सबसे बडा खिलाडी सुरेश कलमाडी!

सुरेश कलमाडी या नावाशिवाय पुण्याचा राजकीय इतिहास पूर्णच होऊ शकत नाही. जवळपास तीन दशके पुण्याच्या राजकारणावर एकहाती हुकुमत गाजवणारे पुण्याचे कारभारी असलेले पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे मंगळवारी (दि. 6 जानेवारी) वयाच्या 82 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने पुण्यावर एकहाती वर्चस्व गाजवणारा नेता काळाच्या पडद्याआड गेला. 1 मे 1944 रोजी जन्मलेले सुरेश कलमाडी यांनी सेंट व्हिन्सेंट हायस्कूलमधून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले, तर पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयामधून उच्च शिक्षण पूर्ण केले.
शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी पुण्याच्या नॅशनल डिफेन्स अकॅडमीत प्रवेश घेऊन पायलट बनण्याचे प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी काही वर्षे भारतीय हवाई दलात पायलट म्हणून सेवा केली. 1965 व 1971 च्या युद्धात त्यांनी हवाई दलाचे पायलट म्हणून भाग घेतला होता. 1972 साली त्यांनी राजकारणात प्रवेश केला. संजय गांधी यांचे ते निकटवर्ती होते. त्यांच्यामुळेच ते राजकारणात आले, असे म्हटले गेले. काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यावर त्यांना पुण्याचे प्रमुख बनविण्यात आले. त्याकाळी पुण्यात अनेक दिग्गज नेते होते. मात्र, सर्वांना बाजूला सारून त्यांनी पुण्याची धुरा स्वीकारली. 90 च्या दशकात तर पुण्यावर त्यांचे एकहाती वर्चस्व होते. 1991 मध्ये तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांनी त्यांना आपल्या मंत्रिमंडळात घेतले आणि रेल्वे राज्यमंत्रिपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. रेल्वे राज्यमंत्री म्हणून त्यांनी रेल्वेचा अर्थसंकल्पही सादर केला होता. केंद्रीय मंत्री आणि पंतप्रधान नरसिंह राव यांचे निकटवर्ती असल्याने पुण्यावर त्यांनी एकहाती वर्चस्व गाजवायला सुरुवात केली. पुण्यात ते काँग्रेसचे सर्वेसर्वा बनले. पुणे महापालिकेवर त्यांचे एकहाती वर्चस्व होते. पुण्याचे नगरसेवक, महापौर कोण होणार हे कलमाडी ठरवत असे. पुण्याचे आमदारदेखील कलमाडींच्याच मर्जीतील असत.
पुण्याच्या राजकारणावर त्यांची एकहाती पकड होती म्हणूनच त्यांना पुण्याचे कारभारी असे संबोधले जायचे. त्यांच्याभोवती कार्यकर्त्यांची रीघ लागलेली असे. त्यांचे कलमाडी हाउस कार्यकर्त्यांनी फुलून गेलेले असे. केंद्रीय मंत्री आणि पुण्याचा खासदार या नात्याने त्यांनी पुण्याला जागतिक शहर बनवण्याचा प्रयत्न केला. पुणे मेट्रो प्रकल्प, विमानतळ विकास त्यांच्याच प्रयत्नामुळे साकार
झाले.
पुण्यात सर्वप्रकारच्या पायाभूत सुविधा असाव्यात, असा त्यांचा आग्रह असे. पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन आणि पुणे फेस्टिव्हल सुरू करून त्यांनी पुण्याला जागतिक स्तरावर नेले. 1991 ते 96 या काळात पुणे काँग्रेसचे
सर्वेसर्वा असणार्‍या कलमाडी यांनी 1997 मध्ये मात्र काँग्रेस सोडली. 1998 ला झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. पराभवानंतर कलमाडी यांनी शरद पवारांमुळेच आपल्याला पराभव स्वीकारावा लागला, असे त्यावेळी जाहीर वक्तव्य केले होते.
अपक्ष म्हणून निवडणुकीत उभे राहिलेल्या कलमाडी यांना भाजपने पाठिंबा दिला होता आणि त्यांच्या प्रचारासाठी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी पुण्यात आले होते. 1998 साली झालेली राज्यसभा निवडणूक खूप गाजली. या निवडणुकीत ते पुन्हा अपक्ष म्हणून उभे राहिले. या निवडणुकीत त्यांचे प्रतिस्पर्धा होते राम कदम. राम कदम हे गांधी कुटुंबाच्या जवळचे होते. शिवाय जिंकून येण्याइतपत मते त्यांच्याकडे होती, तरीही त्यांना धोबीपछाड देऊन कलमाडी यांनी ती निवडणूक जिंकली आणि राजकारणात भूकंप घडवला होता.
या विजयानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी ’सबसे बडा खिलाडी सुरेश कलमाडी’ अशा घोषणा दिल्या होत्या. 1999 मध्ये काँग्रेस फुटली. शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. सुरेश कलमाडी पुन्हा काँग्रेसमध्ये परतले. 2010 पासून मात्र त्यांच्या राजकीय कारकिर्दीला उतरती कळा लागली. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत गैरव्यवहार केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला. त्यांना काही काळ तुरुंगातही राहावे लागले. 2025 मध्ये ’ईडी’ने त्यांच्याविरोधात पुरावे नसल्याने क्लोजर रिपोर्ट दाखल केला. न्यायालयानेही तो स्वीकारला, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. सुरेश कलमाडी राजकीय विजनवासात पोहोचले होते. जवळपास तीन दशके पुण्याचे कारभारी राहिलेले ’सबसे बडे खिलाडी सुरेश कलमाडी’ यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

The greatest player is Suresh Kalmadi!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *