समुपदेशन, उपचाराद्वारे नशेपासून केले जाते परावृत्त
नाशिक ः देवयानी सोनार
नशेकडे वळलेल्या व्यक्ती, युवकाचे व्यसन सुटण्यासाठी पालक हरप्रकारे प्रयत्न करतात. परंतु त्यात यश येत नाही. त्यामुळे शेवटचा पर्याय म्हणून व्यसन सोडविण्यासाठी व्यसनमुक्ती केंद्राचा आधार घेतला जात असून, या केंद्रामार्फत व्यसनाधीन झालेल्या व्यक्तीचे अथवा तरुणाचे समुपदेशन करण्यात येऊन त्याला व्यसनापासून परावृत्त केले जात असल्याचे चित्र आहे.
केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणात दहा ते 17 वयोगटातील दीड कोटी मुले व्यसनाधीन असल्याची माहिती सर्वेाच्च न्यायालयास दिली. यावरून व्यसन करणार्यांचे प्रमाण चिंताजनक असल्याचे सिद्ध होते.
कोरोनाच्या संकटानंतर अनेकांचे कोणत्या ना कोणत्या प्रकारचे नुकसान झाले. संकटाच्या मानसिकतेतून बाहेर येणे प्रत्येकालाच शक्य होत असतांना वेगवेगळ्या वयोगटातील अनेकांनी विविधप्रकारे उभे राहण्याची धडपड केली तर अनेकजण व्यसनांच्या आहारी गेले. पौगडांवस्थेतून तरुणाईकडे वळणारी पिढी व्यसनाधीन होत आहे. व्यसन जडल्यानंतर त्याचा अतिरेक होतो. प्रमाण वाढले आहे याची जाणीव उशीरा लक्षात येत असल्याने व्यसनमुक्ती करण्याचे मोठे आव्हान घरातील मंडळींपुढे उभे राहते.
व्यसनमुक्ती केंद्रामध्ये दाखल केल्यानंतर वेगवेगळ्या माध्यमातून समुपदेशन करण्याबरोबरच व्यसनाचे दुष्परिणाम पटवून दिले जातात. त्यापासून होणार्या आजारांचे तोटे समजून सांगितले जातात. पालकांना बोलावून समुपदेशन करण्याबरोबरच व्यसनाधीन व्यक्तीचे व्यसन सुटावे म्हणून अनेक प्रकारचे उपाय, औषधोपचार केला जातो. यातून व्यसन सुटण्यास बर्यापैकी मदत होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
व्यसनाधीनतेच्या आजारात पुनर्वसन केंद्राची उपचारामध्ये फार महत्त्वाची भूमिका आहे. औषधोपचार समुपदेशन आणि रुग्णांमध्ये आत्मविश्वास जागवणे गरजेचे असते. जेणेकरून तो पुन्हा समाजात गेल्यानंतर व्यसनाधीनतेकडे वळणार नाही. सद्यस्थितीत कार्यरत असलेले पुनर्वसन केंद्र हे रुग्णांनी दिलेल्या उपचार फी वर कार्यरत आहेत कोणत्याच प्रकारचे शासकीय अनुदान घेत नाहीत. शहर आणि परिसरामध्ये अनेक व्यसनमुक्ती केंद्र कार्यरत आहेत.
डॉ.नीलेश जेजूरकर(मानसोपचार तज्ज्ञ)
काही कौटुंबिक समस्या असल्यास कुटुंबातील व्यक्तींचे एकत्रितपणे समुपदेशन केले जाते आणि रुग्ण व त्याचे नातेवाईक एकत्र राहून जीवन आनंदाने कसे जगू शकतात. याचीही कल्पना दिली जाते. रुग्ण बरा झाल्यावर रुग्णालयातून सुट्टी करून त्याला नियमितपणे मानसोपचार तज्ञांमार्फत बाह्य रुग्ण सेवा दिली जाते व वेळोवेळी व्यसनमुक्त जीवन जगण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. हा एक आजार असल्यामुळे उपचार केल्यानंतरही हा पुन्हा होण्याची शक्यता नाकारता येत नाही (उदा. एकदा हृदयविकाराचा उपचार केल्यावर पुन्हा हृदयविकाराचा झटका येऊ शकतो) म्हणूनच गरज पडल्यास पुन्हा पुन्हा याचा उपचार करणे आवश्यक आहे.
डॉ.नकुल वंजारी(मानसोपचारतज्ज्ञ)
व्यसने वाढण्याची कारणे
धावपळीचे आयुष्य, तरुणाईमध्ये तसेच काम करणार्या वयामध्ये वाढलेला ताणतणाव,
टीव्ही, मोबाइल, अमेझॉन, नेटफ्लिक्स यासारख्या माध्यमातून व्यसनांचे होणारे उदात्तीकरण
महाविद्यालयीन वातावरणात मित्रपरिवाराचे दडपण,
चुकीची संगत पालकांमध्ये व्यसनाधीनता.