हार्मोन्स बदलाचा परिणाम; वयाच्या आठ ते दहा वर्षांपासूनच पाळी
नाशिक : अश्विनी पांडे
बदलती जीवनशैली, तसेच हार्मोन्समधील कमी वयात शारीरिक व मानसिक परिपक्वता निर्माण होऊन लवकर मासिक पाळी येण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढले आहे. परिणामी मुलींना भविष्यात आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. साधारणपणे वयाच्या बाराव्या वर्षापासून पंधराव्या वर्षापर्यंत मुलींना पाळी येण्यास सुरुवात होते. मात्र, गेल्या काही वर्षांत मुलींना वयाच्या आठव्या ते दहाव्या वर्षांपर्यत पाळी येण्यास सुरुवात होत आहे. त्यामुळे मुलींना आरोग्याच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. प्रामुख्याने कमी वयात पाळी आल्यानंतर उंची वाढण्यास समस्या निर्माण होतेे. शारीरिक आरोग्यावर होणार्या परिणामांसह मानसिक आरोग्यावरही परिणाम होतोे.
कमी वयात मासिक पाळी आल्यानंतर सामाजिक, कौटुंबिक आणि मानसिक दबाव अल्लड वयात मनावर येत असल्याने बालपण हरवत आहे. स्वतःविषयीचा आत्मविश्वास कमी होऊन मुलींच्या मनात न्यूनगंड निर्माण होत आहे. लवकर पाळी येण्याची समस्या हल्ली दहापैकी सहा मुलींमध्ये दिसते. परिणामी पाच वयापेक्षा मोठ्या असलेल्या मुलींच्या पालकांनी आपल्या मुलींच्या आरोग्याची योग्य काळजी घेत त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयीकडे विशेष लक्ष देण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे. मुलींना कमी वयात पाळी आल्यास पालकांनी मुलीला मायेचा ओलावा देत मोकळेपणाने संवाद साधल्यास त्यांच्यावरील दडपण कमी होऊन त्यांच्यात न्यूनगंड निर्माण होणार नाही, असे मानसोपचार तज्ज्ञाकडून सांगण्यात येते.
यामुळे लवकर येते पाळी
आनुवंशिकता
बदलती जीवनशैली
हार्मोन्समध्ये बदल
जीवनशैली व हार्मोन्स बदल यामुळे लवकर पाळी येते. मात्र, अनेक वेळा मुलीला लवकर पाळी येणे पालकांसाठीही अनपेक्षित असते. अशा स्थितीत आपल्या मुलीसोबत काही चुकीचे झाले असा समज न करता सध्याच्या जीवनशैलीचा हा परिणाम आहे, हे समजून घ्यायला हवे. लवकर पाळी आल्यामुळे ती स्थिती समजून घ्यायची समज मुलीमध्ये नसते. त्यांना त्यांच्याच सोबत असे झाले आहे असा समज होतो. त्यातून न्यूनगंडाची भावना निर्माण होते. त्यासाठी मुलींच्या पालकांनी या गोेष्टीकडे सकारात्मक पद्धतीने बघत मुलींना मनमोकळेपणे समजावणे आवश्यक आहे.
– डॉ. अनुप भारती, मानसोपचारतज्ज्ञसध्याच्या काळातील बदलत्या जीवनशैलीमुळे लहान वयातच मुलींमध्ये मानसिक व शारीरिक परिपक्वता येत असल्याने लवकर पाळी येत आहे. आहारात असलेला जंकफूडचा समावेश व अयोग्य आहारपद्धती यामुळे हार्मोनल बदल होऊन पाळी लवकर येते. पालकांनी मुलींच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. जर कमी वयात मुलीमध्ये शारीरिक बदल होत असतील तर पालकांनी वैद्यकीय तज्ज्ञांंचे मार्गदर्शन घ्यावे.
– डॉ. निवेदिता पवार, स्त्रीरोगतज्ज्ञ