येवल्यात विकासाची गंगा कायम सुरू राहील

माजी खासदार समीर भुजबळ : विविध विकासकामांचे भूमिपूजन

येवला : प्रतिनिधी
मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून येवला मतदारसंघात पायाभूत सुविधांची असंख्य विकासकामे मार्गी लागली असून, येणार्‍या काळातही कोट्यवधी रुपयांची विकासकामे करण्यात येतील. येवला मतदारसंघात विकासाची ही गंगा अविरतपणे सुरू राहील, असे प्रतिपादन माजी खासदार समीर भुजबळ यांनी केले. त्यांनी काल येवला तालुक्यातील विविध ठिकाणी ग्रामस्थांशी विकासकामांच्या प्रश्नांबाबत संवाद साधला.
राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ व आमदार पंकज भुजबळ यांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेल्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, राधाकिसन सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संभाजी पवार, ज्येष्ठ नेते अरुणमामा थोरात, विश्वास आहेर, नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, जलचिंतन सेलचे जिल्हाध्यक्ष मोहन शेलार, बाजार समितीचे माजी सभापती देवीदास निकम, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, प्रा. अर्जुन कोकाटे, संजय बनकर, सचिन कळमकर, प्रा. ज्ञानेश्वर दराडे, बाळासाहेब गुंड, नवनाथ काळे, मच्छिंद्र थोरात, संजय पगार, नितीन गायकवाड, भगवान ठोंबरे, विनोद ठोंबरे, सरपंच शिल्पा मढवई, सरपंच किशोर लभडे, सरपंच कल्पना शिंदे, सरपंच कृष्णा कोकाटे, सरपंच पुंडलिकराव होंडे, यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
समीर भुजबळ म्हणाले की, पर्यटन विकासाची कामे मार्गी लावत असताना महिलांना स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येतील. स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये योग्य उमेदवारांना संधी दिली जाईल, असा विश्वास समीर भुजबळ यांनी व्यक्त केला.

या विकासकामांचे झाले लोकार्पण

बदापूर येथे महादेव मंदिर सभामंडप उद्घाटन, चिचोंडी खु. येथे आरोग्य उपकेंद्राचे लोकार्पण (र.रु. 58 लक्ष), चिचोंडी बु. येथे मूलभूत सुविधांतर्गत सभामंडपाचे बांधकाम करणे कामाचे लोकार्पण (र.रु. 20 लक्ष), भिंगारे येथे मूलभूत सुविधांतर्गत जि. प. शाळा बांधकाम करणे कामाचे लोकार्पण.(र.रु. 10 लक्ष), महालखेडा पा. येथील तांडावस्ती (तुकारामनगर)मध्ये रस्ता काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन (र.रु. 10 लक्ष), सत्यगाव येथील सोलर प्लांटचे लोकार्पण (र.रु. 330 लक्ष), मानोरी बु. येथे खडकीनाला मानोरी ते कोपरगाव हायवेपर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करणे कामाची पाहणी (र.रु. 514 लक्ष).

पुरातन श्री राघवेश्वर मंदिराच्या कामाची पाहणी

केंद्र सरकारच्या नमोतीर्थ योजनेतून चिचोंडी खुर्द येथील पुरातन श्री राघवेश्वर महादेव मंदिराचा 4 कोटी 50 लक्ष निधीतून विकास करण्यात येत आहे. माजी खासदार समीर भुजबळ यांनी काल या मंदिराच्या कामाची पाहणी केली. तसेच यावेळी श्री राघवेश्वर महादेव मंदिरात मनोभावे दर्शन घेतले. या मंदिराचा क वर्ग देवस्थानमध्ये समावेश करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *