उद्याचं भविष्य जाणून बियाणे साठवणारे हात
ग्रामीण महाराष्ट्राचा मुख्य कणा शेतीच आहे. आजही संपूर्ण भारतात 50-55 टक्के लोकसंख्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे शेतीवर आधारित आहे. शेतीचा निसर्गाआधारित प्रवास म्हणजे बीज, रोप, पीक, धान्य, अन्न आणि आरोग्य. या संपूर्ण चक्रामध्ये बियाण्याचे जतन, संवर्धन आणि नवनिर्मिती हा अतिशय मोलाचा टप्पा आहे. हा टप्पा ज्या शांत आणि संयमी हातांनी पिढ्यानपिढ्या सांभाळला, ते हात होते आणि आहेत शिवारातील स्त्रीशक्तीचे म्हणजेच महीलाभगिनिंचे. आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षानिमित्त आपण शिवारातील स्त्रीशक्ती या लेखमालेतील ग्रामीण भागातील शेतकरी आणि शेतमजूर महिलांच्या शेतीतील विविध भूमिकांची माहिती करून घेत आहोत. त्यातीलच एक महत्त्वपूर्ण नवनिर्मितीची बाब म्हणजे उद्याची बीजं ओळख ओळखून आज केलेले बीजसंवर्धन. ग्रामीण भागातील महिला आजही शेती माती आणि अन्न धान्याला दैवी संपत्ती समजतात. शेतातून निघणार्या धान्याची पूजा केली जाते. महिलांमध्ये पूर्वीपासून एक उपजतच वैज्ञानिक दृष्टिकोन ग्रामीण भागात पहायला मिळतो. शेतकरी असो की शेतमजूर महिला त्या परांपरागत अनेक बियाणे वाणांचे संवर्धन शास्त्रशुद्ध पद्धतीने करतात. आणि पिढ्यान् पिढ्या ते पीक उत्पादन घेतात. आता प्रत्येक पिकाच्या अनेक सुधारित आणि संकरित जाती उपलब्ध असल्या तरी ग्रामीण भागातील महिलांची बीजसंवर्धनाची पद्धत आणि कोणता वाण साठवणुकीत दीर्घकाळ टिकतो, हे अचूक ओळखण्याची पद्धत अतिशय वाखाणण्याजोगी असते. आजही शेतकरी महिलांकडे बीज साठवण्यासाठी हवाबंद डब्या, बाटल्या, रांजण आहेत. ज्यामध्ये दुर्मिळ होत चाललेले विविध वाण, भाजीपाला बियाणे बीजसंस्कार करून साठवतात. जे अगदी पुढच्या हंगामात संपूर्ण उगवणक्षमतेसह टिकून राहते. महिलांमध्ये कोणती ज्वारी चांगली, कोणती मूगाची जात साठवायची, कोणती तांदळाची जात पावसात टिकते हे अगदी अचूक ओळखण्याची क्षमता असते. आजच्या भाषेत याला डशशव डशश्रशलींळेप, डशशव इीशशवळपस, डशशव उेपीर्शीींरींळेप म्हटलं जातं. पण गावात या सगळ्याला एकच शब्द आहे नजरेनं बी निवडणं. साठवणूक केलेलं हे बियाणं त्या फक्त स्वतःच्या वापरासाठी नाही तर शेजारच्या इतर मैत्रिणींनादेखील देतात. त्यामुळे स्थानिक वातावरणात अधिक चांगल्या रुजणार्या हवामान अनुकूल बियाणेनिर्मिती आणि पीक लागवडीत महिलांचा मोठा सहभाग आहे. आता देशपातळीवर सीड बँकनिर्मिती होत आहे. संपूर्ण जगभरात सीड मदर म्हणून ओळख असलेल्या महाराष्ट्रातील अकोले तालुक्यातील रहीबाई पोपेरे या देशी बियाण्यांच्या संरक्षक आणि संवर्धक आहेत, ज्यांना त्यांच्या कार्यामुळे डशशव चेींहशी म्हणून मान्यता मिळाली आहे आणि अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे.
महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी कुटुंबातील महिला या बियाणे संवर्धनामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात. बियाणे संवर्धन साठ्यात फक्त धान्य नाही, तर त्यात कडधान्य, तेलबिया, भाजीपाल्याच्या बिया, फुलांच्या बिया आणि काही घरात रानभाज्यांचीही बियाणं ठेवली जातं. प्रत्येक दाण्यावर त्या महिलेची स्वतःची नजर असते दाण्याचा रंग, जाडी, कणसाची रचना, पावसाची सहनशक्ती, स्वयंपाकातील चव, साठवणक्षमता अशी एक-एक गोष्ट अनुभवातून लक्षात राहिलेली असते. बाहेरून पाहिलं तर ती बी उचलून दुसरीकडे ठेवणं एवढंच दिसतं, पण प्रत्यक्षात त्यामागे पारंपरिक कृषी विज्ञानाचा खोल अनुभव दडलेला आहे. मधल्या काळात बिजसंवर्धन थोडं कमी होत होतं, पण आता पुन्हा नव्याने सुरू झालेलं दिसतंय. कारण हवामान अनुकूल बियाणे संवर्धन ही उद्याची गरज आहे, हे पुन्हा एकदा महिलांनी हेरलंय. आता गटशेतीमध्ये उमेदच्या गटांमध्ये परसबागांमधून स्थानिक वाणांचे बीजसंवर्धन महिला करताय. गावोगावी बियाण्यांची देवा-घेवाण हा आजही महत्वाचा सामाजिक व्यवहार आहे.
गावात लग्नसमारंभात, शेतीशाळेत, बचतगटाच्या मीटिंगमध्ये लाल तुरीचं वाण आहे का?, शिरी दोडक्याचं बी कुणाकडे आहे? अशा चर्चा सहज ऐकायला येतात. ही देवाणघेवाण फक्त बियाण्यांपुरती मर्यादित नसून, ती ज्ञानाची आणि संबंधांचीही देवाणघेवाण असते. त्यामुळे बाजारावर अवलंबून राहणं कमी होतं आणि गावात बीजस्वावलंबन वाढतं. पोषण सुरक्षेच्या दृष्टीनेही बियाणे जपण्याचं योगदान मोठं आहे. देशी धान्यं, कडधान्यं, तेलबिया व रानभाज्यांचे वाण महिलांकडे जपले जात असल्यामुळे ग्रामीण कुटुंबांच्या ताटात विविधता टिकून आहे. आज ज्या काळात मधुमेह, रक्तदाब, स्थूलता असे जीवनशैलीचे आजार वाढले आहेत, त्या काळात देशी धान्यं आणि रानभाज्या पुन्हा पोषणमूल्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरत आहेत. आज अनेक जिल्ह्यांमध्ये महिलांच्या स्वयंसहाय्यता गट, बचतगट, शेतकरी उत्पादक कंपन्या, कृषी विभाग तसेच स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून समुदाय आधारित बीज बँका, बियाणे मेळावे आणि जैविक शेती प्रशिक्षण यांसारखे उपक्रम सुरू आहेत. या संधीमुळे महिलांना केवळ ज्ञानाचं रूपांतर आर्थिक शक्तीत करण्याची संधी मिळत नाही, तर देशी बियाण्यांचे औपचारिक संरक्षणही होते. काही ठिकाणी तर महिलाचं बीज उद्योजिका बनत आहेत आणि आपल्या बियाण्यांच्या पॅकेट्स बाजारात विक्रीसाठी पाठवत आहेत.
ग्रामीण शेतकरी महिला आज केवळ शेतीमजूर किंवा कुटुंबाची कामगार नाहीत तर त्या बियाण्यांच्या रक्षक, पोषणाच्या वाहक, आणि जैवविविधतेच्या संरक्षक आहेत. त्यांचं ज्ञान, निरीक्षणशक्ती, अनुभव आणि बियाणं जपण्याची तळमळ या सर्व गोष्टींमुळे कृषी व्यवस्थेला आधार मिळतो आहे. ही शक्ती घराच्या स्वयंपाकघरापासून शिवारापर्यंत आणि आता बाजारपेठेपर्यंत पोहोचू लागली आहे. आजच्या बदलत्या कृषी क्षेत्रात ग्रामीण महिलांचं बियाणे संवर्धन हे फक्त परंपरा नाही, तर भविष्याची हमी आहे. स्वावलंबी शेती, पोषण सुरक्षा आणि स्थानिक जैवविविधता यांना बळ देणारी ही प्रक्रिया आजही अनेक गावांमध्ये शांतपणे चालू आहे आणि त्यामागे उभी आहे आपल्याच शिवारातील स्त्रीशक्ती.
The female power of Shivara