अश्विनी पांडे
‘दमलेल्या बाबाची कहाणी’ या संदीप खरे यांच्या गीताच्या ओळी वाचल्यानंतर, ऐकल्यानंतर आपसूकच डोळ्यात पाणी येते… बाप, वडील, बाबा, पप्पा हा प्रत्येक शब्द वेगळा असला तरी अर्थ एकच. आपल्या प्रत्येकाच्या मागे उभा असलेला आधारस्तंभ!
गेल्या आठ दिवसांपूर्वीचा प्रसंग डोळ्यात पाणी आणून गेला…आणि वडील या विशालहृदयी बाप माणसाची नव्याने ओळख झाली. वडील कोणाचेही असो ते वडीलच असतात. काही दिवसांपूर्वीच शहरातील शाळा सुरू झाल्या आहेत. शाळेची तयारी करण्यात विद्यार्थ्यांसह पालकांची लगबग सुरू होती. त्यामुळे शालेय साहित्याच्या दुकानात प्रचंड गर्दी होती. तिथेच एक वडील आपल्या दुसरी, तिसरीच्या मुलीला घेऊन वह्या खरेदी करण्यासाठी आले होते. त्यांच्या अंगावरील कळकटलेले कपडे पाहून ते मोलमजुरी करणार्या गरीब कुटुंबातील होते हे लगेच कळले. त्यांनी दुकानदाराला वह्या दाखवायला सांगितल्या आणि दुकानदार त्यांच्याकडे पाहून म्हणाला, वह्या खूप महाग आहे. तुम्हाला जमणार आहे का घ्यायला? त्यांना त्या महाग वह्या घेणे खरे तर शक्य नव्हते. पण मुलीला तीच वही आवडली होती आणि त्यामुळे वडिलांनी सहा वह्यांचे बजेट दोन वह्या खरेदी करत संपवले. आणि दुकानदाराला हेही सांगितले, यातल्या चार वह्या राहू द्या मी उद्या घ्यायला येतो. खरे तर एका दिवसात त्यांच्याकडे पैसे येणार नव्हते. वह्या हातात घेऊन मुलीचा चेहरा खुलला होता. पण, वडिलांच्या चेहर्यावर मात्र उद्या या चार वह्या आणण्यासाठी पैसे कुठून आणायचे, हा प्रश्न दिसत होता. हा प्रसंग पाहून जाणीव झाली की, आपण प्रत्येक जण आपल्या वडिलांकडे हक्काने अनेक गोष्टी मागत असतो. पण, खरंच त्यांना त्या गोष्टी आपल्याला देण्यासाठी काय काय करावे लागत असेल, याची कल्पनाच न केलेली बरी…!
बाबा.. प्रत्येकाच्या आयुष्यातील प्रेरणास्थान..! आपण प्रत्येक जण आपल्या आयुष्यात असलेल्या प्रत्येकाविषयी भरभरून बोलत असतो…पण असे एक व्यक्तिमत्त्व त्याच्याविषयी बोलण्याचे, त्याचं महत्त्व जाणून घेण्याचे राहून जाते. मात्र, आपली जडणघडण, आपले विचार, संस्कार मात्र त्यांच्याकडूनच आपल्यात रुजत असतात. धाक, दरारा याही पलीकडे संवाद न साधताही असतो तो जिव्हाळा.
वडील हा शब्द नसून, प्रत्येकाच्या पाठीशी खंबीरपणे उभा असणारा आधारस्तंभ आहे. मात्र, प्रत्येक क्षणाला आईच्या महतीपुढे वडिलांचे कार्य मात्र झाकोळले जाते. त्यामुळेच नकळत का असेना प्रत्येकाकडून वडिलांना गृहीत धरण्यात येते. त्यांच्याविषयीचा आदर, धाक यात वडिलांच्या मनाचा हळुवार कोपरा जाणून घेण्यात आपण प्रत्येक जण कमी पडत असतो… आयुष्याच्या प्रत्येक संकटाचा खंबीरपणे सामना करणारे बाबा वटवृक्षाप्रमाणे ऊन, पाऊस, वार्यातही आपल्या पारंब्याला आधार देणे थांबवत नाही. पण त्यांचं मन, भावना, प्रेम मात्र बाबा गेल्यानंतरच जाणवते आणि पायाखालची जमीन सरकणे म्हणजे काय असते याची जाणीव होते.
अशा या आयुष्यातील आधारस्तंभाविषयी आपल्या भावना व्यक्तकरणं शब्दात शक्य नाही. चित्रपट यशस्वी होण्यामागे जसा दिग्दर्शकाचा वाटा मोठा असतो. पण, नाव मात्र कलावंताचे होते, त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या यशामागे वडिलांचा वाटा मोठा असतो. मात्र, यश संपादन केल्यानंतर वडिलांविषयी बोलण्याचे नकळतपणे राहून जाते. वडील या लार्जर दॅन लाइफ अशा व्यक्तिमत्त्वाविषयी आपल्याला भावना व्यक्त करण्यासाठी वर्षातील एक दिवस पुरणार नाही. पण तरीही फादर्स डेच्या निमित्ताने एवढेच सांगावेसे वाटतं बाप हा बापच असतो.
ढगाळ वातावरण,दाट धुके व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान...! मनमाड: आमिन शेख गेल्या तीन ते चार दिवसांपासून…
नाशिक: प्रतिनिधी भंगार व्यापारी यांच्याकडून पाच हजार रुपयांची लाच घेताना गुन्हे शाखा युनिट 2 चा…
नाशिक: प्रतिनिधी केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांचा आज होणारा दौरा रद्द झाला आहे. जिल्हाधिकारी…
नवी दिल्ली: देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन झालं आहे. श्वासोश्वास घेण्यासाठी त्रास…
शिंदे टोलनाक्यावर कारला आग शिंदे:प्रतिनिधी शिंदे टोल नाक्यावर सुमारे साडेसात वाजेच्या दरम्यान सिन्नर कडुन नाशिक…
नाशिक: महापालिका आयुक्त पदाबाबत मोठी घडामोड पहावयास मिळत आहे, वादग्रस्त आयुक्त अशोक करंजकर हे वैधकीय…