राजकारणातले ‘दादा’ पर्व संपले

बुधवार, दि. 28 जानेवारीची सकाळ महाराष्ट्रासाठी सकाळ न ठरता काळरात्र ठरली; कारण या सकाळी महाराष्ट्राच्या राजकारणातील धडाडीचा लोकनेता उपमुख्यमंत्री अजित पवार काळाच्या पडद्याआड गेले. बुधवारी सकाळी 9 वाजता टीव्हीवर बातम्या पाहत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला अपघात ही ब्रेकिंग न्यूज ऐकली आणि काळजाचा ठोका चुकला. अजित पवार हे या अपघातातून सहीसलामत वाचावेत अशी प्रार्थना करत असतानाच, अजित पवारांच्या निधनाची बातमी टीव्हीवर झळकली आणि मन
सुन्न झाले.
या बातमीने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली. ही बातमी खोटी निघावी, अशी अनेकजण प्रार्थना करत होते. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. दादा आपल्यात नव्हते. क्षणात होत्याचे नव्हते झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला. कार्यकर्ते, नेते, तरुण, वृद्ध, महिला सगळ्यांच्याच अश्रूंचा बांध फुटला. दादा म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक वादळ होते. चार दशकांहून अधिक काळ आपल्या कर्तृत्वाने महाराष्ट्राच्या राजकारणावर ठसा उमटवणारा हा वाघ नागरिकांना कायमचा सोडून जरी गेला असला, तरी आपल्या कार्याने त्यांनी नागरिकांच्या मनावर जो ठसा उमटवला तो कधीही निघून जाणार नाही. दादा म्हणजे कामाचा माणूस. दादांकडे गेले की काम होणारच, असा विश्वास लोकांना असायचा. काम होण्यायोग्य असेल तर लगेच करणारा आणि होण्यायोग्य नसेल तर तोंडावर नाही म्हणणारा. पोटात एक आणि ओठात एक असे राजकारणी दादा नव्हते. जे पोटात आहे तेच बोलणारा आणि तेच करणारा. कडक शिस्तीचा पण तितकाच दिलदार मनाचा. मिश्कील, सुस्वभावी, मनात येईल ते पटकन बोलून टाकणारा.
बोलताना कशाचीही तमा न बाळगणारा; पण आपण बोलल्याने कोणाचे मन दुखावले गेले हे लक्षात येताच जाहीर दिलगिरी व्यक्त करणारा आणि त्यासाठी जाहीर प्रायश्चित घेणारा, स्वतः वेळेचे बंधन पाळणारा आणि इतरांना वेळेचे महत्त्व पटवून देणारा. तरुणांना निर्व्यसनी राहण्याचा सल्ला देणारा, चुकीला चूक आणि बरोबर असेल तर बरोबर म्हणणारा, कार्यकर्ता असो की नेता, स्वपक्षातील असो की विरोधातील, चुकीचे वागत असेल तर त्याला वडिलकीच्या नात्याने खडसावणारा आणि त्याच नात्याने त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा, सतत सत्तेत राहूनही विरोधी पक्षांशी मैत्रीचे संबंध जपणारा, सकाळी सहा वाजता कामाला सुरुवात करणारा आणि ते काम दर्जेदार व्हावे असा हट्ट धरणारा, केवळ आणि केवळ महाराष्ट्राचा विकास हेच डोक्यात असणारा आणि त्यासाठी दिवसाचा रात्र करणारा, भाजप, शिवसेनेसारख्या हिंदुत्ववादी पक्षांशी हातमिळवणी करून सत्ता स्थापन करणारा तरीही शिव, शाहू, फुले, आंबेडकरांचा पुरोगामी विचार न सोडणारा, त्या विचारांशीच एकनिष्ठ राहणारा, कुटुंब आणि राजकारण यांची योग्य सांगड घालणारा, कुटुंबात राजकारण आणि राजकारणात कुटुंब येऊ न देणारा दादा म्हणजे राजकारणातील वेगळेच रसायन होते.
प्रत्येक गावखेड्यातील कार्यकर्त्याला दादा म्हणजे आपला नेता वाटत होता. जवळपास चार दशकांहून अधिक काळ महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिलेल्या दादांच्या राजकीय जीवनाची सुरुवात 1981-82 मध्ये छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून झाली. भारतीय राजकारणातले द्रष्टे नेते काका शरद पवार यांनी त्यांच्यातील नेतृत्वगुण हेरून त्यांना राजकारणात आणले. 1991 मध्ये आपल्या नेतृत्वगुणांची चुणूक दाखवून दादांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सत्तांतर घडवून आणले. त्याच वर्षी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यावरदेखील आपले वर्चस्व मिळवले. दादांच्या नेतृत्वगुणांची पारख झाल्याने 1991 मध्ये शरद पवारांनी दादांना थेट खासदारकीची संधी दिली. खासदार म्हणून मोठ्या मताधिक्याने जिंकून आलेल्या दादांनी काकांसाठीच खासदारकीचा राजीनामा देऊन बारामतीत आमदारकी लढवली. तेव्हापासून कामाच्या आणि लोकसंपर्काच्या जोरावर दादा बारामती तालुक्यातून सलग आठ वेळा विक्रमी मतांनी आमदार म्हणून निवडून आले. 1991 मध्ये पहिल्यांदाच आमदार झालेल्या दादांना सुधाकरराव नाईक यांनी आपल्या मंत्रिमंडळात घेतले आणि कृषी, फलोत्पादन आणि ऊर्जा खात्याचे राज्यमंत्रिपद दिले. 1999 नंतर त्यांनी ग्रामविकास, पाणीपुरवठा, स्वच्छता ही मंत्रिपदे सांभाळली. जलसंपदा हे खातेही 2010 पर्यंत त्यांच्याकडेच होते. अर्थमंत्री म्हणून तर त्यांनी विक्रम केला. महाराष्ट्राचे अर्थमंत्रिपद त्यांनी सर्वाधिक काळ भूषवले. दादांनी सहा वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याचा विक्रम केला.
सहा वेळा उपमुख्यमंत्रिपद भूषवणारे दादा हे एकमेव राजकीय नेते असतील. दरम्यानच्या काळात त्यांच्या गळ्यात विरोधी पक्षनेत्याची माळही पडली. 1999 मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यावर राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह घरोघरी पोहोचवण्यासाठी त्यांनी जीवाचे रान केले. शरद पवार दिल्लीचे राजकारण करत असल्याने महाराष्ट्रातील राष्ट्रवादीची धुरा त्यांच्याच खांद्यावर होती. त्यांच्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसला कायम सत्तेत राहता आले. दादांची जशी राजकारणावर पकड होती, तशीच पकड त्यांची कला, क्रीडा, साहित्य, सहकार, शिक्षण, जलसिंचन या क्षेत्रावरदेखील
होती. प्रत्येक क्षेत्राचा बारकाईने अभ्यास करून त्यात सर्वोत्तम देणारा अजित पवारांसारखा दुसरा नेता नाही. त्यांच्याइतका कामाचा झपाटा असणारा नेता पुन्हा होणार नाही.
अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राची कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे. त्यांचा सारखा नेता पुन्हा होणार नाही. त्यांच्या निधनाने राजकारणातील ‘दादा’ पर्व संपले, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. धडाडीचे लोकनेते असणारे, सर्वांचे लाडके अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

The ‘Dada’ era in politics is over.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *