण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. अॅप्पल मोबाइल कंपनीचा प्रकल्प असलेल्या जेंगझू शहरात सुरक्षारक्षक आणि कर्मचारी यांच्यात झटापट झाल्याने लॉकडाऊन करण्यात आला. अॅप्पल प्रकल्पातील कामगारांना मारहाण करुन, त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. संपूर्ण प्रकल्पांच्या परिसरात चोहोबाजूंनी प्रतिबंध लागू करण्यात आले आहेत. राजधानी बीजिंगमध्ये उद्याने, कार्यालये, शॉपिंग मॉल्स बंद करण्यात आले असून, बीजिंगमधील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या चाओयांग जिल्ह्यात पूर्ण लॉकडाउन लावण्यात आला आहे. अनेक शहरांतील शाळा बंद करण्यात आल्या आहेत. कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी चीनमध्ये सातत्याने प्रतिबंध लागू करण्यात येत आहेत. सीमा बंद करण्यात येत असून, लोकांना घरातच राहण्याच्या आणि दररोज चाचणी करुन घेण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. एकूणच चीनमध्ये महामारीची स्थिती गंभीर आणि जटील झाली आहे. त्यातच गेल्या आठवड्यात सहा महिन्यानंतर कोरोनाने एका व्यक्तीचा मृत्यू झाला. मरण पावलेली व्यक्ती ८७ वर्षांची आहे. याच पार्श्वभूमीवर प्रतिबंध किंवा निर्बंध लागू केले जात असल्याने लोकांना अडचणींचा सामना करावा लागत असून, त्याविरोधात रोष व्यक्त केला जात आहे. सरकारच्या विरोधात लोक बोलू लागले आहेत.
सरकारविरोधी निदर्शने
लॉकडाऊन आणि प्रतिबंधांच्या विरोधात रस्त्यावर उतरुन लोक सरकारच्या कोविड धोरणाच्या विरोधात निदर्शने करू लागले आहेत. रविवारी (२७ नोव्हेंबर) ही निदर्शने आणखी तीव्र झाल्याचे वृत्त आहे. चीनमधील शांघाय या सर्वांत मोठ्या शहरात निदर्शनांना सुरुवात झाली असून, निदर्शनाचे व्हिडिओ व्हायरलही झाले आहेत. शनिवारी प्रतिबंध काहीसे शिथिल करण्यात आल्यानंतर लोकांना बाहेर पडण्याची संधी मिळाली. त्यांनी थेट कम्युनिस्ट पक्ष म्हणजे सरकारविरोधात पवित्रा घेतला. ‘कम्युनिस्ट पार्टी हटवा’ आणि ‘कम्युनिस्ट पार्टी, पद सोडा’ अशा घोषणा लोक देत आहेत. ‘क्षी जिनपिंग पद सोडा’, अशाही घोषणा देण्यात आल्या. ‘मला पीसीआर चाचणी नको, मला आझादी पाहिजे’, असे एका व्यक्तीने म्हटल्याचे सोशल मीडियात व्हायरल झाले आहे. लॉकडाऊन मागे घेण्याची लोकांची मागणी आहे. अर्थात, आंदोलन करणार्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यात काही महिलांचा समावेश आहे. उरुमकी शहरातील एका इमारतीला शुक्रवारी लागलेल्या आगीत १० जणांचा मृत्यू झाला. या इमारतीत अनेक लोकांना ‘शून्य कोरोना’ धोरणानुसार क्वारंटाइन करण्यात आले होते. इमारतीला लागलेल्या आगीनंतर लोकांचा संताप अनावर झाला. त्याचा परिणाम म्हणजे सरकारच्या विरोधात होत असलेली निदर्शने. सरकारच्या कोरोनाला धोरणाला चीनमध्ये प्रथमच विरोध असून, यानिमित्ताने सरकारविरुध्द आणि अध्यक्षांविरुध्द लोक बोलायला लागल्याचा अर्थ तोच की, लोकांना हुकूमशाही नको आहे. संपूर्ण जगात कोरोना व्हायरस नियंत्रणात असताना चीनमध्ये रुग्णवाढ होत असेल, तर ही एक चिंजातनक बाब म्हणावी लागेल. लोकांवर जुलूम जबरदस्ती चीुनमध्ये केली जात असल्याची बाब नवीन नाही. मात्र, कोरानाच्या निमित्ताने लागू केल्या जात असलेल्या निर्बंधांना विरोध म्हणून निदर्शने होत असतील, तर हुकूमशाही लोकांना नकोच असते. हेच सिध्द होत आहे.