बाल येशू यात्रेचा समारोप

नाशिकरोड :  प्रतिनिधी

लाखो ख्रिस्ती भाविकांच्या उपस्थितीत नाशिकरोड येथील बाळ येशूच्या दोन दिवसाच्या यात्रेचा समारोप झाला. नाशिक-पुणे महामार्गावरील सेंट झेवियर्स शाळेच्या आवारात बाळ येशू मंदिर आहे. ही यात्रा दरवर्षी फेब्रुवारीच्या दुस-या आठवड्यात भरते. शाळेच्या मैदानात उभारलेल्या भव्य शामियान्यात पहिल्या दिवशी नाशिक धर्मप्रांताचे महागुरु बिशप ल्युडस डॅनिएल यांच्या प्रमुख उपस्थितीत मिसा (प्रार्थना) झाली.
शेवटच्या दिवशीही पहाटे सहा ते सायंकाळी सात या दरम्यान दर तासाला इंग्लिश, मराठी, कोकणी, तमीळ व अन्य भाषांमध्ये मिसा झाली. असंख्य भाविकांनी लाभ घेतला. नाशिकबरोबरच देशातून आलेल्या धर्मगुरुंनी मिसामध्ये मार्गदर्शन केले. फादर एरोल फर्नांडिस, फादर अगस्तीन डिमेलो, फादर टेरी, फादर बॉस्को, फादर टोनी, फादर लोबो आणि त्यांच्या सहका-यांनी केलेल्या नियोजनबध्द संयोजनामुळे यात्रा यशस्वी झाली. बाळ येशू मंदिराच्या आवारात पिलग्रीम आणि रिट्रीट सभागृहात गरीब भाविकांची निवासाची सोय करण्यात आली होती. पूजेच्या वस्तू, शीतपेयी, शोभीवंत व अन्य वस्तूंची तसेच फळांची दुकाने लागली होती. नाशिकरोड व परिसरातील हॉटेल्सला चांगली मिळकत झाली. भाविकांची प्रचंड गर्दी लक्षात घेऊन मंदिर प्रशासन, वाहतूक आणि उपनगर पोलिसांनी जय्यत तयारी केली होती. नेहरूनगर, जेतवननगर येथील मैदान वाहनांच्या पार्किंगने भरून गेले होते. मंदिरात दर्शनासाठी बॅरिकेंटींग, खासगी सुरक्षा रक्षक, सीसीटिव्हीची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे अनुचित गोष्टींना आळा बसला. मंदिर प्रशासनाकडून चौकशी व माहिती कक्ष स्थापन करण्यात आल्याने भाविकांना योग्य मार्गदर्शन मिळाले. वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनकर कदम, उपनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक नीलेश माईनकर, पंकज भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

देशातूनच नव्हे तर विदेशातूनही भाविक
गेली दोन वर्षे करोना संकटामुळे दोन वर्षे यात्रा भरली नव्हती. त्यामुळे यंदा पाच लाखावर भाविक आल्याचा दावा संयोजकांनी केला.यात्रेत विविध व्यावसायिकांनी दुकाने थाटली होती. सिटी लिंक बस, रिक्षा, अन्य खासगी वाहनांनी भाविक यात्रास्थळी आले. या सर्वातून लाखोंची उलाढाल झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *