शहरात व्हाइट टॅपिंगचा होणार पहिलाच प्रयोग

मुंबई नाका ते त्र्यंबक नाकादरम्यान रस्त्याचे काम; सिंहस्थ रस्ते कामांतून मंजुरी; 14 कोटींचा खर्च

नाशिक : प्रतिनिधी
सिंहस्थ कुंभमेळ्यातील नियोजित 298 कोटींच्या रस्ते कामांना सिंहस्थ प्राधिकरणकडून नुकतीच प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. एकूण नऊ ठिकाणच्या रस्त्यांवर तीनशे कोटींचा खर्च होणार आहे. दरम्यान, मंजूर रस्तेकामांपैकी मुंबई नाका ते त्र्यंबक नाकापर्यंतचे काम व्हाइट टॅपिंगमध्ये केले जाणार आहे. विशेष म्हणजे, शहरातील हा पहिलाच प्रयोग असेल.
यंदा शहरातील खड्ड्यांवरून महापालिकेवर आरोपांची राळ उठविण्यात आली होती. रस्तेकामात व खड्डे दुरुस्तीत कोट्यवधींचा घोटाळा केल्याचे आरोप मनपाच्या बांधकाम विभागावर करण्यात आले होते. शहरातील रस्त्यांची खराब परिस्थिती पाहता व नागरिकांचा रोष पाहून कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी महापालिकेत बैठक घेऊन शहरातील रस्ते व्हाइट टॅपिंगद्वारे होणार असल्याचे म्हटले होते. पण हे रस्ते कधीपासून होतील, हे त्यांनी स्पष्ट केले नव्हते. त्यातच सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी शहरात 2 हजार 68 कोटींचे रस्ते होत असून, पहिल्या टप्प्यात 930 कोटींच्या कामांना मंजुरी दिली असता, त्यातील कामात कुठेही व्हाइट टॅपिंग रस्त्यांचा समावेश नव्हता. मात्र, सोमवारी (दि.17) नऊ ठिकाणच्या रस्तेकामांना मंजुरी दिली. यातील मुंबई नाका ते त्र्यंबक नाकादरम्यान रस्त्याचे काम व्हाइट टॅपिंगद्वारे केले जाणार असल्याचे प्राधिकरणाने म्हटले आहे. शहरातील हा पहिलाच प्रयोग असेल. या रस्त्याचे काम कसे असणार, त्याची गुणवत्ता भविष्यात कशी असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महापालिकेकडून दरवर्षी रस्ते डागडुजीवर कोट्यवधी रुपये खर्च होतात. अनेकदा निधी नसल्याने रस्ते डागडुजीदेखील शक्य होत नाही. त्यावर तोडगा म्हणून महापालिका नागपूरच्या धर्तीवर रस्ते देखभाल व डागडुजीसाठी व्हाइट टॅपिंग हा पर्याय अंमलात आणणार आहे.

रस्त्याचे आयुर्मान वीस वर्षे

महापालिका बांधकाम विभाग मुंबई नाका ते त्र्यंबक नाका या एक किलोमीटरच्या रस्त्यावर व्हाइट टॅपिंग प्रक्रिया करणार आहे. त्यासाठी 14 कोटी खर्च असून, शहरात या मॉडेलवर रस्ते डागडुजीचा हा पहिलाच प्रयोग आहे. रस्त्याचे आयुर्मान पुढील पंधरा ते वीस वर्षे असेल. विशेष म्हणजे, या रस्त्यासाठी देखभालीची गरज भासणार नाही. त्यामुळे मनपाची बचत होईल.

 

सिंहस्थ कुंभमेळ्यातील नियोजित नऊ रस्तेकामांना मंजुरी मिळाली आहे. यात मुंबई नाका ते त्रंबक नाका या रस्त्याचे काम व्हाइट टॅपिंग प्रक्रियेद्वारे केले जाईल. अशाप्रकारे रस्त्याचे होणारे काम प्रथमच होत आहे.
– प्रदीप चौधरी, अतिरिक्त आयुक्त , मनपा

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *