पाणी कपातीचा निर्णय पुढच्या महिन्यात होण्याची शक्यता 

नाशिक : प्रतिनिधी
यंदाच्या हंगामात मान्सूनला नेहमीच्या तुलनेत एक महिना विलंब होण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.महापालिकेला उपलब्ध पाणी ३१ जुलैऐवजी आॅगस्टअखेरपर्यंत पुरविण्याचे नियोजन करावे लागत आहे. दरम्यान पाणी कपातीचा निर्णय मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार असण्याची शक्यता आहे.
नाशिककरांची तहान भागवायची असल्यास पाणी कपात अटळ मानली जात आहे. मनपा प्रशासनाकडून चालू एप्रिलमध्ये याबाबत निर्णय होणे अपेक्षित होते. आठवड्यातून एकदा पूर्ण दिवस पाणी कपात असे नियोजन होते. पण राजकीय विरोधापोटी याबाबत निर्णय होऊ शकला नाही. मात्र आता देखील कपातीचा निर्णय पुढे ढकलल्यास  मान्सूनचे आगमन विलंबाने झाल्यास शहरात पाणीबाणी निर्माण होऊ शकते. त्यामुळे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात याबाबत फैसला होणार आहे. आयुक्त सहा मे पासून एक महिन्यासाठी प्रशिक्षणासाठी मसुरिला जात आहे. त्यापुर्वी बैठक घेत ते पाणी कपातीचा निर्णय घेणार आहे. मिळालेल्या माहितीनूसार आठवड्यातून एक दिवस पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. मात्र राजकीय दबावामुळे पाणी कपातीच्या निर्णय अद्याप होऊ शकलेला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *